धक्कादायक! IndusInd बॅंकेने न मागताच वाटले ८४ हजार ग्राहकांना कर्ज, शेअरमध्ये १२ टक्क्यांची मोठी घसरण

IndusInd Bank Share | का अज्ञात जागरुक व्यक्तीने बॅंकेचे व्यवस्थापन आणि रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाला इंडसइंड बॅंकेचीच सहाय्यक कंपनी असलेल्या बीएफआयएलद्वारे देण्यात आलेल्या कर्जाबद्दल पत्र लिहिले आहे. या पत्रात आरोप करताना म्हटले आहे की काही अटींसह कर्जाचे नुतनीकरण (Loan Evergreening)करण्यात आले आहे.

IndusInd bank
इंडसइंड बॅंकेच्या शेअरमध्ये मोठी घसरण 
थोडं पण कामाचं
  • इंडसइंड बॅंकेच्या (IndusInd bank) शेअरमध्ये आज (८ नोव्हेंबर) १२ टक्क्यांची जबरदस्त घसरण
  • बॅंकेने तांत्रिक घोळामुळे ८४,००० ग्राहकांना न मागताच कर्ज दिल्याचे वृत्त समोर आल्याने बॅंकेच्या शेअरमध्ये मोठी घसरण
  • बॅंकेचे सध्याचे जे ग्राहक कर्जाची परतफेड करू शकत नव्हते त्यांना पुन्हा नवे कर्ज देण्यात आल्याचा आरोप, बॅंकेकडून खंडन

IndusInd Bank | मुंबई : खासगी क्षेत्रातील आघाडीची बॅंक असलेल्या इंडसइंड बॅंकेच्या (IndusInd bank) शेअरमध्ये आज (८ नोव्हेंबर) १२ टक्क्यांची जबरदस्त घसरण झाली. मुंबई शेअर बाजारात (Share Market) हा शेअर १२.३३ टक्क्यांनी घसरून १०४२.१० रुपये प्रति शेअरच्या पातळीवर आला होता. त्यानंतर त्यात काहीशी सुधारणा होत १,०६५ रुपयांच्या पातळीवर व्यवहार करत होता. बॅंकेने तांत्रिक घोळामुळे ८४,००० ग्राहकांना न मागताच कर्ज दिल्याचे वृत्त समोर आल्याने बॅंकेच्या शेअरमध्ये मोठी घसरण झाली. लोन एव्हरग्रीनिंग (Loan Evergreening) संदर्भात माहिती देण्यात आली की इंडसइंड बॅंकेकडून परवानगी न मागताच ग्राहकांना कर्ज (Loan Distribution by IndusInd bank) वाटण्यात आले आहे. मात्र इंडसइंड बॅंकेकडून या वृत्ताचे खंडन करण्यात आले असून ही माहिती पूर्णपणे निराधार आणि चुकीची असल्याचे बॅंकेने म्हटले आहे. (IndusInd Bank Share : Share price of IndusInd bank tanked 12 % despite of clarification regarding Loan evergreening issue)

काय आहे हे प्रकरण?

प्रसार माध्यमांमधून समोर आलेल्या वृत्तानुसार एका अज्ञात जागरुक व्यक्तीने बॅंकेचे व्यवस्थापन आणि रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाला इंडसइंड बॅंकेचीच सहाय्यक कंपनी असलेल्या बीएफआयएलद्वारे देण्यात आलेल्या कर्जाबद्दल पत्र लिहिले आहे. या पत्रात आरोप करताना म्हटले आहे की काही अटींसह कर्जाचे नुतनीकरण (Loan Evergreening)करण्यात आले आहे. या पद्धतीने बॅंकेचे सध्याचे जे ग्राहक कर्जाची परतफेड करू शकत नव्हते त्यांना पुन्हा नवे कर्ज देण्यात आले. म्हणजे नवे कर्ज घेऊन हे ग्राहक जुने कर्ज फेडू शकतील आणि त्यामुळे त्यांचे अकाउंट क्लिअर होईल आणि बॅंकेचा ताळेबंद व्यवस्थित दिसेल. 

मे २०२१ मध्ये झाली होती चूक

बॅंकेवर झालेल्या आरोपावर इंडसइंड बॅंकेकडून सांगण्यात आले आहे की 'बॅंक अशा प्रकारे कर्ज वाटपाच्या म्हणजे लोन एव्हरग्रीनिंगचे आरोप फेटाळते आहे. बीएफआयएलद्वारे देण्यात आलेले कर्ज सर्व प्रकारच्या नियमांचे आणि मार्गदर्शक सूचनांचे पालन केल्यानंतरच देण्यात आले आहे. यामध्ये कोविड-१९च्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेच्या संकट काळात दिलेल्या कर्जाचादेखील समावेश आहे.' बॅंकेने म्हटले आहे की मे २०२१ मध्ये तांत्रिक घोळ झाल्यामुळे जवळपास ८४,००० ग्राहकांना त्यांची परवानगी न घेताच कर्ज दिले होते. ज्या ८४,००० ग्राहकांना कर्ज देण्यात आले आहे त्यामधील २६,०७३ ग्राहक सप्टेंबर २०२१च्या अखेरपर्यत अॅक्टिव्ह होते. त्यांच्यावर ३४ कोटी रुपयांचे थकित कर्ज होते. सप्टेंबरअखेर सरलेल्या तिमाहीच्या ताळेबंदात याचे प्रमाण ०.१२ टक्के आहे.

सप्टेंबरअखेर बॅंकेच्या नफ्यात ७२ टक्के वाढ

सप्टेंबरअखेर सरलेल्या तिमाहीत इंडसइंड बॅंकेची आर्थिक कामगिरी चांगली झाली आहे. या तिमाहीत बॅंकेला चांगला नफा झाला आहे. मागील वर्षाच्या याच कालावधीशी तुलना करता बॅंकेच्या नफ्यात ७२ टक्क्यांची वाढ झाली आहे. तर बॅंकेने १,११३ कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला आहे. सप्टेंबर २०२० अखेर बॅंकेला ६४७ कोटी रुपयांचा नफा झाला होता. सप्टेंबरअखेर बॅंकेच्या उत्पन्नात जवळपास ६.५९ टक्क्यांची वाढ झाली आहे आणि बॅंकेने ७,६५० कोटी रुपयांचा महसूल कमावला आहे. बॅंकेने इतर बाबींसाठी केलेल्या तरतूदीत घट झाली असून ती १,७०३ कोटी रुपये इतकी होती.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी