GST Council Meeting : नवी दिल्ली : लवकरच अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली जीएसटी कौन्सिलची (GST Council)बैठक होणार आहे. जीएसटी कौन्सिलच्या या महत्त्वाच्या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले जातील. जीएसटी कौन्सिलच्या बैठकीत कॅसिनो आणि ऑनलाईन गेमिंगवर जीएसटी कर आकारण्यासंदर्भातील निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. यासंदर्भात, अर्थमंत्री निर्मला सीतारामन (FM Nirmala Sitharaman)यांच्या कार्यालयाने ट्विट केले की, 'जीएसटी कौन्सिलची 47 वी बैठक मंगळवार आणि बुधवारी 28 जून 2022 ते 29 जून 2022 दरम्यान होणार आहे.' विशेष म्हणजे ही बैठक श्रीनगरमध्ये होणार आहे. श्रीनगरमध्ये जीएसटी कौन्सिलची बैठक होण्याची ही दुसरी वेळ आहे. (GST may applied to casino & online gaming, on this GST council meeting to be held)
वस्तू आणि सेवा कर म्हणजे जीएसटी यंत्रणा(GST) 1 जुलै 2017 रोजी देशात लागू करण्यात आली. त्याची अंमलबजावणी होण्यापूर्वी, 18 आणि 19 मे रोजी श्रीनगरमध्ये परिषदेची 14 वी बैठक झाली. त्यानंतर दोन दिवसांच्या बैठकीत 1,211 उत्पादनांसाठी कर दर मंजूर करण्यात आले.
या महिन्याच्या अखेरीस होणाऱ्या GST कौन्सिलच्या आगामी बैठकीत कॅसिनो, हॉर्स रेसिंग आणि ऑनलाइन गेमिंगवरील GST दरांवर विचार केला जाईल. याशिवाय राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या समितीच्या दरांमध्ये सुसूत्रता आणण्याबाबतच्या अहवालावर बैठकीत चर्चा होणार आहे. एवढेच नाही तर काही प्रक्रिया शिथिल करण्याबाबतही या बैठकीत विचार होऊ शकतो.
17 जून रोजी, जीएसटी परिषदेच्या बैठकीपूर्वी, मंत्री गट कर स्लॅबमधील संभाव्य बदलांवर चर्चा करू शकतात. राज्य मंत्र्यांची एक समिती सामंजस्याने जीएसटी दरांच्या संभाव्य बदलांवर विचार करेल. समितीचा अंतिम अहवाल येण्यास वेळ लागेल. महत्त्वाची बाबी अशी की, गेल्या वर्षी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या अध्यक्षतेखाली राज्यमंत्र्यांची समिती स्थापन करण्यात आली होती.
एप्रिल 2022 मध्ये देशात उच्चांकी जीएसटी महसूल संकलन झाला आहे. या सगळ्यात पुन्हा महाराष्ट्रात सर्वाधिक जीएसटी संकलन झाला असून गेल्या वर्षीच्या तुलनेत ही वाढ तब्बल 25 टक्के इतकी आहे. एप्रिल 2022 मध्ये एकत्रित जीएसटी म्हणजेच वस्तू आणि सेवाकर महसूल संकलन 1,67,540 कोटी रुपये इतके झाले आहे. यात सीजीएसटी अर्थात केंद्रीय वस्तू आणि सेवा करापोटी 33,159 कोटी, एसजीएसटी अर्थात राज्य सरकारच्या वस्तू आणि सेवा करापोटी 41,793 कोटी, आयजीएसटी म्हणजेच एकात्मिक वस्तू आणि सेवा करापोटी 81,939 कोटी (माल आयातीवर संकलित केलेल्या 36,705 कोटींसह) आणि उपकर 10,649 कोटी रुपये यांचा समावेश आहे.
महाराष्ट्रात गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात 22 हजार 13 कोटी जीएसटी संकलन झाला होता. त्यात 25 टक्क्यांनी वाढ होऊन या वर्षी एप्रिलमध्ये राज्यातून 27 हजार 495 कोटी रुपयांचा जीसटी संकलन झाले आहे. यंदाही महाराष्ट्र जीएसटी संकलनात सर्वप्रथम आहे.