Gold rate: जानेवारी-फेब्रुवारीपर्यंत ५००० रुपयांनी स्वस्त होऊ शकतं सोनं, जाणून घ्या कारण...

Gold rate: कोरोना आणि लॉकडाऊनच्या काळात सोन्याच्या भावात मोठी वाढ झाल्याचं पहायला मिळत आहे. सोन्याच्या भावात वाढ होत असतानाच आता सोनं स्वस्त होण्याचे संकेत मिळत आहेत. 

gold rate
प्रातिनिधीक फोटो  |  फोटो सौजन्य: BCCL

मुंबई : सोन्याच्या भावात (Gold rate) गेल्या काही महिन्यांत मोठी वाढ झाल्याचं पहायला मिळालं. ऑगस्ट महिन्याच्या सोन्याच्या भावाने उच्चांक गाठला होता त्यानंतर आता घसरण झाली आहे. आता येत्या काळातही सोने-चांदीचा भाव घसरणार (Gold-Silver rate may fall down) असल्याचं बोललं जात आहे. तज्ञांच्या मते, येत्या तीन महिन्यांत सोन्याच्या सध्याच्या किमतीत ५००० रुपयांपर्यंत घसरण होऊ शकते.

सोन्याच्या किमतीत घसरण होणार?

यावर्षी भारतातच नाही तर संपूर्ण जगभरात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव पहायला मिळाला आणि त्यामुळे लॉकडाऊन लागू झाला. या कोरोना आणि लॉकडाऊनच्या परिस्थितीत सुरक्षित गुंतवणुकीसाठी गुंतवणुकदारांनी सोन्यात गुंतवणूक केली. आता कोरोनाची लस लवकरच उपलब्ध होणार असल्याचं वृत्त आहे आणि त्यामुळे सोन्याच्या भावात १००० रुपये प्रति दहा ग्रॅम इतकी घट झाली आहे. तज्ञांच्या मते, सोन्याच्या भावात सुरू असलेली ही घसरण पुढेही कायम राहील. सध्या सोन्याचा जो भाव आहे त्यामध्ये ५००० रुपये प्रति दहा ग्रॅम पर्यंत घट होऊ शकते.

अमेरिकन औषध निर्माता कंपनी Pfizerने दावा केला आहे की, त्यांनी तयार केलेली कोरोनावरील लस तिसऱ्या टप्प्यात ९५% यशस्वी असल्याचे आढळले आहे. मॉडर्नाने म्हटलं की, त्यांची कोरोनावरील लस ९४.५% प्रभावी आहे. याशिवाय सीरम इंस्टिट्यूटने सुद्धा म्हटलं आहे की, भारतात तीन ते चार महिन्यांत लस उपलब्ध होईल. ऑक्सफर्ड विद्यापीठाने म्हटलं की, त्यांची कोरोनावरील लस ९० टक्क्यांपर्यंत प्रभावी आहे. ऑक्सफर्डतर्फे तयार करण्यात येत असलेल्या लस तयार करण्याच्या कामात भारतातील सीरम इंस्टिट्यूटचा समावेश आहे.

ब्रोकरेज फर्म एंजल ब्रोकिंगचे उपाध्यक्ष (कमॉडिटी अँण्ड रिसर्च) अनुज गुप्ता म्हणतात की, कोरोना लसीच्या संदर्भात चांगल्या बातम्या आल्यावर सोने-चांदीच्या भावात घसरण होऊ लागली आहे. पुढील काळातही सोन्याच्या भावात घसरण होऊ शकते. नवीन वर्षापर्यंत कोरोनावर लस उपलब्ध झाली तर एमसीएक्सवर सोन्याच्या भावात घसरण होऊन ४५,००० रुपयांपर्यंत येऊ शकतात.

मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेसचे एव्हीपी (कमोडिटी आणि चलन) अमित सजेजा यांच्या मते, शॉर्ट टर्ममध्ये सोन्याच्या भावात घसरण झाली आहे. कोरोनाची लस जर बाजारात आली तर सोन्याच्या किमतीत घट होऊन ४८,००० रुपये प्रति दहा ग्रॅमहून खाली येऊ शकतात.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी