गरज भासल्यास 'पीपीएफ'वरसुदधा घेऊ शकता तुम्ही लोन, फक्त 'या' अटी समजून घ्या

काम-धंदा
Updated Apr 10, 2021 | 15:25 IST | टाइम्स नाऊ मराठी

पीपीएफ हा एक करबचतीचा पर्याय असल्यामुळे मॅच्युरिटीचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर ही रक्कम लोकांच्या आर्थिक गरजा पूर्ण करता येतातच, परंतु यादरम्यान जर आर्थिक अडचण आल्यास पीपीएफवर कर्जाचीदेखील सुविधा देण्यात आली आहे

How to take loan on PPF account
पीपीएफ खात्यावर कर्ज कसे मिळते 

थोडं पण कामाचं

  • पीपीएफ खात्यातून पैसे काढलेले असल्यास कर्जाची सुविधा मिळत नाही.
  • जमा रकमेच्या २५ टक्के इतक्या रकमेचे कर्ज
  • कर्जाचा व्याजदर पीपीएफवर मिळत असलेल्या व्याजदराच्या केवळ १ टक्का जास्त

नवी दिल्ली : केव्हा घेऊ शकता पीपीएफवर कर्ज
पीपीएफ (PPF) खाते ज्या आर्थिक वर्षात सुरू करण्यात आले आहे, ते आर्थिक वर्ष संपल्यानंतर एक वर्षांनंतर आणि ५ वर्षांआधी कर्ज घेता येते. पीपीएफ खात्याला ५ वर्षे पूर्ण झाल्यानंतर ही रक्कम काढता येते. मात्र पीपीएफ खात्यातून पैसे काढलेले असल्यास कर्जाची सुविधा मिळत नाही. ज्या वर्षी तुम्ही कर्जासाठी अर्ज करता त्याच्यापूर्वी दोन वर्षे पूर्ण होताना तुमच्या पीपीएफ खात्यात जितकी रक्कम जमा झालेली असेल त्याच्या २५ टक्के इतक्या रकमेचे कर्ज तुम्हाला मिळू शकते.

पीपीएफ कर्जावरील व्याजदर आणि कालावधी


पीपीएफ वर कर्ज घेतल्यास आधी कर्जाची मुद्दल भरायची असते आणि त्यानंतर कर्जाच्या रकमेवरील व्याज जमा करायचे असते. कर्जाच्या मुद्दल रकमेची दोन किंवा त्यापेक्षा अधिक हफ्त्यांनी किंवा मासिक हफ्त्यांनीदेखील परतफेड करता येते. कर्जाच्या मुद्दलाची परतफेड ज्या महिन्यात कर्ज घेतले आहे त्यानंतर ३६ महिने पूर्ण होण्याच्या एक दिवस आधीपर्यत करायची असते. पीपीएफवर मिळणाऱ्या कर्जाचा व्याजदर पीपीएफवर मिळत असलेल्या व्याजदराच्या केवळ १ टक्का जास्त असतो. पीपीएफवर सध्या ७.१ टक्के इतका व्याजदर मिळतो. म्हणजेच जर तुम्ही पीपीएफवर कर्ज घेतले तर कर्जावरील व्याजदर ८.१ टक्के इतका असले.

कर्जावरील व्याज दोन मासिक हफ्त्यात जमा केले जाऊ शकते. जर तुम्ही नियोजित कालावधी कर्जाची मुद्दल जमा केली असेल आणि व्याजाचा काही भाग जमा करायचा बाकी असेल तर तुमच्या पीपीएफ खात्यातून ती रक्कम वजा करून घेतली जाते.

जर ३६ महिन्यांत कर्जाची परतफेड करता आली नाही तर...


जर ३६ महिन्यांत कर्जाची परतफेड करता आली नाही किंवा काही रक्कम जमा केलेली असल्यास उर्वरित रकमेवर पीपीएफवर मिळणाऱ्या व्याजापेक्षा ६ टक्के अधिक व्याज द्यावे लागेल. जर या कालावधीत खातेधारकाचा मृत्यू झाल्यास त्याचा नॉमिनी किंवा वारसास उरलेल्या कर्जाची परतफेड करावी लागते. पीपीएफवरील व्याजदर दर तिमाहीत निश्चित केले जाते. मात्र कर्जावरील व्याजदर कर्ज घेताना जितके असेल तितकेच राहते.

इनअॅक्टिव्ह पीपीएफ खात्यावर नाही मिळत कर्ज


जर तुमचे पीपीएफ खाते अॅक्टिव्ह नसेल तर तुम्हाला त्यावर कर्ज मिळू शकणार नाही. याशिवाय जोपर्यत तुम्ही पीपीएफवर घेतलेल्या पहिल्या कर्जाची परतफेड करत नाही तोपर्यत तुम्हाला दुसरे कर्ज मिळत नाही. जर अज्ञान किंवा मानसिकदृष्ट्या विकलांग व्यक्तीच्या नावावर पीपीएफ खाते सुरू केले असेल तर नॉमिनी त्याच्या वतीने कर्जासाठी अर्ज करू शकतो. यासाठी खातेधारकाद्वारे अकाऊंट्स कार्यालयात सर्टिफिकेट जमा करावे लागेल.

पीपीएफशी संबंधित काही महत्त्वाच्या बाबी


पीपीएफमध्ये करण्यात येणारी गुंतवणूक, त्यावर मिळणारे व्याज आणि मॅच्युरिटीच्या वेळेस मिळणारी रक्कम या तिन्हींवर करातून सूट मिळते. पीपीएफचा मॅच्युरिटीचा कालावधी १५ वर्षे इतका आहे. मॅच्युरिटीचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर ५ -५ वर्षांच्या टप्प्याने वाढवला जाऊ शकतो. पीपीएफ खाते कोणतीही भारतीय व्यक्ती सुरू करू शकते. कायत्याने अज्ञान व्यक्तीसाठीही हे सुरू करता येते. पीपीएफ मध्ये एका आर्थिक वर्षात कमीत कमी ५०० रुपये आणि जास्तीत जास्त १.५ लाख रुपये जमा करता येतात. पीपीएफ खाते पोस्ट ऑफिस किंवा बॅंकेत उघडता येते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी