IIT Campus Placement | नवी दिल्ली : आयआयटी (IIT) ही देशातील सर्वात प्रतिष्ठित शैक्षणिक संस्था आहे. आयआयटीमध्ये प्रवेश मिळवून त्यानंतर जगभरातील ख्यातनाम कंपन्यांमध्ये करियर करण्याचे अनेकांचे स्वप्न असते. कारण आयआयटीमधून पदवी घेतल्यानंतर गलेलठ्ठ पगाराच्या (High salary) आणि मोठ्या पदांच्या नोकऱ्या मिळतात. सध्या आयआयटीमध्ये प्लेसमेंटची (IIT Placements) प्रक्रिया सुरू आहे. या कॅम्पस प्लेसमेंटची मोठी चर्चाही होत असते. आयआयटीच्या या कॅम्पस प्लेसमेंट (campus placement) प्रक्रियेत उबर टेक्नॉलॉजीस (Uber Technologies) या प्रसिद्ध कंपनीने एका विद्यार्थ्याला तब्बल २ कोटी रुपयांपेक्षा अधिकच्या पॅकेजची ऑफर दिली आहे. उबर टेक्नॉलॉजीसने आयआयटी बॉम्बे, मद्रास, रुडकी, कानपूर, गुवाहाटी आणि वाराणसी या कॅम्पसमधून अनेक ऑफर दिल्या आहेत. (IIT Campus Placement : IIT boom, Multinational company gives offer of Rs 2.05 crore to IIT Student)
समोर आलेल्या माहितीनुसार उबर टेक्नॉलॉजीसने देऊ केलेल्या ऑफरमध्ये २,७४,२५० डॉलरचे म्हणजेच २.०५ कोटी रुपयांचे वार्षिक वेतन आहे. यामध्ये १,२८,२५० डॉलरचे म्हणजे ९६ लाख रुपयांची बेसिक सॅलरी, त्याचबरोबर टार्गेट बोनस, साइन ऑन बोनस आणि इतर भत्त्यांचा समावेश आहे. जवळपास ६ वर्षांनंतर आयआयटीच्या विद्यार्थ्यांना २ कोटी रुपयांच्या पॅकेजची ऑफर मिळाली आहे. मधल्या काही वर्षांमध्ये आयआयटीच्या विद्यार्थ्यांना कॅम्पस प्लेसमेंटमध्ये मिळणाऱ्या ऑफर आणि या ऑफरमध्ये मिळणाऱ्या पॅकेजची किंमत घटली होती. मात्र आता पुन्हा आयआयटीला सुगीचे दिवस आल्याचे दिसते आहे.
मागील वर्षी म्हणजे २०२० ला अमेरिकेच्या कोहेसिटी या कंपनीकडून १.४८ कोटी रुपयांचे पॅकेज देण्यात आले होते. कंपनी सध्या हैदराबाद आणि बंगळूरू येथील केंद्रांसाठी इंजिनियरची भरती करते आहे. उबर ही कंपनी नियमितपणे आयआयटीसह देशातील आघाडीच्या शिक्षण संस्थांच दौरे करते. यातूनच कंपनी कॅम्पस प्लेसमेंटमधून विद्यार्थ्यांची निवड करते.
क्वांटबॉक्स रिसर्च, ग्रेविटॉन रिसर्च, द विंची डेरिव्हेटिव्ह आणि क्वाडेये यासारख्या ट्रेडिंग कंपन्यांदेखील कॅम्पस प्लेसमेंटद्वारे आयआयटीच्या विद्यार्थ्यांना जबरदस्त पॅकेजच्या नोकऱ्यांची ऑफर दिली आहे. यातील काही कंपन्यांनी १.८ कोटी रुपयांपर्यतची ऑफर विद्यार्थ्यांना दिली आहे. यामध्ये बोनसचादेखील समावेश आहे. इतरही कंपन्यांनी १.३ ते १.५ कोटी रुपयांच्या पॅकेजच्या ऑफर दिल्या आहेत.
मागील काही वर्षात आयआयटीच्या विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या ऑफर्समध्ये घसरण झाली होती. अनेक चांगल्या कंपन्या कॅम्पस प्लेसमेंटसाठी येत नव्हत्या. शिवाय आयआयटीच्या विद्यार्थ्यांना कॅम्पस प्लेसमेंटमध्ये मिळणाऱ्या पॅकेजचे मूल्यदेखील घटले होते. त्यामुळे आयआयटीभोवती असलेले वलय मागील काही वर्षात घटले होते. मात्र यावर्षी पुन्हा एकदा आयआयटीच्या कॅम्पस प्लेसमेंटची आणि त्या मिळणाऱ्या पॅकेजची चर्चा होऊ लागली आहे. यातून विद्यार्थ्यांमध्येदेखील उत्साहाचे वातावरण आहे. आयआयटीच्या विद्यार्थ्यांनी जगभरातील अनेक नामांकित कंपन्यांमध्ये जबरदस्त कामगिरी करून दाखवत आपले झेंडे जगभर गाडले आहेत.