Earned Leave to government employees | नवी दिल्ली : केंद्र सरकार (Central Government)आणत असलेल्या नव्या वेज कोड म्हणजे नव्या वेतन संहितेची (New Wage Code) सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. आधी हे नियम ऑक्टोबर २०२१ पासूनच लागू होणार होते. मात्र राज्य सरकारांनी दिलेल्या काही प्रशासकीय अडचणींमुळे याला लागू करण्यात आले नाही. आता हे नवीन वेतन नियम २०२२ पासून लागू केले जाण्याची शक्यता आहे. राज्य सरकारांना तोपर्यत आपल्या नियमांचा मसूदा तयार करण्यासाठी वेळ मिळणार आहे. या नव्या वेतन संहितेअंतर्गत कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या सुट्ट्या (Earned Leave), कर्मचाऱ्यांचे वेतन (Salary)यामध्ये बदल होणार आहेत. पाहूया नेमके कोणते बदल होणार आहेत. (Government employees to get 300 earned leaves, check the details)
कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या पगारी सुट्ट्या (Earned Leave)मध्ये वाढ होऊन त्या २४० वरून वाढून ३०० वर जाण्याची शक्यता आहे. लेबर कोडमधील नियमातील बदलांसंदर्भात श्रम मंत्रालय, लेबर युनियन आणि उद्योगजगताचे प्रतिनिधी यांच्यात अनेक तरतुदींवर चर्चा झाली. यामध्ये कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या पगारी सुट्ट्यांची संख्या वाढवून २४० वरून ३०० वर नेण्याची मागणीदेखील करण्यात आली होती.
नव्या वेतन संहितेनुसार कर्मचाऱ्यांच्या वेतनाच्या रचनेत बदल होणार आहे. त्यामुळे त्यांच्या हाती येणारा पगार कमी होणार आहे. नव्या वेज कोडमध्ये असे स्पष्ट करण्यात आले आहे की कोणत्याही कर्मचाऱ्याचे भत्ते ते त्याच्या मूळ वेतनापेक्षा जास्त असता कामा नये म्हणजे भत्त्यांचे वेतनातील प्रमाण एकूण वेतनापेक्षा ५० टक्क्यांपेक्षा असता कामा नये. त्यामुळे जर एखाद्या कर्मचाऱ्याचा पगार जर ५०,००० रुपये असेल तर त्याची बेसिक सॅलरी २५,००० रुपये असली पाहिजे आणि बाकीचे त्याचे भत्ते २५,००० रुपयांमध्ये असले पाहिजेत. म्हणजेच सर्व कंपन्यांना आता कर्मचाऱ्यांची बेसिक सॅलरी वाढवावी लागणार आहे. आतापर्यत कंपन्या कर्मचाऱ्यांची बेसिक सॅलरी २५ ते ३० टक्के ठेवत असत आणि त्यात बाकीचा हिस्सा हा भत्त्यांचा असायचा. मात्र आता कंपन्यांना बेसिक सॅलरी ५० टक्क्यांपेक्षा कमी ठेवता येणार नाही. अशा परिस्थितीत कंपन्यांना नव्या वेज कोडच्या नियमांना लागू करण्यासाठी कर्मचाऱ्यांच्या भत्त्यांमध्येच कपात करावी लागणार आहे.
नव्या वेज कोडमध्ये अनेक तरतूदी करण्यात आल्या आहेत. यामुळे कार्यालयात, कारखान्यात काम करणाऱ्या नोकरदार कर्मचारी, मजूर यांच्यावर परिणाम होणार आहे. कर्मचाऱ्यांच्या वेतनापासून, त्यांना मिळणाऱ्या सुट्ट्या आणि कामाचे तास या सर्वच गोष्टींमध्ये नवी वेतन संहिता लागू झाल्यानंतर बदल होणार आहेत. या बदलांमुळे कर्मचाऱ्यांच्या आयुष्यामध्ये मोठा बदल होणार आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नव्या वेतन संहितेनुसार कामाचे तास वाढून १२ तास होणार आहेत. श्रम मंत्रालयाने म्हटले आहे की प्रस्तावित लेबर कोडमध्ये म्हटले आहे की आठवड्यात ४८ तासांच्या कामकाजाचाच नियम लागू राहणार आहे. मात्र काही युनियननी १२ तासांचे काम आणि तीन दिवसांची सुट्टी यावर प्रश्न उपस्थित केले होते. यावर सरकारने म्हटले आहे की आठवड्यात ४८ तासांच्या कामकाजाचाच नियम राहणार आहे, मात्र जर एखाद्याने दिवसाचे ८ तास काम केले तर त्याला ६ दिवस काम करावे लागेल आणि एकच सुट्टी मिळेल. जर एखाद्या कंपनीत १२ तासांचे मॉडेल अवलंबण्यात आले तर तिथे त्यांना कर्मचाऱ्यांना ३ दिवस सुट्टी द्यावी लागणार आहे. जर कामाचे तास वाढले तर कामाचे दिवस घटणार आहेत. मात्र यासाठी कर्मचारी आणि कंपनी या दोघांमध्ये सहमती असणे आवश्यक आहे.