सर्वसामन्यांना दिलासा, पेट्रोल-डिझेलच्या दरात कपात, जाणून घ्या आजचे दर

काम-धंदा
Updated Mar 11, 2020 | 15:06 IST | टाइम्स नाऊ मराठी

देशभरात इंधनाच्या दरात खूप घसरण झाली आहे. त्यामुळे ग्राहकांना चांगलाच दिलासा मिळाला आहे. जाणून घ्या देशातील प्रमुख शहरांमध्ये किती रुपयांनी कमी झाले पेट्रोल-डिझेलचे दर...

Petrol Diesel Price Rate
पेट्रोल, डिझेलच्या दरात कपात, जाणून घ्या आजचे दर  |  फोटो सौजन्य: Times of India

थोडं पण कामाचं

  • आंतरराष्ट्रीय तेल बाजारात कच्चा तेलाच्या किंमतींमध्ये तब्बल ३० टक्के घसरण
  • पेट्रोल-डिझेलच्या दरात मोठी घसरण, दोन रुपयांनी दर घसरले
  • नवी दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि चेन्नई या महानगरांमध्येही पेट्रोल-डिझेलच्या दरात कपात

नवी दिल्ली: आंतरराष्ट्रीय तेल बाजारात कच्चा तेलाच्या किंमतींमध्ये तब्बल ३० टक्के घसरण झाली आहे. याचाच फायदा भारतीय ग्राहकांना होतांना दिसतोय. कारण बुधवारी पेट्रोल-डिझेलच्या दरात मोठी घसरण झाली आहे. दिल्लीत पेट्रोलच्या दरात २.६९ रुपये प्रति लीटर तर डिझेलचे दर २.३३ रुपयांनी कमी झाले आहेत. आज दिल्लीमध्ये पेट्रोल ७०.२९ रुपये प्रती लीटर आणि डिझेल ६३.०१ रुपये प्रति लीटर किमतीत विकले जात आहे. तर मुंबईमध्ये पेट्रोलची ७५.९९ रुपये प्रति लीटर आणि डिझेलची ६५.९७ रुपये प्रति लिटरने विक्री होत आहे.

नवी दिल्ली आणि मुंबई सोबतच कोलकाता आणि चेन्नई या महानगरांमध्येही पेट्रोल-डिझेलचे दर घटले आहेत. कोलकाता इथं आजचे पेट्रोलचे दर ७२.९८ रुपये प्रति लीटर आणि डिझेलचे दर ६५.३५ रुपये प्रति लीटर आहे. तर चेन्नईमध्ये आज पेट्रोलची विक्री ७३.०२ रुपये प्रति लीटर आणि डिझेलची विक्री ६६.४८ रुपये प्रति लीटर दरानं होत आहे.

 

 

तेल उत्पादन कमी करण्यासाठी ओपेक आणि रशियामध्ये भांडण सुरू आहे. दोन्ही देशांमध्ये एकमत होऊ शकलं नाहीय त्यामुळे नवीन दर युद्धाची सुरुवात झाली आहे. याचाच परिणाम म्हणजे आंतरराष्ट्रीय तेल बाजारात कच्चा तेलाच्या किमतीमध्ये तब्बल ३० टक्क्यांनी घसरण झाली आहे. सौदी अरेबिया रशियाची कोंडी करण्यासाठी तेलाचे उत्पादन वाढवून किंमती कमी करणार आहे. त्यामुळं येणाऱ्या दिवसांमध्ये तेलाचे दर आणखी पडतील असं सांगितलं जातंय. शिवाय याचा फायदा भारतासह अन्य देशांना होण्याची शक्यता आहे.

खनिज तेलाच्या दरातील घसरण ही भारताच्या पथ्यावर पडणारी आहे. आयात खर्च लक्षणीय कमी होऊन, येत्या कालावधीत आणखी इंधन दर कपात झाली तर देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी ते दूरगामी फायद्याचं ठरेल. १९९१ साली आखातामध्ये झालेल्या युद्धानंतर प्रथमच आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या दरात इतकी मोठी घसरण झाली आहे. जागतिक बाजारात तेलाच्या दरात घसरण होत असल्यामुळं भारतातही पेट्रोल-डिझेल स्वस्त होत आहे.

त्यामुळे आता भारतीय ग्राहकांना याचा फायदा होताना दिसणार आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी