Gold and Silver Rate Today, 18 June 2022 : नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय घटकांच्या दबावात अस्थिर झालेल्या सोन्यामध्ये आज थोडे स्थैर्य आले. आज शनिवारी सोन्याच्या भावात (Gold Price) वाढ झाली. ही वाढ किरकोळ स्वरुपाची म्हणजे 10 रुपयांची आहे. 24 कॅरेट सोन्याचा भाव 51,110 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या पातळीवर आहे. तर 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा भाव 52,110 रुपयांवर आहे. त्याचवेळी चांदीची चमक मात्र उतरतच चालली आहे. चांदीच्या भावात (Silver Price) 600 रुपयांची घसरण झाली आहे. सध्या चांदीचा भाव 60,900 रुपये किलोच्या पातळीवर आहे. (Gold price is stable while silver drops, check latest rates)
दिल्ली, कोलकाता आणि बंगळुरूमध्ये 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा भाव 52,130 रुपये आहे, तर 22 कॅरेट सोन्याचा 10 ग्रॅम दिल्ली, कोलकाता आणि बंगळुरूमध्ये 47,790 रुपये आहे. चेन्नईमध्ये 24 कॅरेट सोन्याचा 10 ग्रॅम आणि 22 कॅरेट सोन्याचा भाव अनुक्रमे 52,180 आणि 47,850 रुपयांवर आहे. दरम्यान, दिल्ली, मुंबई आणि कोलकाता येथे चांदीचा भाव 60,900 रुपये प्रति किलोवर आहे. चेन्नईत सध्या एक किलो चांदीचा भाव 66,300 रुपयांवर आहे.
मे महिन्यात भारतातील सोन्याची आयात एका वर्षापूर्वीच्या तुलनेत 677 टक्क्यांनी वाढून वर्षभरातील सर्वोच्च पातळीवर पोचली होती. कारण महत्त्वाच्या सणाच्या आणि लग्नाच्या हंगामापूर्वी सोन्याच्या किंमतीतील घसरणीमुळे किरकोळ दागिन्यांच्या खरेदीला चालना मिळाली, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
याआधी काल सोन्याच्या भावात चांगली घसरण झाली होती. किंबहुना मागील काही दिवसांपासून सोन्याच्या भावावर दबाव दिसून येतो. जून महिन्यात सोन्याचा भाव आतापर्यत चांगलाच घसरला आहे. अमेरिकन डॉलरची मजबूती आणि अमेरिकन ट्रेझरीच्या परताव्यातील वाढ याचा परिणाम सोन्याच्या मागणीवर झाला आहे. यामुळे शुक्रवारी सोन्याचे भाव घसरले होते. सध्या सोने मे महिन्यानंतरच्या आपल्या सर्वात मोठ्या साप्ताहिक घसरणीच्या दिशेने वाटचाल करते आहे. चांदीच्या भावातदेखील (Silver Price) घसरण झाली आहे. शेअर बाजारांमध्येदेखील मोठी घसरण होते आहे. यामुळे आगामी काळात सोन्याचा भाव कुठपर्यत पोचतो याकडे गुंतवणुकदारांचे लक्ष लागलेले आहे.
अशा परिस्थितीत जर तुम्ही सोन्यासारख्या सुरक्षित गुंतवणूक प्रकारात गुंतवणूक करू इच्छित असाल किंवा सोने खरेदी करू इच्छित असाल तर सध्या चांगली संधी आहे. अमेरिकन डॉलर मजबूत झाला आहे. डॉलर मागील सत्रात दोन दशकांच्या उच्चांकाजवळ स्थिर झाला आहे. याचा परिणाम होत सोने-चांदी सारखे मौल्यवान धातू गुंतवणुकदारांसाठी कमी आकर्षक ठरत आहेत. बुलियनला अनेकदा महागाईच्या विरोधात संतुलन म्हणजे हेजिंगचे साधन म्हणून पाहिले जाते. मात्र सध्या गुंतवणुकदारांचा कल बदलेला दिसून येतो आहे.