India extends ban on international flights till november 30 । नवी दिल्ली: कोरोना संकटामुळे भारताच्या नागरी विमान वाहतूक मंत्रालयाच्या अखत्यारित असलेल्या डीजीसीएने आंतरराष्ट्रीय विमान वाहतुकीवर ३० नोव्हेंबर पर्यंत बंदी घातल्याचे जाहीर केले आहे.
ज्या देशांसोबत बायो बबल करार झालेले नाही त्या देशांमधून प्रवासी वाहतूक करणारे विमान बंदी काळात भारतात येऊ शकणार नाही. तसेच भारतातून त्या देशांमध्ये प्रवासी वाहतूक करणारे विमान बंदी काळात जाऊ शकणार नाही.
निवडक देशांनी नागरिकांच्या सोयीसाठी विशेष प्रवासी वाहतूक विमान सेवा सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यातील कोणतेही विमान भारतात येणार असेल अथवा भारतातून जाणार असेल तर त्याला डीजीसीएकडून आवश्यक ती परवानगी घ्यावी लागणार आहे. ज्या विमानांसाठी आधीच अशी परवानगी घेण्यात आली आहे त्या विमानांची वाहतूक ठरल्याप्रमाणे होईल. मालवाहतूक करणाऱ्या विमानांच्या प्रवासावर बंदी घालण्यात आलेली नाही.