Inflation rises | नवी दिल्ली : काही दिवसांत डिसेंबर संपून नवे वर्ष (New Year)म्हणजे २०२२ सुरू होणार आहे. २०२१च्या शेवटच्या टप्प्यावर आहे. नव्या वर्षाच्या स्वागतासाठी सर्व जग तयार झाले आहे. नवीन वर्षात नवीन संकल्प, नवीन आशा, नवीन प्लॅनिंग याचा उत्साह आहे. मात्र नव्या वर्षात नागरिकांचे स्वागत महागाईने (Inflation) होण्याचीच चिन्हे आहेत. नव्या वर्षात खाद्य तेलाच्या (Edible oil) भावात वाढ होऊ शकते. २०२२ मध्ये मॅन्युफॅक्चरिंग आणि कन्झ्युमर गुड्स (Consumer goods) कंपन्या आपल्या मालाच्या किंमतीत वाढ करू शकतात. कच्च्या मालाच्या (raw material prices)किंमतीत वाढ झाल्यामुळे यावर्षीदेखील या कंपन्यांनी आधीच दोन ते तीन वेळा किंमती वाढवल्या आहेत. कोरोनाच्या संकटामुळे पुरवठा साखळीत मोठ्या अडचणी निर्माण झाल्या आहेत. याचाही परिणाम वस्तूंच्या किंमतीवर होतो आहे. (In 2022 hike in consumer goods prices is expected, common man to suffer by inflation)
एफएमसीजी कंपन्यांच्या उत्पादनात पुढील तीन महिन्यात ४ ते १० टक्के वाढ होऊ शकते. डिसेंबर महिन्यात कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक्स कंपन्यांनी आपल्या उत्पादनांच्या किंमतीत ३ ते ५ टक्के वाढ केली आहे. या महिन्यात फ्रीज, वॉशिंग मशीन, एअर कंडिशन यांच्या किंमतीत वाढ झाली आहे. या वस्तूंच्या किंमतीमध्ये आणखी १० टक्के वाढ होण्याचा अंदाज व्यक्त केला जातो आहे. डिसेंबर २०२० नंतर व्हाइट गुड्सच्या किंमतीत तीन वेळा वाढ झाली आहे. आता चौथ्यांदा वाढ होण्याची चिन्हे आहेत.
ऑटोमोबाइल सेक्टरवरदेखील महागाईचा प्रभाव दिसून आला आहे. यापुढेही या क्षेत्रावर याचा परिणाम होणार आहे. यावर्षी वाहन उत्पादक कंपन्यांनी अनेक वेळा वाहनांच्या किंमतीत वाढ केली आहे. मारुती सुझुकी, टाटा मोटर्स, ह्युंदाई, महिंद्रा अॅंड महिंद्रा, स्कोडा, वोक्सवॅगन यासारख्या कंपन्यांनी वाहनांच्या किंमतीत याआधीच वाढ केली आहे. यातील काही कंपन्यांनी तर सांगितले आहे की त्या २०२२ मध्येदेखील किंमती वाढवणार आहेत.
एफएमसीजी कंपन्या ज्या दैनंदिन वापरासाठीच्या वस्तूंचे उत्पादन करतात, त्यांनी याआधीही किंमतीत वाढ केली आहे. मागील दोन तिमाहींमध्ये हिंदूस्थान युनिलिव्हर, डाबर, ब्रिटानिया, मारिको या कंपन्यांनी आपल्या उत्पादनांच्या किंमतीत ५ ते १२ टक्क्यांपर्यत वाढ केली आहे. पुढील तीन महिन्यात आणखी ५ ते १० टक्के वाढ होण्याची शक्यता आहे. या कंपन्यांचे म्हणणे आहे की महागाई लक्षात घेता आधीच किंमतीत वाढ झाली आहे. जर महागाई नियंत्रणात आली नाही तर वस्तूंच्या किंमतीत आणखी वाढ होईल.
जाणकारांच्या मते कच्च्या तेलाच्या किंमतीत २२ ते २३ टक्के वाढ झाली आहे. स्टील, कॉपर, अॅल्युमिनियम, प्लास्टिक आणि इतर मालाच्या किंमतीत तेजी आल्याने कंपन्यांचा उत्पादन खर्च वाढला आहे. महत्त्वाच्या कच्च्या मालाच्या किंमती सध्या उच्चांकीवर आहेत. याशिवाय वाहतुकीचा खर्चदेखील वाढला आहे. माल वाहतुकीसाठी वापरले जाणाऱ्या कंटेनरचादेखील तुटवडा आहे, त्यामुळे त्याचा खर्च वाढला आहे. याशिवाय कच्च्या तेलाचे भाव, पॅकेजिंगचा खर्च यातही मोठी वाढ झाली आहे.