IAS Success Story: शेतमजुरी करून केले शिक्षण; आज महाराष्ट्राच्या मातीतला वाघ आयएएस अधिकारी

काम-धंदा
Updated Jun 12, 2019 | 16:12 IST | टाइम्स नाऊ हिंदी

IAS Success Story: ओडिशामध्ये प्रशासकीय सेवेत असलेल्या पाटील यांनी २००५मध्ये यूपीएससी परीक्षा पास केली. एकेकाळी ग्रॅज्युएशनची फी देण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नव्हते. पण, शेतात मजुरी करून त्यांनी पैसे जमवले.

IAS Rajesh Patil
राजेश पाटील बनले आयएएस अधिकारी   |  फोटो सौजन्य: BCCL

IAS Success Story of Rajesh Patil: यूपीएससी परीक्षेत यश मिळवलेल्या अनेक संघर्ष कथा आपल्याला ऐकायला मिळतात. अनेकदा परराज्यातील तरुणांच्या कथा ऐकून आपण भारावून जातो. पण, आपल्या महाराष्ट्राच्या मातीतही अनेक असे हिरे सापडतात ज्यांनी मोठ्या मेहनतीनं यूपीएससीचं शिखर सर केलंय आणि आज आयएएस अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या जिद्दीची कथा ऐकली की त्यांना सलाम करावासा वाटतो. अशीच एक कथा आहे, महाराष्ट्रातल्या राजेश पाटील यांची. सध्या ओडिशामध्ये प्रशासकीय सेवेत असलेल्या पाटील यांनी २००५मध्ये यूपीएससी परीक्षा पास केली होती. घरची परिस्थिती बेताची असल्यामुळं शिक्षणावर खर्च करणं अशक्य होतं. त्यातच पटकन नोकरी मिळवून घरातील आर्थिक जबाबदारी उचलण्याचीही गरज होती. पण, या सगळ्यावर मात करत राजेश पाटील आयएएस अधिकारी झाले. ओडिशातील आपत्तीच्या काळात त्यांनी केलेले काम उल्लेखनीय मानले जाते.

भाजी, ब्रेड विकून शिक्षण घेतलं

राजेश पाटील आपल्या शिक्षणाचा खर्च काढण्यासाठी शेतात मजुरी करायचे. त्यांच्या एका मुलाखतीत त्यांनी ही सगळी माहिती दिली आहे. आयएएस होणं माझ्यासाठी सोपं नव्हतं, असं राजेश सांगतात. घरची परिस्थिती बेताची असल्यामुळं खूप कमी वयात काम करायला शिकलो होतो. अनेकदा भाजी आणि ब्रेड विकून त्यांनी शिक्षणासाठी पैसा उभा केला. अतिशय बेताची परिस्थिती असलेल्या कुटुंबात राजेश जन्माला आले. त्यांचे वडील छोट्याशा जमिनीच्या तुकड्यावर शेती करायचे. त्यातून कसाबसा कुटुंबाच खर्च निघायचा. त्यामुळे कमी वयातच राजेश यांनी वडिलांना मदत करायला सुरुवात केली.

शेतात केली मजुरी

बेटर इंडियाला दिलेल्या एका मुलाखतीत राजेश यांनी सांगितले की, त्यांच्या गावात शिक्षणाची फारशी पार्श्वभूमी नव्हती. गावातील पालक कायम आपल्या मुलांच्या भविष्याविषयी काळजीत असायचे. पण, गावातील शिक्षक आणि मित्र राजेश यांच्या मदतीला धावून आले. सुरुवातीला अभ्यास कच्चा होतो, असे राजेश यांनीच मुलाखतीत सांगितले. शिक्षक आणि मित्रांनी राजेश यांना अभ्यास करायला प्रोत्सहन दिले. दहावी आणि त्यानंतर बारावीचं शिक्षण झालं. पण, त्यावेळी आर्थिक स्थिती इतकी नाजूक होती की, ग्रॅज्युएशनची फी द्यायलाही राजेश यांच्याकडे पैसे नव्हते. शिक्षण अर्ध्यावर सुटू नये म्हणून, राजेश शेतात मजुरी करायचे.

अनेक पुरस्कार आणि पुस्तकही लोकप्रिय

स्टॅटेस्टिकल सर्व्हिसेसमध्ये राजेश यांची निवड झाली होती. पण, त्यांना आयएएस अधिकारीच व्हायचे होते. त्यामुळे त्यांनी आपली मेहनत सोडली नाही. २००५मध्ये ते यूपीएससी पास झाले आणि त्यांची पहिली नियुक्ती ओडिशातील कोटापूरमध्ये अठगढ येथे विभागीय न्यायदंडाधिकारी म्हणून झाली. ओडिशामध्ये काम करताना २००८मध्ये महानदीला पूर आला होता. त्यावेळच्या बचाव कार्यात राजेश पाटील यांचे खूप मोठे योगदान आहे. राजेश यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. राजेश यांनी आत्मचरित्रपर पुस्तकाचे लेखन केले असून, ‘ताई मी कलेक्टर व्हयनू’ हे त्यांचे पुस्तक खूप लोकप्रिय आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
IAS Success Story: शेतमजुरी करून केले शिक्षण; आज महाराष्ट्राच्या मातीतला वाघ आयएएस अधिकारी Description: IAS Success Story: ओडिशामध्ये प्रशासकीय सेवेत असलेल्या पाटील यांनी २००५मध्ये यूपीएससी परीक्षा पास केली. एकेकाळी ग्रॅज्युएशनची फी देण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नव्हते. पण, शेतात मजुरी करून त्यांनी पैसे जमवले.
Loading...
Loading...
Loading...