RBI च्या रिटेल डायरेक्ट स्कीममध्ये कशी करायची गुंतवणूक, किती होईल कमाई !

RBI Retail Direct Scheme | या योजनेत ऑनलाइन पोर्टल द्वारे केंद्र सरकारचे कर्जरोखे, राज्य सरकारचे कर्जरोखे आणि ट्रेझरी बिलांमध्ये किमान १०,००० रुपयांद्वारे आणि त्याच्या पटीत गुंतवणूक करता येणार आहे. यासाठी गुंतवणुकदाराला रिझर्व्ह बॅंकेसोबत रिटेल डायरेक्ट गिल्ट खाते सुरू करावे लागेल. या योजनेत किमान १ वर्षापासून ते ३० वर्षांपर्यतच्या कालावधीसाठी गुंतवणूक करता येणार आहे.

RBI Retail Direct Scheme
आरबीआय रिटेल डायरेक्ट स्कीम 
थोडं पण कामाचं
  • काय आहे आरबीआय रिटेल डायरेक्ट स्कीम
  • आरबीआय रिटेल डायरेक्ट स्कीमध्ये गुंतवणूक कशी करायची
  • या योजनेतून किती परतावा मिळतो

RBI Retail Direct Scheme | नवी दिल्ली: रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने (RBI)अलीकडेच रिटेल डायरेक्ट स्कीम (RBI Retail Direct Scheme) सुरू केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi)यांच्या हस्ते या योजनेचे उद्घाटन झाले. रिझर्व्ह बॅंकेच्या रिटेल डायरेक्ट स्कीमची सुरूवात १२ नोव्हेंबरला झाल्यापासून आतापर्यत त्यात १२,००० पेक्षा जास्त नोंदण्या झाल्या आहेत. म्हणजेच इतक्या गुंतवणुकदारांनी (Investors) या योजनेला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. या योजनेचा हेतू सरकारी कर्जरोखे किंवा सिक्युरिटिज (Government Securities)मध्ये गुंतवणूक अधिक सुलभरित्या करून देण्याची सुविधा उपलब्ध करून देणे हा आहे. या योजनेत कोणीही गुंतवणूक करू शकतो.  (How to invest & earn money in RBI Retail Direct Scheme)

ऑनलाइन करता येणार गुंतवणूक

या योजनेमध्ये किरकोळ गुंतवणुकदार ऑनलाइन पोर्टलचा वापर करून सरकारी कर्जरोखे किंवा सिक्युरिटीजमध्ये गुंतवणूक करू शकतात. https://rbirtaildirect.org.in या पोर्टलद्वारे केंद्र सरकारचे कर्जरोखे, राज्य सरकारचे कर्जरोखे आणि ट्रेझरी बिलांमध्ये किमान १०,००० रुपयांद्वारे आणि त्याच्या पटीत गुंतवणूक करता येणार आहे. यासाठी गुंतवणुकदाराला रिझर्व्ह बॅंकेसोबत रिटेल डायरेक्ट गिल्ट खाते सुरू करावे लागेल. या योजनेत किमान १ वर्षापासून ते ३० वर्षांपर्यतच्या कालावधीसाठी गुंतवणूक करता येणार आहे.

कसा करायचा अर्ज

आरबीआय रिटेल डायरेक्ट स्कीममध्ये गुंतवणूक करण्यासाठी एक ऑनलाइन फॉर्म भरावा लागेल. यासाठी तुम्हाला नोंदणीकृत मोबाइल नंबरवर एक ओटीपी येईल तो तिथे भरायचा आहे. नोंदणी झाल्यानंतर तुम्ही सरकारी कर्जरोखे किंवा बॉंड विकत घेऊ शकता. सरकारकडून दर शुक्रवारी यासाठी बोली लागते. याची विक्री सरकारी डेट मॅनेजरकडून केली जाते. बॉंडची खरेदी करण्यासाठीची रक्कम तुम्ही युपीआय, नेट बॅंकिंगद्वारे देऊ शकता. तुमची बॉंड खरेदी होताच तुमच्या खात्यातून पैसे कापले जातील. तुम्हाला एका बॉंडसाठी एकच बोली लावता येणार आहे.

किती रक्कम जमा करावी लागेल

सध्या सरकारने एकूण ९७ बॉंड बाजारात आणले आहेत. याचा कालावधी ३ महिन्यांपासून ते ४० वर्षांपर्यतचा आहे. यामधील एकूण भांडवल ७८.५ लाख कोटी रुपये आहे. या योजनेत गुंतवणूक करण्यासाठी संस्थात्मक गुंतवणुकदारांना किमान ५ कोटी रुपयांची गुंतवणूक करावी लागेल तर किरकोळ गुंतवणुकदाराला १०,००० रुपयांची गुंतवणूक करता येणार आहे. कोरोना काळात सरकारी बॉंडवर मिळणारा परतावा आधीच्या तुलनेत कमी झाला आहे. सध्या हा ६ टक्क्यांच्या आसपास आहे. परंतु बॅंकेत एफडी करून मिळणाऱ्या व्याजदरापेक्षा हा व्याजदर चांगला आहे. शिवाय हे बॉंड आणि गुंतवणूक सरकार आणि आरबीआयकडे केली जाते आहे. त्यामुळे ती सुरक्षित आहे आणि त्यात प्राप्तिकरदेखील द्यावा लागणार नाही.

पंतप्रधान मोदी आपले मत व्यक्त करताना पुढे म्हणाले की छोट्यातील छोटी गुंतवणूक सध्याच्या काळात खूप उपयुक्त ठरणार आहे. आतापर्यत सरकारी सिक्युरिटिज मार्केटमध्ये मध्यम वर्ग, ज्येष्ठ नागरिक, छोटी बचत करणारे गुंतवणुकदार यांनी म्युच्युअल फंडांसारखे पर्याय निवडावे लागत होते. आता त्यांना गुंतवणुकीचा एक सुरक्षित पर्याय मिळाला आहे. यामुळे छोट्या गुंतवणुकदारांना निर्धास्तपणे गुंतवणूक करता येणार आहे. शिवाय यातून चांगला परतावादेखील मिळणार आहे. आर्थिक समावेशकतेसाठी तळातील शेवटच्या माणसाचाही सहभाग आवश्यक आहे. ऑनलाइन खाते सुरू करता येणार आहे, त्यामुळे नोकरदारांना घरबसल्या सुरक्षितरित्या गुंतवणूक करता येणार आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी