ICICI-Videocon loan: चंदा कोचर आणि पती दिपकची ED कडून कसून चौकशी 

काम-धंदा
Updated May 13, 2019 | 23:00 IST | टाइम्स नाऊ मराठी

ICICI-Videocon loan case: ईडीनं आयसीआयसीआय- व्हिडिओकॉन यांच्या कर्ज प्रकरणी ICICI बँकेच्या माजी सीईओ चंदा कोचर आणि त्यांचा पती दिपक कोचर यांना समन्स बजावले होते. दोघांची सोमवारी चौकशी करण्यात आली. 

Former ICICI Bank CEO & MD, Chanda Kochhar
ICICI-Videocon loan: चंदा कोचर आणि पती दिपकची ED कडून कसून चौकशी   |  फोटो सौजन्य: ANI

नवी दिल्लीः  ICICI बँकेच्या माजी मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) चंदा कोचर आणि त्यांचे पती दिपक कोचर सोमवारी अंमलबजावणी संचालनालय (ईडी) च्या समोर हजर झाले. ICICI- Videocon बॅंकांना गैरव्यवहार कर्ज दिल्या प्रकरणी त्यांना ईडी अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे समन्स बजावले होते. अधिकृत सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कोचर आणि त्यांचा पती सोमवारी ईडीचे खान मार्केटमधील कार्यालयात पोहोचले. त्या दोघांना ११ वाजता ईडीच्या कार्यालयात उपस्थित राहायचे होते. दरम्यान दोघंही दिलेल्या वेळाच्या काही वेळ आधीच पोहोचले. दोघांची जवळपास ८-९ तास चौकशी केली. ईडीनं दोघांना उद्या पुन्हा चौकशीसाठी बोलावले आहे. 

सुत्रांनी सांगितलं की, या प्रकरणातील चौकशी अधिकाऱ्यांना तपास वाढवण्यासाठी दोघांच्या मदतीची गरज आहे. मनी लॉंडरिंग कायदा (पीएमएलए) च्या अंतर्गत त्या दोघांचे जबाब नोंदवले जातील. त्यांनी म्हटलं की, चंदा कोचरला या महिन्याच्या सुरूवातीला तपासणी एजन्सी समोर उपस्थित राहण्यास सांगितले होते. मात्र कोचर यांनी वेळ वाढवून देण्याची मागणी केली होती. ती वाढवण्यासाठी मंजूरी देखील देण्यात आली होती. ईडीनं दिपक कोचरचा भाऊ राजीव कोचरकडून या प्रकरणी बऱ्याचंदा चौकशी देखील केली आहे. 

सुत्रांनी सांगितलं की, राजीव कोचर सिंगापूरची कंपनी एविस्टा एडवाइजरीचे संस्थापक आहे. सीबीआयनं कर्जाची पुनर्रचना करण्यासाठी त्यांच्या कंपनीच्या भूमिकेबद्दल त्यांच्याकडे चौकशी केली होती. बॅंक कर्ज प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयानं एक मार्चला छापा टाकल्यानंतर चंदा कोचर आणि त्यांचे पती दिपक यांची ईडीच्या मुंबई कार्यालयात चौकशी केली होती. ईडीनं चंदा कोचर, त्यांच्या कुटुंबातील आणि व्हिडिओकॉन समूहाचे वेणुगोपाल धूत यांच्या मुंबई आणि औरंगाबाद येथे छापे टाकण्यात आले होते. 

अंमलबजावणी संचालनालयानं या वर्षांच्या सुरूवातीला चंदा कोचर, त्यांचे पती दिपक कोचर, धूत आणि अन्य लोकांविरोधात ICICI बॅंकेद्वारे व्हिडिओकॉन समूहाला १ हजार ८७५ कोटी रूपयांचे कर्ज मंजूर केल्याप्रकरणी अनियमितता आणि भ्रष्टाचाराची चौकशीसाठी पीएमएलएच्या अंतर्गत गुन्हेगारीची तक्रार दाखल केली होती. सीबीआयनं केलेल्या एफआयआरच्या आधारावर अंमलबजावणी संचालनालयानं ही कारवाई केली होती. 

सीबीआयनं या प्रकरणी या तिन्ही आणि धूत यांची कंपनी- व्हिडिओकॉन इंटरनॅशनल इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (व्हिआयईएल) आणि व्हिडिओकॉन इंडस्ट्रीज लिमिटेड (व्हीआयएल) च्या विरोधात तक्रार दाखल केली होती. सीबीआयच्या एफआयआरमध्ये सुप्रीम एनर्जी आणि दिपक कोचर यांचं नियंत्रण असलेली न्यूपावर रिनयूएबल्सचं देखील नाव आहे. सुप्रीम एनर्जीची स्थापना धूत यांनी केली होती. केंद्रिय चौकशी एजन्सीनं सर्व आरोपींविरोधात गुन्हेगारी षड्यंत्र, फसवणूक आणि भ्रष्टाचार प्रतिबंध कायद्याच्या अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी