In Mumbai and MMR, CNG is Rs 76 per kg and PNG is Rs 45.50 per SCM : मुंबई : महानगर गॅस कंपनीने दिलेल्या माहितीनुसार मुंबई आणि मुंबई महानगर प्रदेशात (Mumbai Metropolitan Region - MMR) शनिवार ३० एप्रिल २०२२ पासून सीएनजी (Compressed Natural Gas - CNG) ७६ रुपये एक किलो या दराने तर घरगुती वापराचा पीएनजी (Piped Natural Gas - PNG) ४५.५० रुपये स्टँडर्ड क्युबिक मीटर (एससीएम / SCM) या दराने उपलब्ध होणार आहे. गॅस उत्पादन आणि पुरवठा या प्रक्रियेसाठी होणाऱ्या खर्चाचा विचार करुन सुधारित दर निश्चित करण्यात आल्याचे महानगर गॅस कंपनीने सांगितले.
मुंबई आणि मुंबई महानगर प्रदेशात १३ एप्रिल २०२२ पासून सीएनजी ७२ रुपये एक किलो या दराने तर घरगुती वापराचा पीएनजी ४५.५० रुपये स्टँडर्ड क्युबिक मीटर (एससीएम / SCM) या दराने उपलब्ध होता. पण गॅस उत्पादन आणि पुरवठा या प्रक्रियेसाठी होणाऱ्या खर्चाचा विचार करुन महानगर गॅस कंपनीने सीएनजीच्या दरात प्रति किलो चार रुपये एवढी वाढ करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे शनिवार ३० एप्रिल २०२२ पासून मुंबई आणि मुंबई महानगर प्रदेशात सीएनजी ७६ रुपये एक किलो या दराने तर घरगुती वापराचा पीएनजी ४५.५० रुपये स्टँडर्ड क्युबिक मीटर (एससीएम / SCM) या दराने उपलब्ध होणार आहे. पीएनजीच्या दरात कोणताही बदल केलेला नाही.
सीएनजी ७६ रुपये एक किलो या दराने उपलब्ध झाला तरी मुंबई आणि मुंबई महानगर प्रदेशात मिळणाऱ्या पेट्रोलच्या तुलनेत ५७ टक्के आणि डिझेलच्या तुलनेत २७ टक्के स्वस्त आहे, असे महानगर गॅस कंपनीने सांगितले.
सीएनजी आणि पीएनजी हे दोन्ही पर्यावरणाला अनुकूल असे ऊर्जेचे पर्याय आहेत. महानगर गॅस कंपनीच्या सुधारित दरामुळे वाहनांच्या सीएनजीवरील खर्चात वाढ होणार आहे. पण घरी स्वयंपाक करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या पीएनजीवरील खर्चात वाढ होणार नाही.