भारताचा विदेशी चलनसाठा ५१३.२५ अब्ज डॉलर

Indian foreign exchange reserves are at an all time high कोरोना संकटामुळे अर्थव्यवस्था मंदावली असली तरी भारताचा विदेशी चलनसाठा सातत्याने वाढत आहे.

Indian foreign exchange reserves are at an all time high
भारताचा विदेशी चलनसाठा ५१३.२५ अब्ज डॉलर 

थोडं पण कामाचं

  • भारताचा विदेशी चलनसाठा ५१३.२५ अब्ज डॉलर
  • भारताच्या सोन्याच्या सरकारी साठ्यात वाढ
  • राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय घडामोडींचा अर्थव्यवस्थेवर सकारात्मक परिणाम

नवी दिल्ली: कोरोना संकटामुळे अर्थव्यवस्था मंदावली असली तरी भारताचा विदेशी चलनसाठा सातत्याने वाढत आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार देशाचा विदेशी चलनसाठा आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर (Indian foreign exchange reserves are at an all time high) जाऊन पोहोचला आहे. भारताकडे ३ जुलै रोजी संपलेल्या आर्थिक आठवड्यानंतर ५१३.२५ अब्ज डॉलर विदेशी चलनसाठा आहे. याआधी २६ जून रोजी संपलेल्या आर्थिक आठवड्यानंतर देशाकडे ५०६.८४ अब्ज डॉलर विदेशी चलनसाठा होता.

विदेशी चलनसाठ्यात सातत्याने वाढ

भारताकडे ५ जून रोजी संपलेल्या आर्थिक आठवड्यानंतर ५०१.७० अब्ज डॉलर विदेशी चलनसाठा होता. यानंतर देशाच्या विदेशी चलनसाठ्यात सातत्याने वाढ होत आहे. विदेशी चलनसाठ्या प्रमाणेच देशाच्या सरकारी सोन्याच्या साठ्यातही वाढ झाली आहे.

भारताच्या सोन्याच्या सरकारी साठ्यात वाढ

भारताकडे ३४.०२ अब्ज डॉलर मूल्य असलेला सोन्याचा साठा आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडे (International Monetary Fund - IMF) सुरक्षा ठेव (security deposit) म्हणून भारताने ठेवलेल्या रकमेचे बाजार मूल्य ४.५२ अब्ज डॉलर झाले आहे. 

देश बिकट परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी सक्षम

वाढलेला विदेशी चलनसाठा, वाढलेला सोन्याचा साठा, शेअर बाजारातील समाधानकारक स्थिती यामुळे अर्थव्यवस्था सुस्थितीत असल्याचे चित्र दिसत आहे. कोरोना संकटामुळे मागील काही महिन्यांपासून आंतरराष्ट्रीय व्यापार थंडावला आहे. औषधं, वैद्यकीय साहित्य, जीवनावश्यक वस्तू आणि पदार्थ यांच्या व्यापाराला प्राधान्य आले आहे. अनेक प्रकारचे व्यवसाय कोलमडले आहेत. हॉटेल, पर्यटन, मनोरंजन अशा सेवा क्षेत्रांवर कोरोना संकटाचा मोठा परिणाम झाला आहे. या पार्श्वभूमीवर विदेशी चलसाठा वाढल्यामुळे देश बिकट परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी आणखी सक्षम झाल्याचे चित्र दिसत आहे.

राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय घडामोडींचा अर्थव्यवस्थेवर सकारात्मक परिणाम

मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स समुहातील रिलायन्स इंडस्ट्रीज आणि इंग्लंडच्या बीपी या  कंपनीत सहकार्य करार झाला आहे. या व्यतिरिक्त जिओ कंपनीत थेट विदेशी गुंतवणुकीच्या स्वरुपात मोठ्या प्रमाणावर पैसा आला आहे. कोरोना संकटाच्या काळात झालेल्या या विदेशी गुंतवणुकीमुळे भारतीय व्यवसाय क्षेत्राची आंतरराष्ट्रीय प्रतिमा सुधारण्यास मदत होत आहे. चीनमधून बाहेर पडत असलेल्या अनेक आंतरराष्ट्रीय कंपन्या भारतात लवकरच स्वतःचे कारखाने सुरू करण्यास इच्छुक आहे. अनेक विदेशी कंपन्यांनी त्यादृष्टीने चाचपणी सुरू केली आहे. भारतात मध्य प्रदेशमधील रेवा येथे आशियातला सर्वात मोठा सौरऊर्जा प्रकल्प सुरू झाला आहे. भारतात ऊर्जा निर्मितीच्या क्षेत्रात प्रदूषण कमी करुन वीज निर्मिती वाढवण्यासाठी अभिनव प्रयोग मोठ्या प्रमामावर करत आहे. हा संदेश जगभर पोहोचल्यामुळे बड्या कंपन्या भारतात गुंतवणूक करण्यास उत्सुक आहेत. या घडामोडींचा देशाच्या अर्थव्यवस्थेवर सकारात्मक परिणाम झाला आहे. भारताच्या आत्मनिर्भर भारत योजनेला अपेक्षित यश मिळाल्यास वर्षभरात देशाची अर्थव्यवस्था आणखी सुदृढ होईल, असा विश्वास अनेक अर्थतज्ज्ञ व्यक्त करत आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी