Gold and Silver Rate Today, 17 June 2022 : नवी दिल्ली : सोन्याच्या भावातील (Gold Price) घसरण सुरूच आहे. अमेरिकन डॉलरची मजबूती आणि अमेरिकन ट्रेझरीच्या परताव्यातील वाढ याचा परिणाम सोन्याच्या मागणीवर झाला आहे. यामुळे शुक्रवारी सोन्याचे भाव घसरले आहेत. सध्या सोने मे महिन्यानंतरच्या आपल्या सर्वात मोठ्या साप्ताहिक घसरणीच्या दिशेने वाटचाल करते आहे. चांदीच्या भावातदेखील (Silver Price) घसरण झाली आहे. शेअर बाजारांमध्येदेखील मोठी घसरण होते आहे. यामुळे आगामी काळात सोन्याचा भाव कुठपर्यत पोचतो याकडे गुंतवणुकदारांचे लक्ष लागलेले आहे. तुम्हाला जर सोने खरेदी करायची असेल तर सध्या चांगली संधी आहे. (Gold price continues to fall amid strong US dollar, silver also drops)
एमसीएक्सवर (MCX)सोन्याचे फ्युचर्स घसरले होते. गोल्ड फ्युचर्स सुमारे 0.10 टक्क्यांनी किंवा 52 रुपयांनी कमी होऊन 50,934 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या पातळीवर आले. दरम्यान, चांदीचा भाव 0.21 टक्क्यांनी घसरून 128 रुपये प्रति किलो 61,399 रुपयांवर आला आहे. भारतीय सराफा आणि ज्वेलर्स असोसिएशनच्या म्हणण्यानुसार, स्पॉट मार्केटमध्ये, सर्वोच्च शुद्धतेचे सोने 50,614 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या पातळीवर होते. तर चांदीचा भाव 60,550 रुपये प्रति किलो इतका होता.
गेल्या तीन सत्रांमध्ये सोन्याचे स्पॉट किंमती 51,000 रुपयांच्या खाली आहेत. तर चांदीच्या भावात गेल्या दोन आठवड्यात सुमारे 1,500 रुपयांची घसरण झाली आहे.
अमेरिकन डॉलर मजबूत झाला आहे. डॉलर मागील सत्रात दोन दशकांच्या उच्चांकाजवळ स्थिर झाला आहे. याचा परिणाम होत सोने-चांदी सारखे मौल्यवान धातू गुंतवणुकदारांसाठी कमी आकर्षक ठरत आहेत. बुलियनला अनेकदा महागाईच्या विरोधात संतुलन म्हणजे हेजिंगचे साधन म्हणून पाहिले जाते. परंतु जेव्हा अमेरिकन फेडरल रिझर्व्ह अल्पकालीन व्याजदर वाढवते तेव्हा ते ठेवण्याची संधी खर्च जास्त असते, कारण सोन्याला व्याज मिळत नाही.
अधिक वाचा : Federal Reserve : अमेरिकी फेडरल रिझर्व्हकडून व्याजदरात 0.75 टक्क्यांनी वाढ, 28 वर्षांतील सर्वात मोठी वाढ
स्पॉट गोल्ड 0.7 टक्क्यांनी घसरून 1,844.25 डॉलर प्रति औंस झाले. यूएस सोन्याचे फ्युचर्स 0.2 टक्क्यांनी घसरून 1,846.90 डॉलरवर आले. अस्थिर आठवडाभरात सोन्याचे भाव 1.5 टक्क्यांनी घसरले आहेत. स्पॉट सिल्व्हर 0.6 टक्क्यांनी घसरून 21.79 डॉलर प्रति औंस, प्लॅटिनम 0.5 टक्क्यांनी घसरून 945.50 डॉलरवर, तर पॅलेडियम 0.8 टक्क्यांनी घसरून 1,893.87 डॉलरवर आला. सर्व मौल्यवान धातू साप्ताहिक घसरणीकडे जात होते.
जून महिन्याच्या सुरूवातीपासूनच सोन्याच्या भावात चढउतार सुरू आहेत. मे महिन्याच्या शेवटी 24 कॅरेट सोन्याचा भाव 51,125 रुपयांवर बंद झाला होता. तर जूनच्या सुरूवातीलाचा सोन्याचा भाव 50,506 रुपये प्रति 10 ग्रॅम रुपये झाला होता. जर तुम्ही सोन्यात गुंतवणूक करू इच्छित असाल तर सध्या चांगली संधी आहे. मागील महिनाभरापासून शेअर बाजारात चढउतार होत आहेत. सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये चांगलीच घसरण झाली आहे.