Gold ETF | सणासुदीच्या काळात वाढला गोल्ड ईटीएफमधील ओघ, ऑक्टोबरमध्ये ३०३ कोटींची गुंतवणूक

Gold ETF Inflow | सणासुदीच्या हंगामामुळे ऑक्टोबर महिन्यात गोल्ड ईटीएफमध्ये ३०३ कोटी रुपयांची गुंतवणूक (Gold ETF inflow)झाली आहे. अर्थात सप्टेंबरच्या तुलनेत यात घसरण झाली आहे. सप्टेंबर महिन्यात गोल्ड ईटीएफमध्ये ४४६ कोटी रुपयांची जबरदस्त गुंतवणूक झाली होती. असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडिया म्हणजे अॅम्फीच्या (AMFI)आकडेवारीतून ही बाब समोर आली आहे.

Gold ETF Inflow
गोल्ड ईटीएफमधील गुंतवणूक 
थोडं पण कामाचं
  • सणासुदीच्या काळात सोन्यातील गुंतवणूक
  • गोल्ड ईटीएफ हा सोन्यातील गुंतवणुकीचा चांगला पर्याय
  • ऑक्टोबरमध्ये गोल्ड ईटीएफमधील गुंतवणूक

Gold ETF Inflow | नवी दिल्ली : सोन्यातील गुंतवणूक (Gold Investment)हा सर्वसामान्य भारतीयांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. त्यातच जर सणासुदीचा, दिवाळीचा हंगाम असेल तर सोन्यात (Gold)आवर्जून गुंतवणूक केली जाते. मागील काही वर्षात गोल्ड ईटीएफ (Gold ETF)हा पर्यायदेखील सोन्यातील गुंतवणुकीसाठी लोकप्रिय झाला आहे. गोल्ड एक्सचेंज ट्रेडेड फंड म्हणजे गोल्ड ईटीएफने गुंतवणुकदारांना यंदादेखील मोठ्या प्रमाणात आकर्षित केले आहे. सणासुदीच्या हंगामामुळे ऑक्टोबर महिन्यात गोल्ड ईटीएफमध्ये ३०३ कोटी रुपयांची गुंतवणूक (Gold ETF inflow)झाली आहे. अर्थात सप्टेंबरच्या तुलनेत यात घसरण झाली आहे. सप्टेंबर महिन्यात गोल्ड ईटीएफमध्ये ४४६ कोटी रुपयांची जबरदस्त गुंतवणूक झाली होती. असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडिया म्हणजे अॅम्फीच्या (AMFI)आकडेवारीतून ही बाब समोर आली आहे. (Gold ETF : In October Gold ETF saw inflow of Rs 303 Crore amid of festive season)

धनत्रयोदशीला सोने खरेदी

गोल्ड ईटीएफमधील गुंतवणुकीसंदर्भात LXME च्या संस्थापक प्रीती राठी गुप्ता यांनी म्हटले आहे की 'गोल्ड ईटीएफमध्ये ऑक्टोबर महिन्यात चांगली गुंतवणूक पाहण्यास मिळाली. सणासुदीच्या काळात जशी अपेक्षा होती त्याप्रमाणेच सोन्यात गुंतवणूक झाली आहे. यावर्षी धनत्रयोदशीला सोन्याच्या विक्रीचे प्रमाण २०१९च्या धनत्रयोदशीच्या तुलनेत २० टन जास्त होते.' तर मॉर्निंगस्टार इंडियाचे सहसंचालक-मॅनेजर हिमांशु श्रीवास्तव यांनी सांगितले की सप्टेंबर महिन्याच्या तुलनेत ऑक्टोबरमध्ये सोन्यातील गुंतवणुकीचे प्रमाण कमी झाले आहे. यामागे सोन्याच्या किंमतीत झालेली वाढ हेदेखील कारण आहे."

पोर्टफोलिओमध्ये वाढले सोन्याचे वजन

सध्या शेअर बाजार आतापर्यतच्या विक्रमी पातळीवर आहे. सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही निर्देशांकांनी उच्चांकी गाठली आहे. त्यामुळे अनेक गुंतवणुकदार शेअर बाजाराकडे आकर्षित होत आहेत. मात्र त्याचबरोबर शेअर्सच्या किंमतीत मोठी वाढ झाल्याने आणि बाजारात चढ उताराची जोखीम असल्याने अनेक गुंतवणुकदार सोन्यातील गुंतवणुकीकडेदेखील वळत आहेत. त्यामुळे गुंतवणुकीच्या पोर्टफोलिओत सोन्याचे एक वेगळेच महत्त्व आहे. 

गोल्ड ईटीएफ काय असतात

गोल्ड ईटीएफ हा प्रत्यक्ष सोन्याऐवजी पेपर रुपात सोन्यात गुंतवणूक करण्याचा पर्याय आहे. गोल्ड ईटीएफ हे एक प्रकारचे ओपन एंडेड म्युच्युअल फंड असतात. म्युच्युअल फंडाची ज्याप्रमाणे एनएव्ही असते आणि त्याप्रमाणात आपल्याला युनिट्स मिळतात तसेच गोल्ड ईटीएफच्या बाबतीतदेखील असते. गोल्ड ईटीएफची किंमत ही सोन्याच्या किंमतीतवर अवलंबून असते. त्यानुसार यात चढ उतार होत असतात. गोल्ड ईटीएफच्या एका युनिटचा अर्थ असतो एक ग्रॅम सोने. ज्याप्रमाणे बीएसई आणि एनएसई या शेअर बाजारात शेअरची खरेदी किंवा विक्री करता येते, त्याचप्रमाणे गोल्ड ईटीएफची खरेदी किंवा विक्री करता येते. गोल्ड ईटीएफद्वारे केलेल्या गुंतवणुकीत १०० टक्के शुद्ध सोन्याची खात्री दिली जाते. म्युच्युअल फंडाप्रमाणेच गोल्ड ईटीएफमध्येदेखील एसआयपीद्वारे गुंतवणूक करता येते. गोल्ड ईटीएफद्वारे टप्प्या टप्प्याने सोन्यात गुंतवणूक करता येते आणि शिवाय प्रत्यक्ष सोने बाळगण्याची जोखीमदेखील टाळता येते.


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी