एक लाख कोटींच्या गैरव्यवहार प्रकरणात आयएल अॅंड एफएसचे माजी प्रमुख रवि पार्थसारथी यांना अटक

चेन्नई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने इन्फ्रास्ट्रक्चर लिसिंग अॅंड फायनान्शियल सर्व्हिसेस म्हणजेच आयएल अॅंड एफएस समूहाचे प्रमुख रवि पार्थसारथी यांना एक लाख कोटी रुपयांच्या गैरव्यवहारासंदर्भात अटक केली आहे.

IL&FS scam
आयएल अॅंड एफएस गैरव्यवहार प्रकरण 

थोडं पण कामाचं

  • आयएल अॅंड एफएसचे समूहाचे माजी प्रमुख रवि पार्थसारथी
  • एक लाख कोटी रुपयांचा गैरव्यवहार
  • आयएल अॅंड एफएस समूहातील ३५० कंपन्याद्वारे झाला गैरव्यवहार

चेन्नई : चेन्नई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने (Economic Offences Wing) इन्फ्रास्ट्रक्चर लिसिंग अॅंड फायनान्शियल सर्व्हिसेस (IL&FS) म्हणजेच 'आयएल अॅंड एफएस' समूहाचे माजी प्रमुख रवि पार्थसारथी (Ravi Parthasarathy)यांना एक लाख कोटी रुपयांच्या गैरव्यवहारासंदर्भात ( 1 lakh crore IL&FS scam) अटक केली आहे. आयएल अॅंड एफएसच्या (Infrastructure Leasing & Financial Services group) १ लाख कोटी रुपयांच्या स्कॅमचे मास्टरमाईंड असलेल्या रवि पार्थसारथी यांनी ईकॉनॉमिक ऑफेन्सेस विंगने म्हणजेच ईओडब्ल्यूने अटक केली आहे. २० सप्टेंबर २०२०च्या गुन्हा क्रमांक १३ अंतर्गत ही अटक करण्यात आल्याची माहिती चेन्नईच्या ईकॉनॉमिक ऑफेन्सेस विंगने ((EOW of Chennai Police) दिली आहे. पार्थसारथी यांना १५ दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली आहे. त्यांनी जामिनासाठी केलेल्या याचिकेवर १४ जूनला सुनावणी होणार असल्याची माहिती ईकॉनॉमिक ऑफेन्सेस विंगने दिली आहे. (IL&FS scam : Former Infrastructure Leasing & Financial Services (IL&FS) group chief Ravi Parthasarathy arrested by Chennai Police's Economic Offences Wing in connection with Rs 1-lakh cr scam) 

आयएल अॅंड एफएस समूहातील ३५० कंपन्याद्वारे गैरव्यवहार

आर्थिक गुन्हे शाखेनुसार पार्थसारथी आयएल अॅंड एफएस समूहाचे अध्यक्ष असताना समूहात ३५० पेक्षा जास्त कंपन्या होत्या. या सर्व कंपन्यांचा वापर आर्थिक गैरव्यवहार करण्यासाठी करण्यात येत होता. कंपनी, समभागधारक आणि पतपुरवठा करणाऱ्या बॅंक, वित्तीय संस्था यांच्या हिताला बाधा आणण्याचा आरोप रवि पार्थसारथी यांच्यावर आहे. ६३ मून्स टेक्नॉलॉजीस लि. या कंपनीने आयएल अॅंड एफएसच्या गैरव्यवहारात २०० कोटी रुपये गमावले आहेत. याशिवाय इतर अनेक ठेवीदारांनी ज्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे, या सर्वांनी सप्टेंबर २०२०मध्ये पार्थसारथी आणि इतरांवर गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणात कारवाई केली आहे. पार्थसारथी यांनी याआधीच मद्रास उच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता मात्र न्यायालयाने तो फेटाळला आहे.

२०१८ मध्ये समोर आले होते आयएल अॅंड एफएस समूहाचे खरे स्वरुप

ज्या गुंतवणुकादारांचे आणि ठेवीदारांचे नुकसान झाले आहे त्यांनी आर्थिक गुन्हे शाखेकडे त्यांचे दावे सादर करावेत अशी माहिती आर्थिक गुन्हे शाखेने दिली आहे. आयएल अॅंड एफएस गैरव्यवहार प्रकरण समोर येण्याची सुरूवात जुलै २०१८ मध्ये झाली होती. त्यावेळेस कंपनीने रोख रकमेच्या अभावामुळे कर्जाच्या परतफेड करणे शक्य होत नसल्याने कर्जाचे हफ्ते चुकवले होते, त्यावेळेस आयएल अॅंड एफएसची एकूण संपत्ती १.१५ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त होती. बॉंडवरील व्याज चुकवणे शक्य न झाल्याने ऑगस्ट २०१८ मध्ये आयएल अॅंड एफएस कोळसली होती. त्यानंतर कंपनीवरील कर्ज आणि कर्जाची थकबाकी आणि कंपनीची आर्थिक स्थिती समोर आली होती. पार्थसारथी जवळपास ३० वर्षे आयएल अॅंड एफएसमध्ये कार्यरत होते. २०१८ मध्ये त्यांनी कंपनीतून राजीनामा दिला होता. 

आयएल अॅंड एफएस समूहावर तब्बल ९०,००० कोटी रुपयांचे कर्ज

भारत सरकारने पार्थसारथी यांच्याविरोधात दाखल केलेल्या याचिकेत म्हटले आहे की 'रवि पार्थसारथी आणि त्यांची टीम ही समूहातील बेजबाबदारपणा, अकार्यक्षमपणा आणि लोकांना कंपनीच्या आर्थिक स्थितीबद्दल खोटे चित्र दाखवण्यासंदर्भात दोषी आहेत. आयएल अॅंड एफएस आर्थिक ताळेबंदात लबाडी करून आपले उत्पन्न आणि कर्ज यासंदर्भातील आपली खरी आर्थिक स्थिती लपवत होती. याशिवाय कंपनी आपले उत्पन्न, रोख रक्कम आणि इतर कोसळलेल्या आर्थिक बाबी लपवून ठेवत होती.'
मार्च २०१८ला आयएल अॅंड एफएस समूहावर तब्बल ९०,००० कोटी रुपयांचे कर्ज होते. हे कर्ज बॅंका आणि इतर वित्तीय संस्थांकडून घेण्यात आलेले होते. शिवाय यात गुंतवणुकदारांचे आणि ठेवीदारांचेदेखील पैसे होते. सरकारने ऑक्टोबर २०१८मध्ये आयएल अॅंड एफएसच्या संचालक मंडळाला बरखास्त केले होते आणि नवीन संचालक मंडळाची नियुक्ती केली होती. या नव्या संचालक मंडळाचे नेतृत्व म्हणजेच कार्यकारी चेअरमनपद उदय कोटक यांना देण्यात आले होते. उदक कोटक हे कोटक महिंद्रा बॅंकेचे चेअरमन आहेत.

आयएल अॅंड एफएस समूहाच्या गैरव्यवहाराची प्रचंड व्याप्ती

आयएल अॅंड एफएस समूहाने केलेल्या आर्थिक गैरव्यवहाचा मोठा गंभीर परिणाम बॅंका, एनबीएफसी क्षेत्र, म्युच्युअल फंड क्षेत्र आणि देशातील वित्तीय क्षेत्रावर झाला आहे. अनेक डेट प्रकारातील म्युच्युअल फंडांना आयएल अॅंड एफएसच्या गैरव्यवहाराचा फटका बसला होता. सर्वसामान्य गुंतवणुकदारांपासून ते मोठ्या गुंतवणुकदारांपर्यत आणि बॅंकापासून ते अनेक कंपन्यांना या गैरव्यवहाराचे चटके बसले आहेत. या गैरव्यवहाराची व्याप्ती नेमकी किती आहे याचा खुलासा आगामी काळात होण्याची अपेक्षा आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी