गृहकर्जासाठी आवश्यक असतात 'ही' कागदपत्रे, अर्ज करण्यापूर्वी तपासा पूर्ण लिस्ट

काम-धंदा
Updated May 03, 2021 | 22:32 IST | टाइम्स नाऊ मराठी

Home Loan वर घर विकत घेण्यापूर्वी तुम्हाला या गोष्टीचे भान ठेवले पाहिजे की तुमचे बजेट किती आहे. तुमच्याकडे किती रोख रक्कम आहे आणि तुम्हाला जास्तीत जास्त किती कर्ज मिळू शकते, हे मुद्दे तुम्ही लक्षात घेतले पाहिजे

Documents required for home loan
गृहकर्जासाठी आवश्यक कागदपत्रे 

थोडं पण कामाचं

  • गृहकर्जासाठीची कागदपत्रे
  • घर विकत घेण्यासाठी सुवर्णसंधी
  • तुमच्या बजेटचा घ्या अंदाज

नवी दिल्ली : सध्या देशात असलेले गृहकर्जाचे व्याजदर हे मागील कित्येक वर्षांतील नीच्चांकीवर आहेत. कोरोना संकटकाळात रियल इस्टेट क्षेत्रात आलेली मंदी, निवासी मालमत्तेच्या किंमतीमध्ये झालेली घसरण आणि गृहकर्जाचे घटलेले व्याजदर यामुळे सध्या घर विकत घेण्यासाठी अतिशय अनुकूल परिस्थिती आहे, असे मत तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. तुम्हीही जर गृहकर्जावर एखादे घर किंवा मालमत्ता विकत घेण्याचा विचार करत असाल तर गृहकर्ज आणि त्याच्याशी संबंधित महत्त्वाच्या बाबींची पूर्ण माहिती असली पाहिजे. गृहकर्ज ही एक मोठी आर्थिक जबाबदारी असते. त्यामुळेच गृहकर्जाविषयीच्या सर्व महत्त्वाच्या बाबींबद्दल तुम्हाला आधीपासूनच सर्व माहिती असली पाहिजे.

होम लोन घेण्यापूर्वी या बाबींचे भान ठेवा


गृहकर्जावर घर विकत घेण्यापूर्वी तुम्हाला हे लक्षात घेतले पाहिजे कि तुमचे बजेट किती आहे. यासाठी तुमच्याकडे किती रक्कम उपलब्ध आहे आणि तुम्हाला जास्तीत जास्त किती गृहकर्ज मिळू शकते हे आधी लक्षात घेतले पाहिजे. शिवाय घर विकत घेताना त्याची नोंदणी आणि पझेशनसाठी तुम्हाला जो खर्च येणार असतो तितकी रक्कम तुमच्याकडे आहे का? यामुळे तुम्हाला तुमच्या बजेटचा अंदाज घेणे सोपे जाईल. या आधारावरच तुम्ही स्वत:साठी घर शोधण्यास सुरूवात करू शकता.

घर निश्चित करण्याबरोबर ही कागदपत्रे किंवा डॉक्युमेंट्सची जुळवाजुळव करा


होम लोन देण्याआधी बॅंका किंवा हाऊसिंग फायनान्स कंपन्या ग्राहकाबद्दल खातरजमा करू घेऊ इच्छितात. यासाठी होम लोनसाठी अनेक कागदपत्रांची आवश्यकता असते. कागदपत्रांना आपण मुख्यत्वे तीन प्रकारात विभागू शकता. केवायसीशी निगडीत कागदपत्रे, उत्पन्नाशी निगडीत कागदपत्रे आणि घराशी संबंधित कागदपत्रे.

गृहकर्जासाठी कोणत्या कागदपत्रांची पूर्तता करावी लागते त्याची पूर्ण लिस्ट पाहूया-

केवायसी साठी लागणारे कागदपत्रे -

यामध्ये पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट, आधार कार्ड, वोटर आयडी यामधील कोणत्याही कागदपत्राचा वापर करू शकता. तर तुमच्या वयाच्या दाखल्यासाठी तुमचे आधार कार्ड, १०वे मार्कशीट, पॅन कार्ड, पासपोर्ट, जन्माचा दाखला यापैकी कोणतेही एक कागदपत्र वापरता येते. त्याचबरोबर निवासाच्या किंवा पत्त्याच्या प्रमाणपत्रासाठी बॅंक पासबुक, टेलिफोन बिल, लाईट बिल, गॅस बिल, वॉटर बिल, वोटर आयडी, रेशन कार्ड, पासपोर्ट आणि एलआयसीची पॉलिसी इत्यादी कागदपत्रांपैकी एकाचा वापर करता येतो.

उत्पन्नाशी निगडीत कागदपत्रे -

जर तुम्ही पगारदार असाल तर मागील दोन ते तीन वर्षांसाठीचा फॉर्म-१६, दोन ते सहा महिन्यांसाठीची सॅलरी स्लिप, मागील तीन वर्षांसाठीचे प्राप्तिकर विवरण पत्र, गुंतवणुकीशी संबंधित कागदपत्रे (एफडी, शेअर इत्यादी), इन्क्रिमेंट किंवा प्रमोशनचे लेटर, पासपोर्ट साईजचे फोटो यांची आवश्यकता असते. जर तुमचा स्वत:चा व्यवसाय असेल तर तीन वर्षांचे प्राप्तिकर विवरणपत्र, बिझनेस लायसेन्स, बॅलन्स शीट आणि कंपनीचा नफा किंवा तोट्याशी निगडीत अकाउंट स्टेटमेंट (सीए कडून प्रमाणित),जर तुम्ही डॉक्टर किंवा सल्लागार आहात तर प्रोफेशनल प्रॅक्टिसचे लायसन्स, दुकानांच्या नोंदणीचे प्रमाणपत्र, बिझनेसच्या पत्त्याचे सर्टिफिकेट यासारखी कागदपत्रे तुम्हाला दाखवावी लागतील.

मालमत्ता किंवा विकत घेतल्या जाणाऱ्या घराची कागदपत्रे -

यामध्ये तुम्हाला अलॉटमेंट नंबर, बिल्डरने बॅंकांकडून घेतलेले एनओसी यासारख्या कागदपत्रांची आवश्यकता भासते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी