Gold Price Today: दिवाळीनंतर सोनं-चांदीच्या दरात मोठी घसरण, पाहा आजचा भाव

Gold Rate: दिवाळी संपल्यानंतर आता सोनं आणि चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. मंगळवारी सोनं-चांदीच्या दरात घसरण झाल्यानंतर नवा भाव काय आहे जाणून घेऊयात...

gold price fall down silver rate today diwali mumbai delhi sarafa bazar  jewelers business news marathi
प्रातिनिधीक फोटो  |  फोटो सौजन्य: BCCL

थोडं पण कामाचं

  • दिवाळीनंतर सोनं झालं स्वस्त
  • सोनं-चांदीच्या दरात घसरण 
  • पाहा काय आहे सोनं-चांदीचा नवा भाव

नवी दिल्ली: आंतरराष्ट्रीय बाजारात सोनं आणि चांदीची मागणी कमी झाल्याने मंगळवारी सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. दिल्लीतील सराफा बाजारात सोन्याच्या दरात ५४८ रुपयांनी घसरण झाल्याने सोन्याचा भाव ३८,८५७ रुपये प्रति दहा ग्रॅम इतका झाला आहे. गेल्या आठवड्यात म्हणजेच शुक्रवारी धनत्रयोदशीच्या दिवशी सोन्याचा भाव ३९,४०५ रुपये प्रति दहा ग्रॅम इतका होता.

सोन्याच्या दराप्रमाणेच, चांदीच्या दरातही घसरण झाली आहे. चांदीच्या दरात तब्बल १,१९० रुपयांनी घसरण झाली आहे. यामुळे चांदीचा दर ४७,०९० रुपये प्रति किलोग्रॅमवर पोहोचला आहे. शुक्रवारी चांदीचा दर ४८,२८० रुपये प्रति किलोग्रॅम इतका होता. एचडीएफसी सिक्युरिटीजचे तपन पटेल यांनी सांगितले की, दिवाळीच्या सुट्टीनंतर आंतरराष्ट्रीय बाजारात मागणी कमी झाली आहे. त्यामुळे दिल्लीत २४ कॅरेट सोन्याच्या दरात ५४८ रुपयांनी घसरण झाली आहे.

दिवाळीच्या सुट्टीनंतर भाऊबीज सणामुळे अहमदाबाद सारखा प्रमुख बाजार बंद आहे. त्यामुळे सुद्धा सोन्याच्या मागणीत कमी झाली आहे. अमेरिका आणि चीन यांच्यात सुरु असलेल्या करार व्यापाराच्या आशेमुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या भावात घसरण कायम राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा भाव १,४९३ डॉलर प्रति ओंस इतका झाला आहे. तर चांदीच्या दरात घसरण झाल्याने चांदीचा भाव १७.७७ डॉलर प्रति औंस इतका झाला आहे. तपन पटेल यांनी सांगितले की, सोने व्यापाऱ्यांची नजर आता फेडरल ओपन मार्केट समिती (एफओएमसी)च्या बैठकीकडे लागल्या आहेत. या बैठकीनंतर सोन्याच्या दरात बदल होण्याची दाट शक्यता आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून सोनं आणि चांदीच्या दरात दिवसेंदिवस वाढ होत असल्याचं पहायला मिळत होतं. दिवाळीच्या काळातही सोनं आणि चांदीचे दर वाढले होते. त्यानंतर आता दिवाळी संपल्यावर सोनं-चांदीच्या दरात घसरण झाली आहे. त्यामुळे सोनं खरेदी करणाऱ्यांना एक दिलासा मिळाला आहे. या घसरणीमुळे आता सोनं आणि चांदीचे दागिने खरेदी करण्याकडे नागरिकांचा कल वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी