सोन्याच्या दागिन्यांच्या किंमतींमुळे गोंधळ होतो आहे? हॉलमार्किंग आहे मदतीला

काम-धंदा
Updated Apr 19, 2021 | 15:43 IST | टाइम्स नाऊ मराठी

सोने आणि चांदीच्या दागिन्यांना तीन श्रेणींमध्ये हॉलमार्क केलेले असते. या तीन कॅटेगरी म्हणजे १४ कॅरेट (५८.५ टक्के शुद्धता), १८ कॅरेट (७५ टक्के शुद्धता) आणि २२ कॅरेट (९१.६ टक्के शुद्धता). दैनंदिन सोन्याच्या भाव आ

Government makes hallmarking mandatory for jewelers from 1 june 2021
तुमच्या दागिन्यांची खरी किंमत जाणा, हॉलमार्किंगच्या मदतीने 

थोडं पण कामाचं

  • हॉलमार्कचे दागिने सुरक्षित
  • १ जून २०२१ पासून हॉलमार्क बंधनकारक
  • हॉलमार्किंग सेंटरमध्ये दागिन्यांचे हॉलमार्किंग

नवी दिल्ली : लग्नसराई असो किंवा एखादा सण सोने विकत घेणे, भेट देणे हे भारतात नेहमीचेच आहे. सोन्याचा भाव पाहता सोन्याच्या दागिन्यांच्या खरेदीची रक्कम मोठी असते त्यामळे सोने विक घेताना सावधपणे विकत घेतले पाहिजे. 

हॉलमार्कचे महत्त्व


गुंतवणुकीच्या दृष्टीकोनातून सोने ही सर्वात सुरक्षित गुंतवणूक समजली जाते. तुम्ही जेव्हा सोन्याचा एखादा दागिना विकत घेत असता तेव्हा त्या दागिन्याच्या किंमतीसाठी पूर्णपणे सराफावर अवलंबून राहण्यापेक्षा त्याबद्दल तुम्हालाही काही माहिती असल्यास केव्हाही उत्तम. हॉलमार्कचे दागिने हे त्या प्रश्नावरील उत्तर आहे.

हॉलमार्कची अंतिम मुदत १ जून २०२१


सरकारने सराफांना १ जून २०२१ पासून हॉलमार्क असलेले सोने विकणे बंधनकारक केले आहे. याआधी हॉलमार्कचे सोने विकण्याची अंतिम मुदत १५ जानेवारी ही होती. मात्र कोविड-१९मुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे अतिंम मुदत वाढवण्यात आली आहे. यापुढे ही मुदत वाढवली जाणार नाही असे सरकारने स्पष्ट केले आहे. मात्र अनेक सराफांकडे सोन्याचा जुना साठा आहे आणि कोविड-१९मुळे तो साठा विकणे सराफांना शक्य होत नसल्याचे सांगत इंडिया बुलियन अॅंड ज्वेलरी असोसिएशनने(आयबीजेए) मुदतवाढीची मागणी केली आहे. हॉलमार्कचे बंधन लागू झाल्यानंतर सराफांना १४, १८ आणि २२ कॅरेटच्या हॉलमार्क असलेल्या दागिन्यांचीच विक्री करता येणार आहे. 

सोन्यातील भेसळ किंवा ग्राहकांची फसवणूक हे प्रकार टाळून सर्वसामान्य ग्राहकांचे हित सांभाळणे हे सरकारच्या हॉलमार्किंगच्या निर्णयामागचे मुख्य उद्दिष्ट आहे. यामुळे सोने व्यापाऱ्यांना सोन्याचा कायदेशीर दर्जा आणि गुणवत्ता राखणे बंधनकारक होणार आहे.

हॉलमार्कचे बंधन फक्त सराफांना, ग्राहकांना नाही


हॉलमार्किंगची योजना १ जून २०२१ पासून लागू होते की त्याला आणखी मुदतवाढ मिळते, सोन्याचे दागिने खरेदी करताना ग्राहकांनी नेहमी सराफाकडे हॉलमार्कचीच मागणी केली पाहिजे. यामुळे सोन्याच्या शुद्धतेविषयीची फसवणूक टाळता येते. अर्थात हॉलमार्क असलेलेच दागिने विकणे हे सराफांवर बंधनकारक आहे, मात्र ग्राहक आपल्याकडील हॉलमार्क नसलेले दागिने सराफांना विकू शकतात. त्यानंतर सराफ ते दागिने वितळवून त्यापासून १४, १८, २२ कॅरटचे इंडियन स्टॅंटर्ड आयएस 1417:2016 प्रमाणे नवीन दागिने बनवू शकतात आणि त्याला हॉलमार्किंग करून विकू शकतात.

हॉलमार्किंग सेंटर


हॉलमार्किंग सर्टिफिकेशन हे हॉलमार्किंग सेंटरद्वारे (एएचसी) केले जाते. हे सेंटर, बुरो ऑफ इंडियन स्टॅंडर्ड्स (बीआयएस) कडून मान्यताप्राप्त असले पाहिजेत. हॉलमार्किंग सेंटरमधून सोन्याचे हॉलमार्किंग करून घेण्यापूर्वी सराफांकडे बुरो ऑफ इंडियन स्टॅंडर्ड्सचे लायसन्स असणे आवश्यक आहे. हॉलमार्किंग सेंटरमध्ये दागिन्यांची शुद्धता तपासली जाते. ही चाचणी झाल्यानंतर हॉलमार्किंग सेंटर दागिन्यांवर त्यांच्या शुद्धतेप्रमाणे हॉलमार्कचे निशाण लावतात.

दागिन्यांची किंमत कशी कॅल्क्युलेट करावी


जर सोने १४ कॅरेटचे असेल तर त्याचा अर्थ ५८.५ टक्के शुद्धता तर १८ कॅरेटचे सोने म्हणजे ७५ टक्के शुद्धतता. १८ कॅरेटच्या सोन्यावर १८के७५० आणि २२ कॅरेटच्या सोन्यावर २२के९२१६ असे हॉलमार्कचे निशाण असते. उदाहरणार्थ, जर तुम्ही २२ कॅरेटचे १० ग्रॅम सोने विकत घेत असाल आणि २४ कॅरेट सोन्याचा प्रति १० ग्रॅमचा भआव ४०,००० रुपये असेल तर तुमच्या सोन्याचे बाजारमूल्य ४०,००० रुपयांच्या ९१.६ टक्के इतके असेल. म्हणजेच २२ कॅरेट १० ग्रॅमची किंमत ३६,६४० रुपये इतकी असेल. शिवाय सराफ त्यावर दागिने बनवण्याचे शुल्क आणि सोन्यावरील कर इत्यादीची जोडणी करेल. जर तुमचे सोने हॉलमार्कचे असेल तर तुम्ही तुमच्या दागिन्यांची किंमत पारदर्शकपणे कॅल्क्युलेट करू शकता.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी