नवी दिल्ली: दिवाळीपूर्वीच नागरिकांना एक आनंदाची आणि गोड बातमी मिळाली आहे. कारण, गेल्या अनेक दिवसांपासून सोन्याच्या दरात होत होती मात्र दिवाळीपूर्वी सोनं स्वस्त झालं आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात मागणी कमी झाल्यामुळे सोन्याच्या दरात किरकोळ घसरण झाल्याचं पहायला मिळत आहे. एचडीएफसी सिक्युरिटीच्या मते, सोमवारी राष्ट्रीय राजधानी दिल्लीमध्ये सोन्याच्या दारत ३० रुपयांनी किरकोळ घसरण झाली आहे.
सोन्याच्या दरात ३० रुपयांनी घसरण झाल्यामुळे सोन्याचा दर ३८,९५५ रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचला आहे. यापूर्वी शनिवारी सोन्याचा दर ३८,९८५ रुपये प्रति १० ग्रॅम इतका झाला होता. एचडीएफसी सिक्युरिटीच्या तपन पटेल यांनी सांगितले की, "सणासुदीच्या काळात सोन्याची मागणी कमी झाली आहे आणि त्यासोबतच आंतरराष्ट्रीय बाजारातही मागणी कमी झाली आहे. यामुळे दिल्लीतील सराफा बाजारात २४ कॅरेट सोन्याच्या दरात ३० रुपयांची घसरण झाली आहे. यामुळे सोन्याचा दर ३८,९५५ रुपये प्रति १० ग्रॅम इतका झाला आहे".
एकीकडे सोन्याच्या दरात घसरण झाली आहे तर दुसरीकडे चांदीच्या दरात वाढ झाल्याचं पहायला मिळत आहे. सोमवारी चांदीच्या दरात १५० रुपयांची वाढ झाली आहे. या वाढीमुळे चांदीचा दर ४६,७५० रुपये प्रति किलोग्रॅमवर पोहोचला आहे. यापूर्वी चांदीचा दर ४६,६०० रुपये प्रति किलोग्रॅम इतका होता.
आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा दर १,४८८.७६ डॉलर प्रति औंस आणि चांदीचा दर १७.६७ प्रति औंसवर पोहोचला आहे. अमेरिका-चीन यांच्यात सुरु असलेल्या व्यापार युद्धामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या दरात घसरण झाली असल्याचं बोललं जात आहे. सणासुदीच्या काळात, दिवाळीत सोनं खरेदी करण्याकडे ग्राहकांचा कल अधिक असतो. आता दिवाळीपूर्वी सोन्याच्या दरात घसरण झाल्याने सोनं खरेदीत वाढ होणार असल्यचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.