if you are in danger of losing your job do these 5 things there will be no shortage of money : चीनची झिरो कोविड पॉलिसी आणि रशिया-युक्रेन लढाई यामुळे अमेरिका, चीन यांच्यासह पाश्चात्य देशांमध्ये महागाई आणि मंदीचे संकट आले आहे. या संकटाचा परिणाम भारतावर होईल असा अंदाज अर्थतज्ज्ञ व्यक्त करत आहेत. अनेक कंपन्या मंदीच्या काळात खर्च कमी करण्यासाठी कर्मचारी कपातीचे धोरण राबवतात. तर काही कंपन्या पगारातील भत्ते बंद करणे, पगार कपात करणे अशा स्वरुपाची धोरणे राबवतात. सध्या सेवा क्षेत्रातील अनेक कंपन्यामध्ये कर्मचारी कपात सुरू आहे. यात प्रामुख्याने माहिती तंत्रज्ञान, शॉपिंग पोर्टल, फूड डिलिव्हरी अॅग्रीगेटर, अॅप बेस्ड कॅब सर्व्हिस, ई लर्निंग प्लॅटफॉर्म, ऑनलाइन हॉटेल बुकिंग आणि रुम बुकिंग सर्व्हिस देणाऱ्या कंपन्या यांचा समावेश आहे.
कर्मचारी कपात सुरू असल्यामुळे अचानक नोकरी जाण्याची शक्यता वाढत आहे. नोकरी अचानक गेल्यामुळे दरमहा निश्चित उत्पन्न कमावणारे अचानक बेरोजगार होत आहेत. या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी नियोजन आवश्यक आहे. आधीपासून आर्थिक नियोजन केले तर या संकटातून तरून जाण्यास मदत होते.
या लेखातून जाणून घ्या नोकरी जाण्याची शक्यता असेल तर करायची महत्त्वाची पाच कामं...
Mudra Loan: बिझनेस वाढवायचा आहे? काळजी नको, सरकार 'या' योजनेतून त्वरीत देईल 10 लाख रुपयांचे कर्ज
Business Ideas: पुष्पा चित्रपटाच्या लाल चंदनासारखा पैसा आहे या व्यवसायात...आयुष्यभर कमाईच कमाई
अनावश्यक खर्च बंद करा अथवा कमी करा. कठीण परिस्थितीसाठी जास्तीत जास्त बचत करा. बचत केलीत तर भविष्यात आर्थिक अडचणींतून मार्ग काढणे सोपे होईल.
नियमित येणारे मासिक उत्पन्न बंद झाले तर दरमहा करायचे आवश्यक खर्च सुरू ठेवण्यासाठी एक आपत्कालीन फंड तयार करा. पुढचे किमान 6 ते 12 महिने आपत्कालीन फंडातून खर्च करण्यासाठी नियोजन करून ठेवा. जर दरमहा आपला खर्च 40 हजार रुपये असेल तर वर्षभरासाठी किमान 5 लाख रुपयांचा आपत्कालीन फंड तयार करून ठेवणे आवश्यक आहे. या पैशांची गुंतवणूक अशा प्रकारे करा की गरजेनुसार ते लगेच काढता येईल आणि गरज नसल्यास ते गुंतवून ठेवता येतील.
आपण करत असलेली सर्व गुंतवणूक सुरक्षित आहे याची खातरजमा करून घ्या. उच्च जोखीम असलेली गुंतवणूक बेरोजगार असताना करणे टाळा. या संदर्भात आपल्या गुंतवणूक सल्लागाराशी चर्चा करून निर्णय घेणे हिताचे.
अचानक कराव्या लागणाऱ्या वैद्यकीय खर्चांसाठी मेडिकल इन्शुरन्स काढून ठेवा. यामुळे वैद्यकीय खर्च करावे लागले तरी आर्थिक अडचण येणार नाही. वय, जुनी आजारपणे, एखादा नजिकचा काळात करायचा वैद्यकीय खर्च या बाबींचा विचार करून किमान 2 ते 5 लाख रुपये ते कमाल 10 लाख रुपये एवढ्या रकमेचे मेडिकल इन्शुरन्स कव्हर तयार करा.
नोकरी जाण्याची शक्यता असल्यास नवे कर्ज काढणे टाळा. कंपनी कामावरून कमी करताना देणार असलेल्या पैशांतून ईएमआयचा भार कमी करण्याचा प्रयत्न करा. नोकरी नसतानाच्या काळात कर्जभार कमी असणे हिताचे आहे. नोकरी असताना जर आपल्याकडे अतिरिक्त पैसे असतील आणि इतर जबाबदाऱ्या नसतील तर शक्यतो विम्याचे हप्ते, कर्जाचे हप्ते यांचे अॅडव्हान्स पेमेंट करा. यामुळे नोकरी नसतानाच्या काळात या खर्चाचा भार आपल्यावर नसेल किंवा कमी प्रमाणात उरला असेल.
(Disclaimer / डिस्क्लेमर : आर्थिक नियोजन हे स्वतःच्या गुंतवणूक सल्लागाराशी सल्लामसलत करून करणे हिताचे.)