Investment Tips: मुंबई : शेअर बाजारात (Share market)गुंतवणूक करून भरपूर पैसा कमवायची अनेकांची इच्छा असते. मात्र शेअर बाजाराचा चक्रव्यूह भेदणे फारच कमी लोकांना शक्य होते. कारण एखाद्या शेअरमध्ये पैसे गुंतवले, त्या शेअरची किंमत खूपच वाढली आणि गुंतवणुकदाराने प्रचंड कमाई केली इतक्या सहजपणे ही सर्व प्रक्रिया घडत नाही. कोणतेही तंत्र न समजता, गुंतवणुकीची सूत्रे (investment rules) जाणून न घेता आणि अवाजवी अपेक्षेने बहुसंख्य सर्वसामान्य गुंतवणुकदार शेअर बाजारात गुंतवणूक (investment) करतात आणि हात पोळून घेतात. या अनुभवानंतर शेअर बाजारातील गुंतवणूक हा कटू अनुभव होऊन बसतो. त्यामुळेच योग्य शेअर्स कसे निवडावेत याची सूत्रे काय आहेत, ते समजून घेऊया. (How to invest in share market, when to buy & when to sale the stock)
फक्त एखादा शेअर वर जातो आहे, त्यात तेजी दिसते आहे हे पाहून गुंतवणूक करू नये. त्या तेजीमागील कारण लक्षात घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जर शेअरच्या किंमतीतील जबरदस्त वाढ आणि त्या कंपनीची आर्थिक स्थिती, कंपनीशी निगडीत बाबी यांचा मेळ बसत नसेल तर अशावेळी त्या शेअरपासून लांब राहणेच योग्य ठरते.
शेअर निवडताना इकडच्या तिकडच्या टिप्स किंवा मेसेजकडे लक्ष देऊ नका. शिवाय कोणत्याही बातम्यांद्वारे निर्णय घेऊ नका. शेअर विकत घेताना कंपनीचे उत्पन्न, व्यवस्थापन आणि कंपनीचा आर्थिक ताळेबंद यावर लक्ष द्या. या तीन मुद्द्यांनुसार भक्कम असलेल्या कंपनीच्या शेअरमधून कमाईची संधी जास्त आणि नुकसान होण्याची शक्यता कमी असेल.
चांगल्या शेअरचे आणखी एक लक्षण म्हणजे या शेअरमधील ट्रेडिंग व्हॉल्यूम जास्त असतो म्हणजे खरेदी विक्री होणाऱ्या शेअर्सची संख्या जास्त असते. ज्या शेअर्समध्ये खरेदी विक्रीचे प्रमाण कमी असते किंवा जे शेअर्स कमी संख्येने उपलब्ध असतात अशा शेअर्समध्ये कृत्रिम तेजी आणता येते. मोठ्या शेअर्समध्ये याची शक्यता नसते.
ब्रोकरवर डोळ्या बंद करून विश्वास ठेवू नका. ब्रोकरचा फायदा तुम्ही जितके जास्त व्यवहार कराल तितका जास्त असता. त्यामुळे मिळालेल्या माहितीची खातरजमा करून घ्या.
शेअरला एक स्टॉप लॉस नक्की लावा. एखाद्या शेअरची किंमत २० टक्क्यांनी खाली गेल्यास त्याला विकणे योग्य ठरते. नुकसान होत असलेला शेअर कधीतरी फायद्यात येईल हा विचार करून दीर्घकाळ ठेवणे हे चुकीचे आहे.
या वर्षभरात शेअर बाजाराने सध्या अभूतपूर्व तेजी दाखवली आहे. सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही निर्देशांकांनी उच्चांकी पातळी नोंदवली आहे. शेअर बाजारातील गुंतवणुकीत धैर्य आणि संयम हा घटक फार महत्त्वाचा ठरतो.