Passport application online: पासपोर्टसाठी ऑनलाईन अर्ज कसा कराल? जाणून घ्या सविस्तर

काम-धंदा
Updated Jul 13, 2019 | 23:07 IST | टाइम्स नाऊ डिजीटल

पासपोर्ट सेवा केंद्र या ऑनलाईन पोर्टलच्या मदतीनं आता पासपोर्ट काढणं खूप सोप झालंय. या पोर्टलद्वारे आपण पासपोर्ट ऑफिसची ऑनलाईन अपॉईन्मेंट घेऊ शकतो. तसंच पासपोर्टसाठी ऑनलाईन अर्ज करू शकतो. जाणून घ्या...

Passport
पासपोर्टसाठी अर्ज करणं झालं सोप्पं, जाणून घ्या नवीन बदल  |  फोटो सौजन्य: Thinkstock

थोडं पण कामाचं

  • पासपोर्ट सेवा केंद्राच्या ऑनलाईन पोर्टलवर करा पासपोर्टसाठी अर्ज
  • ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर मुलाखतीची वेळही ऑनलाईन होऊ शकते बुक
  • पासपोर्टसाठी अर्ज करणं झालंय सोप, सर्व माहिती ऑनलाईन उपलब्ध

नवी दिल्ली: पासपोर्ट म्हणजे आपल्या सरकारच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं जारी केलेलं आंतरराष्ट्रीय ओळख पत्र होय. कुठल्याही देशात जाण्यासाठी आपल्याजवळ पासपोर्ट असणं आवश्यक असतं. पूर्वी पासपोर्ट काढणं खूप कठीण होतं. पासपोर्ट काढण्यासाठी आपल्याला ठराविक पासपोर्ट ऑफिसमध्ये जावून अर्ज करणं आणि पुढील प्रक्रिया पार पाडणं आवश्यक होतं. मात्र, आता आपण पासपोर्टसाठी ऑनलाईन अर्ज करू शकतो. तसंच पासपोर्ट ऑफिसची अपॉईंटमेंट सुद्धा आपण ऑनलाईन बुक करू शकतो.

ऑनलाईन पोर्टल पासपोर्ट सेवा केंद्र (PSK) द्वारे आपण केलेल्या ऑनलाईन अर्जाचं सबमिशन करण्यासाठी मुलाखतीची वेळ निश्चित करू शकतो. पासपोर्ट मिळविण्यासाठी पासपोर्ट सेवा केंद्र या वेब पोर्टलवर आपल्या नावाची नोंदणी करणं आवश्यक असतं. यासाठी आपण पोर्टलवर ‘Register Now’वर क्लिक करून आपलं नावं नोंदवू शकतो. यशस्वी नाव नोंदणीनंतर युजरला पासपोर्ट सेवा ऑनलाईन पोर्टलवर रजिस्टर आयडीच्या मदतीनं लॉग इन करता येईल.

पासपोर्ट सेवा ऑनलाईन पोर्टलवर लॉग इन केल्यानंतर आपण ‘Apply for Fresh Passport/Re-issue of Passport’ या लिंकवर क्लिक करावं. यात अर्जदाराला आपली संपूर्ण खाजगी माहिती भरावी लागेल. पासपोर्ट ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर ‘Pay and Schedule Appointment’ या लिंकवर क्लिक करावं. तिथं  ‘View Saved/Submitted Applications’ स्क्रीनवर दिसेल. तिथं आपल्या मुलाखतीची वेळ आपण निश्चित करू शकता.

पासपोर्ट सेवा केंद्रानुसार, मुलाखतीसाठी वेळ घेतांना ऑनलाईन पेमेंट करणं आवश्यक आहे. पासपोर्टसाठी अर्ज करणाऱ्या अर्जदारानं खालीलपैकी कुठल्याही पद्धतीनं ऑनलाईन पेमेंट करावं. उदा. – क्रेडिट/डेबिट कार्ड (MasterCard and Visa), इंटरनेट बँकिंग (State Bank of India and associate banks and other banks) आणि SBI बँक चालान.

यशस्वीपणे पेमेंट केल्यानंतर ‘Print Application Receipt’ या लिंकवर क्लिक करून आपल्या अर्जाची प्रिंट काढावी. अर्जाच्या receipt मध्ये अप्लिकेशन रेफरन्स नंबर (ARN)/ अपॉईंटमेंट नंबरचा समावेश असतो. त्यानंतर आपण आपल्या मुलाखतीच्या वेळेनुसार पासपोर्ट सेवा केंद्र किंवा प्रादेशिक पासपोर्ट ऑफिसला (RPO) जावून आपल्या कागदपत्रांच्या झेरॉक्स तसंच मूळ कागदपत्रांसोबत तिथे जावं. आपल्या कागदपत्रांच्या व्हेरिफिकेशननंतर आपलं पासपोर्ट तयार होईल.

पासपोर्ट सेवा केंद्रात किंवा प्रादेशिक पासपोर्ट ऑफिसमध्ये जातांना अर्जाच्या receipt ची प्रिंटआऊट सोबत नेण्याची गरज नसते. आपण आपल्या फोनवर आलेला SMS सुद्धा तिथं दाखवू शकतो.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी