Gold Silver Rates: सोन्या चांदीच्या दरात घसरण, जाणून घ्या कारण

काम-धंदा
Updated Jun 11, 2019 | 18:44 IST | टाइम्स नाऊ मराठी

Gold Silver Rates: दोन दिवसांत स्थानिक सुवर्ण कारागीर आणि ज्वेलर्सकडून मागणी कमी झाल्यामुळे देशात सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. दुसरीकडे चांदीला स्थानिक उद्योजकांकडून तसेच नाणी उत्पादकांकडून मागणी घटली आहे.

Gold Silver Rates
सोने-चांदी दरात घसरण  |  फोटो सौजन्य: Thinkstock

नवी दिल्ली : सोन्याचा दरात देशात आज, मंगळवारी घसरण अनुभवायला मिळाली. दिल्लीच्या सराफ बाजारपेठेत सोन्याचे दर प्रति तोळा ३६० रूपयांनी घसरले आहेत. घसरणीनंतर सोन्याचा दर प्रती दहा ग्रॅम ३३ हजार ३७० रूपयांवर आला होता. अखिल भारतीय सराफ संघटनेने दिलेल्या माहितीनुसार गेल्या दोन दिवसांत स्थानिक सुवर्ण कारागीर आणि ज्वेलर्सकडून मागणी कमी झाल्यामुळे देशात सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. दुसरीकडे चांदीला स्थानिक उद्योजकांकडून तसेच चांदीच्या नाणी उत्पादकांकडून मागणी घटली आहे त्यामुळे चांदीच्या दरातही घसरण पाहायला मिळत आहे. चांदीचे दर प्रति किलो २९० रूपयांनी घसरून ३७ हजार ५६० रूपयांवर आले आहेत. दिल्ली प्रमाणाचे चेन्नई, मुंबई, हैदराबाद, बंगळुरू, इंदौर या शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर सोन्या चांदीची मागणी असते. तेथेही दरात घसरण पाहायला मिळत आहे.

कशामुळे घसरले दर?

देशातील सराफी बाजारांतील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार स्थानिक बाजारात दागिण्यांची मागणी घटली आहे. त्यामुळेच कारागीर आणि ज्वेलरी उत्पादकांकडून सोन्याला मागणी नाही. परिणामी त्याच्या दरांमध्ये काही प्रमाणात घसरण होताना दिसत आहे. आंतरराष्ट्रीय घडामोडींचा तसेच तेलांच्या किंमतींचा, रूपयांच्या आणि डॉलरच्या किंमतींचा परिणाम सोन्याच्या दरांवर होत असतो. काही दिवसांपूर्वी अमेरिकेने मेक्सिकोविरोधात युद्ध छेडण्याची घोषणा केली होती. पण, तो वाद आता थंडावल्यानं सोन्याच्या दरांवर त्याचाही परिणाम होताना दिसत नाही. युद्धजन्य परिस्थितीत सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे पाहिले जाते. पण, अमेरिका मेक्सिको यांच्यातील तणाव निवळल्यानं सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याची मागणी घसरली आहे. त्यामुळे न्यूयॉर्कच्या बाजारात सोन्याच्या दरात घसरण पाहायला मिळाली. तेथील बाजारपेठेत सोन्याचा दर १ हजार ३२२.७० डॉलर प्रति औंस वर आला तर चांदीही प्रति औंस १४.७४ डॉलरवर आल्याचे दिसले. त्याचे पडसाद भारतातील सोन्याच्या दरांवर झाल्याचे दिसले.

काय आहेत दर?

सध्या दिल्ली सराफ बाजारपेठेत ९९.९ टक्के शुद्ध सोन्याचा दर ३६० रूपयांनी घसरून ३३ हजार ३७० रूपये प्रति तोळ्यावर आला आहे. तर ९९.५ टक्के शुद्ध सोन्याचा दर प्रति दहा ग्रॅम ३६० रूपयांनी घसरून ३३ हजार २०० रूपयांवर आला आहे. आठ ग्रॅमचे सोन्याचे नाणे मात्र २६ हजार ७०० रूपये दरानेच विकले जात आहे. चांदी २९० रूपयांनी घसरून प्रति किलो ३७ हजार ५६० रूपयांवर आली आहे. चांदीच्या नाण्यांचा लिलाव ८० हजार रूपये तर विक्री ८१ हजार रूपये शेकडा या दरानेच झाली आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी