सोने खरेदीची सुवर्णसंधी, भारतात पहिल्यांदाच सोने मिळते आहेत डिस्काऊंटमध्ये

काम-धंदा
Updated May 02, 2021 | 14:58 IST | टाइम्स नाऊ मराठी

या वर्षी पहिल्यांदाच देशातील अधिकृत भावापेक्षा सोन्याच्या भावावर सूट दिली जाते आहे. सोन्याचे व्यापारी किंवा सराफ सोन्याच्या अधिकृत भावावर २ डॉलर प्रति औंसचा डिस्काऊंट देत आहेत.

Discount on retail gold price
सोन्याच्या भावात मिळतोय डिक्काऊंट 

थोडं पण कामाचं

  • देशातील सराफा बाजारातील मागणीवर परिणाम
  • सोन्याच्या अधिकृत भावावर डिस्काऊंट
  • २ डॉलर प्रति औंसचा डिस्काऊंट

नवी दिल्ली : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे देशभर निर्बंध लागू करण्यात आलेले आहेत. त्यामुळे या वर्षी पहिल्यांदाच देशातील अधिकृत भावापेक्षा सोन्याच्या भावावर सूट दिली जाते आहे. कोविड-१९च्या निर्बंधांमुळे देशातील सराफा बाजारातील मागणीवर परिणाम झाला आहे. त्यामुळे सोन्याचे व्यापारी किंवा सराफ सोन्याच्या अधिकृत भावावर २ डॉलर प्रति औंसचा डिस्काऊंट देत आहेत. 

सोने डिस्काऊंट दरात


यावर्षी पहिल्यांदाच भारतात सोने डिस्काऊंट दरात मिळते आहे. मागील काही दिवसात सोन्याच्या भावात घसरण झाली आहे. भारतात सोन्याच्या भावामध्ये १०.७५ टक्के आयात शुल्क आणि ३ टक्के जीएसटी कर यांचा समावेश असतो. 'जवळपास प्रत्येक राज्य सरकारने कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची रोखथाम करण्यासाठी वेगवेगळे निर्बंध लागू केले आहेत. सराफा बाजार, दागिन्यांची दुकाने यामुळे एकतर बंद आहेत किंवा दुकानांमध्ये ग्राहकांची संख्या फारच कमी आहे,' असे मत मुंबईतील एका सराफाने व्यक्त केले.

लॉकडाऊनचा परिणाम


यावर्षी चालू तिमाहीमध्ये भारतातील सोन्याच्या मागणीवर लॉकडाऊनचा परिणाम झाला आहे, असे मत वर्ल्ड गोल्ड कौन्सिलने या आठवड्यात व्यक्त केले आहे. त्याउलट याआधीच्या तिमाहीत म्हणजेच जानेवारी ते मार्च या कालावधीत भारतात सोन्याच्या मागणीत ३७ टक्क्यांची वाढ होत ती १४० टनांवर पोचली होती. या कालावधीत सोन्याच्या भावातदेखील घसरण झाली होती.

वायदा बाजार


सोन्याच्या भावाला ४६,५०० ते ४६,६०० रुपये प्रति १० ग्रॅमच्या दरम्यान बाजाराचा सपोर्ट आहे. म्हणजेच या पातळीत सोन्याचा भाव राहण्याची शक्यता आहे. मात्र सोने विकत घेताना म्हणजेच वायदा बाजारात सोन्याचा व्यवहार करताना ४५,८०० रुपयांच्या पातळीवर स्टॉपलॉस लावावा, असे मत कॅपिटलव्हाया इन्व्हेस्टमेंट अॅडव्हायर्सने व्यक्त केले आहे. एमसीएक्स मधील यापुढील सत्रांमध्ये एमसीएक्स गोल्ड फ्युचर म्हणजेच सोन्याचा वायदा तेजी राहण्याची चिन्हे आहेत. वायदा बाजारात सोने ४९,००० रुपये प्रति १० ग्रॅमच्या पातळीवर राहील. ट्रेडिंग करणाऱ्यांचा कल बाय ऑन डिप्सकडे राहण्याची शक्यता आहे, असे मत पुढे कॅपिटलव्हाया इन्व्हेस्टमेंट अॅडव्हायर्सने व्यक्त केले आहे.

आंतरराष्ट्रीय घटकांचा परिणाम


मागील काही दिवसात सोन्याच्या भावात थोडीशी घसरण झाली आहे. याआधी मागील आठवड्यात सोन्याच्या भावात तेजी दिसून आली होती. मात्र काही दिवसांपूर्वीच अमेरिकेच्या जीडीपीमध्ये अपेक्षेपेक्षा जास्त सुधारणा होण्याची चिन्हे आणि अमेरिकन कर्जरोख्यांच्या परताव्यातील सुधारणा यामुळे गुंतवणुकदारांचा कल बदलला आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर गुंतवणुकदारांनी सोन्यातील गुंतवणूक अमेरिकेतील कर्जरोख्यांकडे वळवल्याची चिन्हे आहेत. या आंतरराष्ट्रीय घटकांचा आणि देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे सुरू असलेल्या निर्बंधांचा परिणाम सोन्याच्या भावावर झाला आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे निर्माण झालेल्या अस्थिर परिस्थितीत सोन्यातील गुंतवणुकीचे महत्त्व वाढते. कारण सोने हा गुंतवणुकीचा सर्वात सुरक्षित पर्याय समजला जातो. त्यामुळे जागतिक अर्थव्यवस्थेत अस्थिरता निर्माण झाल्यास सोन्याच्या भावात तेजी येते. मागील वर्षी लॉकडाऊननंतर सोन्याच्या भावाने ऐतिहासिक उच्चांकी गाठली होती. त्यानंतर मात्र  सोन्याच्या भावात थोडीशी घसरण झाली होती.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी