सोने खरेदीत विलंब नको, एप्रिलमध्ये सोन्याचा भाव ३ हजारांनी वाढला, आगामी काळात सोन्यात तेजीची शक्यता

काम-धंदा
Updated Apr 17, 2021 | 14:31 IST | टाइम्स नाऊ मराठी

एप्रिल महिन्यात सोन्याच्या भावात ७ टक्क्यांनी वाढ होत सोने ४७,१६९ रुपये प्रति १० ग्रॅमवर पोचले आहे. एप्रिल महिन्यातच सोन्याच्या भावात २,९७९ रुपयांची वाढ झाली आहे.

Gold-Silver prices started booming
सोने-चांदीच्या भावात पुन्हा तेजी 

थोडं पण कामाचं

  • सोने आणि चांदीच्या भावात पुन्हा एकदा तेजी
  • एप्रिलमध्ये सोन्याच्या भावात ७ टक्क्यांनी वाढ
  • सोने ५२ हजारांच्या पातळीवर पोचण्याची शक्यता

नवी दिल्ली : कोरोना महामारीच्या काळात सोने आणि चांदीच्या भावात पुन्हा एकदा तेजी आली आहे. एप्रिल महिन्यात सोन्याच्या भावात ७ टक्क्यांनी वाढ होत सोने ४७,१६९ रुपये प्रति १० ग्रॅमवर पोचले आहे. एप्रिल महिन्यातच सोन्याच्या भावात २,९७९ रुपयांची वाढ झाली आहे. कोरोनाचा संसर्ग देशभर मोठ्या प्रमाणावर वाढतच चालला आहे. ही परिस्थिती पाहता आगामी काळात सोन्याच्या भावात आणखी तेजी येण्याची शक्यता तज्ज्ञ वर्तवत आहेत. एमसीएक्सवर सोन्याचा भावा ४७,३५० रुपये प्रति १० ग्रॅमवर पोचला आहे.

चांदीच्या भावात ९ टक्क्यांची वाढ


एप्रिल महिन्यात चांदीच्या भावात ९ टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे. ३१ मार्च २०२१ला बाजार बंद होण्याच्या वेळेस चांदीचा भाव ६२,८६२ रुपये प्रति किलो इतका होता. तर आता चांदीचा भाव ६८,८१० रुपये प्रति किलोवर पोचला आहे. म्हणजेच एप्रिल महिन्यात चांदी ५,९४८ रुपयांनी महाग झाली आहे.

मागील वर्षी कोरोनामुळे सोने विक्रमी पातळीवर


मागील वर्षी कोरोना महामारीची सुरूवात झाल्यानंतर देशभर लॉकडाऊन लावण्यात आले होते. त्याचा विपरित परिणाम होत शेअर बाजार गडगडला होता. परिणामी सोन्याचा भाव विक्रमी पातळीवर पोचला होता. ऑगस्ट २०२० मध्ये सोने विक्रमी ५६,२०० रुपये प्रति १० ग्रॅमच्या उच्चांकीवर पोचले होते. कोरोना महामारीमुळे गुंतवणुकदारांमध्ये भीतीचे आणि चिंतेचे वातावरण होते. अशा वेळी सोन्यासारखी गुंतवणूक ही नेहमी सुरक्षित समजली जाते. त्यामुळे जगभरातून सोन्यातील गुंतवणुकीत मोठी वाढ झाली होती. त्याचाच परिणाम होत सोन्याचा भाव आजपर्यतच्या उच्चांकी पातळीवर पोचला होता. आता पुन्हा एकदा तशीच परिस्थिती निर्माण झाली आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात सोने १,७७७ डॉलर प्रति औंसच्या पातळीवर


आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या भावात मोठी तेजी दिसून येते आहे. सोन्याच्या भावात झपाट्याने वाढ होते आहे. सोन्याचा भाव १,७७७ डॉलर प्रति औंसवर पोचला आहे. १ एप्रिलला सोन्याचा भाव १,७३० डॉलर प्रति औंस इतका होता. म्हणजेच या कालावधीत आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा भाव ३ टक्क्यांनी वधारला आहे.

५२ हजारांच्या पातळीवर पोचू शकते सोने


आयआयएफएल सिक्युरिटिजचे उपाध्यक्ष अनुज गुप्ता यांच्या म्हणण्यानुसार जेव्हा बाजारात किंवा अर्थव्यवस्थेत अस्थिरता, अनिश्चिततेचे वातावरण तयार होते तेव्हा सोने महाग होण्यास सुरूवात होते. आतासुद्धा कोरोना महामारीमुळे जगभर अनिश्चिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. अशा वातावरणात सोन्याचा भाव वाढत असतो. आगामी काळात सोन्याचा भाव पुन्हा एकदा ५०,००० रुपये ते ५२,००० रुपये प्रति १० ग्रॅमच्या पातळीवर पोचू शकतो.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा परिणाम


देशातील बहुतांश भागात लॉकडाऊन लागले आहे. यामुळे लोकांच्या मनात पुन्हा एकदा कोरोनाविषयी भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याशिवाय शेअर बाजारातदेखील चढ उतार पाहण्यास मिळत आहेत. अशा परिस्थितीत सोन्यामधील गुंतवणूक वाढण्याची मोठी शक्यता आहे. यामुळेदेखील सोन्याच्या भावात मोठी तेजी येईल, असे मत केडिया कमोडिटीचे संचालक अजय केडिया यांनी व्यक्त केले आहे.

याव्यतिरिक्त लग्नसराईचा काळ सुरू होतो आहे. त्यामुळेदेखील सराफा बाजारामध्ये सोन्याची खरेदी वाढली आहे. शिवाय मागील महिन्यात डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या मूल्यात घसरण झाली आहे. रुपयाचे मूल्य ७५ रुपये प्रति डॉलरवर पोचले आहे. यामुळे गुंतवणुकदार शेअरमधून पैसा काढून सोन्यात गुंतवणूक करण्यास सुरूवात करतात, परिणामी सोन्याच्या भावात तेजी येते.
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी