Gold Price: सोने ५५७ रूपयांनी वधारले, कमोडिटी बाजारात तेजी

काम-धंदा
Updated Jan 08, 2020 | 12:24 IST | टाइम्स नाऊ मराठी

मागील आठवड्याभरापासून सोन्याच्या भावात तेजी असून आज मल्टी कमोडिटी एक्सचेंजमध्ये सोने ५५७ रूपयांनी वधारले आहे. एमसीएक्समध्ये सोने प्रति दहा ग्रॅम ४१,२२० रूपयांवर गेले आहे. काल, मंगळवारी सोने ५८२ रूपयांनी वधारला.

gold
Gold Price: सोने ५५७ रूपयांनी वधारले, कमोडिटी बाजारात तेजी  |  फोटो सौजन्य: BCCL

थोडं पण कामाचं

  • शेअर बाजारातून पैसे काढण्याचा सपाटा गुंतवणूकदारांनी लावला असून सुरक्षित गुंतवणूक म्हणून ते सोनेखरेदीकडे आकर्षित होत आहेत.
  • मागील आठवड्याभरापासून सोन्याच्या भावात तेजी असून आज मल्टी कमोडिटी एक्सचेंजमध्ये सोने ५५७ रूपयांनी वधारले आहे.
  • जागतिक बाजारात सोन्याच्या भावाने गेल्या सात वर्षांतील उच्चांक गाठला आहे.

इराण आणि अमेरिका या दोन्ही देशांतील वाद विकोपाला गेल्याने त्याचा परिणाम सर्वच स्तरांवर होत आहे. यामुळे जगभरातील गुंतवणूकदारांना धास्ती भरली असून ते भयभीत झाले आहेत. परिणामी शेअर बाजारातून पैसे काढण्याचा सपाटा गुंतवणूकदारांनी लावला असून सुरक्षित गुंतवणूक म्हणून ते सोनेखरेदीकडे आकर्षित होत आहेत. आज मल्टी कमोडिटी एक्सचेंजमध्ये सोने ५५७ रूपयांनी वधारले आहे.

मागील आठवड्याभरापासून सोन्याच्या भावात तेजी असून आज मल्टी कमोडिटी एक्सचेंजमध्ये सोने ५५७ रूपयांनी वधारले आहे. एमसीएक्समध्ये सोने प्रति दहा ग्रॅम ४१,२२० रूपयांवर गेले आहे. काल, मंगळवारी सोने ५८२ रूपयांनी वधारून ४०,६६३ रूपयांवर बंद झाले होते. आज सकाळी बाजार सुरू होताच सोन्याच्या भावात तेजी दिसून आली. सोन्याचा भाव ४१,२५४ रूपयांवर गेला होता. मध्य पूर्वेतील अस्थिरतेने सोन्याची मागणी वाढली असून चांदीचे दरसुद्धा चढे असल्याचे दिसून आले आहे.

जागतिक बाजारात सोन्याच्या भावाने गेल्या सात वर्षांतील उच्चांक गाठला आहे. मध्य पूर्वेतील अस्थिरता आणि युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्यानंतर जागतिक बाजारात सोन्याच्या किंमतीत झपाट्याने वाढ होत आहे. जागतिक बाजारात सोन्याचा दर प्रति औंस १६०० डॉलरवर गेला आहे. जागतिक कमोडिटी बाजारात बुधवारी सोने १७.०५ डॉलरने महागले आहे. तर सोन्याचा भाव १५९१.३५ डॉलरपर्यंत वाढला आहे. दिवसभरात तो १६१२.९५ डॉलरपर्यंत वाढला होता. मागील सात वर्षांतील सोन्याचा जागतिक बाजारातील हा सर्वोच्च दर आहे. यापूर्वी फेब्रुवारी २०१३मध्ये जागतिक बाजारात सोने १६१७ लर प्रति औसपर्यंत वधारले होते.

अमेरिका आणि इराण यांच्यातील तणाव वाढल्यास नजिकच्या काळात सोने ४५ हजार रूपयांपर्यंत वाढेल असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. यापुढे बाजारात अशीच परिस्थिती राहिल्यास गुंतवणूकदारांना मात्र सोन्यात गुंतवणूक करण्याशिवाय पर्याय नसेल अशी परिस्थिती सध्या दिसून येत आहे. लग्नसराईच्या काळात बाजारात एवढी उलाढाल होत असल्याने सोनेखरेदी करणाऱ्या ग्राहकांसमोर मात्र मोठी अडचण निर्माण होत आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी