Gold and Silver Rate Today, 14 May 2022: नवी दिल्ली : आज सोन्याच्या भावात सलग दुसऱ्या दिवशी घसरण झाली आहे. मजबूत होत असलेल्या डॉलरमुळे (Dollar) सोन्याच्या भावात (Gold Price) सलग चौथ्या आठवड्यात घसरण सुरू ठेवली आहे. डॉलरच्या निर्देशांकाने दोन दशकांच्या उच्चांकी वाढ दाखवल्याचा दबाव सोन्याच्या भावावर आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर, शुक्रवारी सोन्याचा भाव 49,909 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाला. महागाईवर नियंत्रण ठेवण्यासाठी अमेरिकन फेडरल रिझर्व्हने आक्रमक पतधोरण स्वीकारले आहे. फेडरल रिझर्व्हने व्याजदरात चांगलीच वाढ केली आहे. त्यामुळे डॉलर 20 वर्षांच्या नवीन उच्चांकीवर पोचला आहे. या आठवड्यात सराफा 3 टक्क्यांहून अधिक घसरला आहे. ही घसरण मागील दोन महिन्यांतील सर्वात जास्त आहे. अमेरिकेतील व्याज दरातील वाढ आणि बॉंडचा परतावा याचा सोन्याच्या भावावर थेट परिणाम होतो आहे. भारतात लग्नसराईचा हंगाम सुरू असताना सर्वसामान्यांना याचा फायदा होणार आहे. (Gold price continues to fall amid strong US dollar, Check latest rates)
अधिक वाचा : PM Kisan yojana: मोठी बातमी! पीएम किसान योजनेच्या 11व्या हप्त्याची यादी जाहीर, लगेच तपासा तुमचे नाव...
लग्नसराईच्या हंगामात भारतात दागिन्यांची खरेदी वाढते. सोन्याच्या भावात घसरण झाल्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांना दिलासा मिळणार आहे.सोन्याच्या भावात आठवडाभरात सुमारे 2.86 टक्क्यांची घसरण झाली आहे. स्पॉट सोन्याची किंमत प्रति औंस 1810 डॉलरवर बंद झाली. तर 1820 डॉलरच्या पातळीवर ठेवलेल्या प्रमुख सपोर्टला तडा गेला आहे.
कमोडिटी मार्केट तज्ज्ञांच्या मते, विविध देशांतील मध्यवर्ती बँकांचे आक्रमक पतधोरण आणि रशिया-युक्रेन युद्धामुळे जागतिक आर्थिक वाढ खुंटेल या चिंतेने सोन्याच्या गुंतवणुकीतून गुंतवणुकदार बाहेर पडत आहेत. त्याचबरोबर हे गुंतवणुकदार अमेरिकन डॉलर आणि यूएस बाँड्समध्ये पैसे गुंतवत आहेत. तज्ज्ञांच्या मते डॉलर निर्देशांक दोन दशकांच्या उच्चांकावर पोचला आहे आणि त्यामुळे नजीकच्या काळात हा कल कायम राहण्याची अपेक्षा आहे.
अधिक वाचा : भारताची गहू निर्यातीवर बंदी
नजीकच्या काळात, स्पॉट सोन्याचा दर प्रति औंस 1780 डॉलर पर्यंत जाऊ शकतो तर MCX सोन्याच्या भावाची पातळी 48,800 रुपये प्रति 10 ग्रॅम पर्यंत जाऊ शकते. जाणकारांनी सोन्याच्या बाबतीत गुंतवणुकदारांना काही काळ प्रतीक्षा करण्याचा सल्ला दिला आहे. त्यांनी स्पॉट मार्केटमध्ये सुमारे 1780 डॉलरवर आणि MCX वर 48,800 रुपयांच्या पातळीच्या आसपास सोने खरेदी करण्याचा सल्ला दिला. कारण सोन्यासाठी व्यापक दृष्टीकोन अजूनही सकारात्मक आहे.
गोल्ड ईटीएफवरदेखील दबाव आहे. कारण त्यातील विक्री वाढली आहे. एकीकडे महागाई, डॉलरमधी तेजी आणि फेडरल रिझर्व्हच्या धोरणामुळे सोने दबावात आहे. तर दुसरीकडे युक्रेन युद्ध, कच्चे तेलाच्या किंमती, जागतिक अर्थव्यवस्थेतील अस्थिरता आणि बॉंडचा परतावा अलीकडील काळात कमी झाल्याचा सोन्याला फायदादेखील होतो आहे. कारण महागाईच्या पार्श्वभूमीवर भविष्यातील अस्थिरता लक्षात घेऊन गुंतवणुकदारांमध्ये सुरक्षित गुंतवणूक प्रकार म्हणून सोन्याची मागणी वाढली आहे.