IEC 2022 : Anurag Thakur says we vaccinated equal to population of Australia in one day : मुंबई : भारताची अर्थव्यवस्था वेगाने प्रगती करत आहे. अनेक क्षेत्रांचा प्रगतीचा वेग उल्लेखनीय आहे. देशाने निर्यातीचा विक्रम स्थापन केला आहे; असे भारताचे माहिती व प्रसारणमंत्री अनुराग ठाकुर म्हणाले. ते 'इंडिया इकोनॉमिक कॉन्क्लेव २०२२'मध्ये बोलत होते. भारतात कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर लसीकरण सुरू आहे. ऑस्ट्रेलियाची जेवढी लोकसंख्या आहे तेवढ्याच नागरिकांना भारतात एका दिवसांत कोरोना प्रतिबंधक लस टोचण्यात आली आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर लसीकरण करुन भारताने जगाला देशाची क्षमता दाखवून दिली आहे; असेही अनुराग ठाकुर म्हणाले.
कोरोना संकटाच्या काळात तात्पुरती सोय म्हणून व्हिडीओ कॉन्फरन्स पद्धतीचा अवलंब वाढला. पण व्हिडीओ कॉन्फरन्सची सोय उपलब्ध झाली तरी लोकांची थेट संवादाची इच्छा कमी झालेली नाही. यामुळे संकट नियंत्रणात येताच सर्व गोष्टी वेगाने सुरळीत होत आहेत.
व्हिडीओ कॉन्फरन्सचे तंत्र काही वेळा फायद्याचे असले तरी हे तंत्र नागरिकांची थेट संवाद साधण्याची इच्छा आणि परंपरा यावर विशेष परिणाम करू शकणार नाही, असा विश्वास अनुराग ठाकुर यांनी व्यक्त केला.
कोरोना संकटामुळे अनपेक्षित अशी आव्हाने निर्माण झाली. पण या परिस्थितीतून मार्ग काढत भारत प्रगती करत आहे. या प्रगतीचा वेग उल्लेखनीय आहे. देशाची वेगाने प्रगती सुरू आहे. भारत यंदा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहे. देशात १८७ कोटींपेक्षा जास्त कोरोना प्रतिबंधक लसचे डोस टोचून झाले आहेत.
लसीकरणावरुन अनेक प्रश्न उपस्थित होत होते. पण भारताने मोफत लसीकरण केले. भारतीय लस अतिशय सुरक्षित आहे आणि जगाने भारतीय लसचे कौतुक केले. हळू हळू भारतीय लसला जगातील अनेक देशांकडून मान्यता मिळू लागली आहे. जगातील अनेक देशांमध्ये भारतीय लसचा वापर सुरू आहे.
भारतात सरकारी योजना निश्चित काळात वेगाने पूर्ण होऊ लागल्या आहेत. निर्यातीच्या क्षेत्रात भारत नवनवे विक्रम करत आहे. आर्थिक प्रगती आणि लसीकरणाच्या क्षेत्रातील उल्लेखनीय प्रगती हे सर्व एकाचवेळी सुरू आहे. भारतीयांचे जीवनमान सुधारले आहे. उत्पन्नात वाढ होत असल्याचे चित्र आहे. ही भारत वेगाने प्रगती करत असल्याची उत्तम उदाहरणे आहेत, असे अनुराग ठाकुर म्हणाले. प्रगतीच्या वाढत्या गतीमुळे भारताचे आंतरराष्ट्रीय स्थान मजबूत झाले आहे. जगातील अनेक देश भारत काय म्हणतो आहे याची दखल घेताना दिसत आहेत, असेही अनुराग ठाकुर म्हणाले.
भारताची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहरात देशातील आघाडीची मीडिया कंपनी 'टाइम्स नेटवर्क'चा 'इंडिया इकोनॉमिक कॉन्क्लेव २०२२' हा सोहळा सुरू आहे. या दोन दिवसांच्या सोहळ्यात देशाविदेशातील अनेक दिग्गज सहभागी झाले आहेत. 'द ग्रेट इंडियन डेमोक्रॅटिक डिव्हिडंड' ही यंदाच्या कार्यक्रमाची संकल्पना आहे. भारतापुढील आर्थिक आव्हाने आणि या आव्हानांचा मुकाबला करत प्रगती करत असलेला भारत देश या विषयावर चर्चा होणार आहे. विकासासाठीच्या भारताच्या आगामी धोरणांवर सर्वांगाने चर्चा होणार आहे.