PAN card frauds:नवी दिल्ली: देशातील आघाडीची खासगी बॅंक असलेल्या एचडीएफसी बॅंकेने (HDFC Bank)आपल्या ग्राहकांना एक सावधगिरीचा इशारा दिला आहे. सध्या एचडीएफसी बँकेच्या ग्राहकांना एका घोटाळ्याचा (Fraud)सामना करावा लागत आहे. ज्यामध्ये फसवणूक करणारे एसएमएस किंवा ई-मेलद्वारे लिंक पाठवतात आणि ग्राहकाला लिंकवर क्लिक करून पॅन कार्ड माहिती अपडेट करण्यास सांगतात. त्यानंतर ग्राहकाची पॅन कार्डची (PAN card frauds)माहिती मिळवून हा फ्रॉड केला जातो आहे. (HDFC Bank alerts customers regarding PAN card frauds & phishing attacks )
एचडीएफसी बॅंकेने आपल्या ग्राहकांना सावध करण्यासाठी एक ट्विट केले आहे. यात बॅंकेने म्हटले आहे की "#GoDigitalGoSecure आणि तुम्हाला तुमचे पॅन कार्ड तपशील अपडेट करण्यास सांगणाऱ्या अज्ञात लिंकवर कधीही क्लिक करू नका,"
याला फिशिंग स्कॅम म्हणून ओळखले जाते, ज्यामध्ये गुन्हेगार एक तृतीय-पक्ष फिशिंग वेबसाइट सुरू करतात. ही वेबसाईट आधीच अस्तित्वात असलेल्या अस्सल वेबसाइटची नक्कल असते. म्हणजेच बँकेची वेबसाइट, ई-कॉमर्स वेबसाइट, शोध इंजिन इत्यादींसारख्या वेबसाईटची नक्कल असते. फसवणूक करणारे या वेबसाइट्सच्या लिंक्स एसएमएस, सोशल मीडिया, ईमेल, इन्स्टंट मेसेंजर आणि इतर माध्यमातून वितरित करतात. बरेच ग्राहक अचूक युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर (URL) लक्षात न घेता लिंकवर क्लिक करतात आणि वैयक्तिक ओळख क्रमांक (PIN), वन टाइम पासवर्ड (OTP), पासवर्ड इत्यादी सुरक्षा क्रेडेन्शियल्सची माहिती त्यात देतात. ही माहिती फसवणूक करणारे गोळा करतात आणि वापरतात.
अधिक वाचा : Traffic Rule : ट्रॅफिक कॉन्स्टेबलने तुमच्या गाडीची चावी काढली, तर जागेवरच करा हे काम ; पाहा काय आहे नियम?
अज्ञात, बनावट लिंकवर क्लिक करणे टाळा आणि अज्ञात लोकांकडून मिळालेले असे एसएमएस आणि ईमेल भविष्यात चुकून अॅक्सेस होऊ नयेत यासाठी त्वरित हटवा. बँक, ई-कॉमर्स किंवा शोध इंजिन वेबसाइटच्या लिंक असलेले ईमेल हटवण्यापूर्वी, त्यांची सदस्यता रद्द करा आणि पाठवणाऱ्याचा ई-मेल आयडी ब्लॉक करा. नेहमी तुमच्या बँकेच्या किंवा सेवा देणाऱ्याच्या अधिकृत वेबसाइटवर जा. वेबसाइट तपशील काळजीपूर्वक तपासा, विशेषतः जेव्हा आर्थिक माहिती आवश्यक असेल. सुरक्षित क्रेडेन्शियल एंटर करण्यापूर्वी, वेबसाइटवर सुरक्षित संकेत (पॅडलॉक चिन्हासह https) पहा.
ईमेलद्वारे प्राप्त URL आणि डोमेन नावांमध्ये स्पेलिंग समस्या तपासा. संशय आल्यास कळवा.
डिजिटल पेमेंटचा वापर वाढला आहे. खासकरून कोविड-19 लॉकडाऊन दरम्यान याचे प्रमाण खूप वाढले आहे. मात्र आर्थिक व्यवहारांचा वेग वाढण्या बरोबरच किरकोळ आर्थिक व्यवहारांमध्ये फसवणुकीचे प्रमाण वाढले आहे. फसवणूक करणारे कल्पक युक्त्या वापरून सामान्य आणि भोळ्या व्यक्तींना त्यांच्या कष्टाने कमावलेल्या पैशाची फसवणूक करत आहेत. विशेषत: आर्थिक बाबींशी निगडीत नवीन तंत्रज्ञानावर आधारित व्यवस्थांशी आणि डिजिटल सेवांशी अपरिचित असणाऱ्या ग्राहकांची मोठ्या प्रमाणात फसवणूक केली जाते आहे.