Most Hightech Milk Dairy : एक लिटर दूध की किमत तुम क्या जानो! अंबानी, बच्चन, तेंडुलकरसह अनेक सेलेब्रिटींच्या घरी एकाच डेअरीचं रतीब

काम-धंदा
अमोल जोशी
Updated Jun 03, 2022 | 18:17 IST

एक लिटर दुधाची किंमत किती? असा प्रश्न विचारला तर प्रत्येकाचं उत्तर वेगवेगळं असेल. गायीचं दूध की म्हशीचं दूध, शहरी भाग की ग्रामीण भाग, ही कंपनी की ती कंपनी अशा अनेक घटकांवर दुधाचे दर कमी किंवा जास्त असतात. मात्र अंबानी, बच्चन, तेंडुलकर यांच्या घरी जाणाऱ्या दुधाचा दर माहित आहे?

Most Hightech Milk Dairy
सेलेब्रिटींची डेअरी  |  फोटो सौजन्य: Times of India
थोडं पण कामाचं
  • देशातील सर्वात अत्याधुनिक डेअरी
  • अंबानी, तेंडुलकर, बच्चन यांच्या घरी जातं या डेअरीचं दूध
  • विश्वासार्हतेपोटी मिळतो घसघशीत दर

Most Hightech Milk Dairy | दूध (Milk) हा प्रत्येकाच्या आरोग्यासाठी (Health) महत्त्वाचा असणारा घटक. गरीबापासून श्रीमंतांपर्यंत प्रत्येकाच्या आहारात (Diet) कमी जास्त प्रमाणात दुधाचा समावेश असतोच. सकाळच्या पहिल्या चहापासून अनेकविध पदार्थ तयार करण्यासाठी दुधाचा वापर करण्यात येतो. प्रत्येकजण आपापल्या जवळच्या डेअरीतून किंवा दुकानातून दूध घेत असतो. मात्र मुकेश अंबानी, अमिताभ बच्चन हे कुठून दूध घेत असतील, असा प्रश्न अनेकांना पडतो. या सेलेब्रिटींना मिळणाऱ्या दुथाचा दर्जा सामान्यांना मिळणाऱ्या दुधापेक्षा वेगळा असेल का आणि त्याची काय किंमत असेल, यासारख्या प्रश्नांची उत्तरं आता समोर आली आहेत. 

हायटेक डेअरी

ही आहे पुणे जिल्ह्यातील हायटेक असणारी भाग्यलक्ष्मी डेअरी. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून मॉडर्न पद्धतीनं ही डेअरी चालते. केवळ मुंबईतच नव्हे, तर देशातील वेगवेगळ्या शहरांत राहणारे सेलेब्रिटी याच डेअरीचं दूध घेतात. भाग्यलक्ष्मी डेअरीच्या गिऱ्हाईकांची नावं वाचून सगळेच थक्क होतील. या डेअरीचं दूध घेणाऱ्यांमध्ये मुकेश अंबानी, सचिन तेंडुलकर, अमिताभ बच्चन, ऋतिक रोशन, अक्षय कुमार यासारख्या बड्या स्टार्सचा समावेश आहे. 

एक लिटर दुधाची किंमत

भाग्यलक्ष्मी डेअरी ही पुणे जिल्ह्यातील मंचरजवळ आहे. या डेअरीमार्फत विकल्या जाणाऱ्या एक लिटर दुधाची किंमत आहे 152 रुपये. सुमारे 35 एकर परिसरात ही डेअरी उभी आहे आणि इथं 3000 पेक्षा जास्त गायी आहेत. 

High Tech Dairy

दररोज 25 हजार लिटर दूध

भाग्यलक्ष्मी डेअरीत दररोज 25 हजार लिटर दूध विकलं जातं. इथं अत्याधुनिक आणि हायजिनिक पद्धतीनं गायींचं दूध काढलं जातं. खात्रीलायक आणि दर्जेदार या दोन वैशिष्ट्यांमुळे इथल्या दुधाला जवळपास तिप्पट दर मिळतो. 

देवेंद्र शाहांची डेअरी

या डेअरीचे मालक आहेत देवेंद्र शाह. अगोदर ते कपड्यांचा व्यापार करत असत. मात्र काही वर्षांपूर्वी त्यांनी गायी विकत घेतल्या आणि दुधाचा व्यवसाय सुरू केला. सुरुवातीला 175 ग्राहक जोडून त्यांनी ‘प्राउड ऑफ काऊ’ हा प्रयोग लॉन्च केला होता. आता भाग्यलक्ष्मी डेअरीचे 25 हजारपेक्षाही जास्त ग्राहक आहेत. देशातील सर्व महानगरांमध्ये या डेअरीचं दूध पोहोचवलं जातं. 

गायींची काळजी

या ठिकाणी गायींची प्रचंड काळजी घेतली जाते. त्यांच्यासाठी विशिष्ट प्रकारची मॅट अंथरली जाते. दिवसातून तीन वेळा ही मॅट साफ केली जाते. इथल्या गायींना फक्त RO चंच पाणी दिलं जातं. गायींना चारा, सोयाबीन, भाज्या आणि मके असा आहार दिला जातो. गायींच्या धारा काढण्यापासून ते बाटलीत भरण्यापर्यंत सर्व बाबी ऑटोमॅटिक पद्धतीनं केल्या जातात.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी