नवी दिल्ली : भारतातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती असलेले रिलायंस इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांना टाइम मॅगझिनने १०० प्रभावशाली व्यक्तीमत्वांच्या यादीत स्थान दिले आहे. भारतात समलिंगी आणि तृतीयपंथींच्या हक्कांसाठी लढा देणारी अरूंधती काटजू आणि मेनका गुरूस्वामी यांनाही या यादीमध्ये स्थान देण्यात आले आहे. टाइम मॅगझिनकडून बुधवारी ही यादी जाहीर करण्यात आली.
टाइम मॅगझीनने २०१९ची १०० सर्वाधिक प्रभावशाली व्यक्तिमत्वांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये राजकीय नेते, असामान्य नागरिक, कलाकार, आयकॉन यांचा समावेश आहे. अंबानींना या यादीत स्थान मिळाले असून, सर्वाधिक प्रभावशाली टाइटन्स म्हणून त्यांचे नाव समाविष्ट करण्यात आले आहे. या यादीमध्ये अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, पोप फ्रान्सिस, चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग, पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान, फेसबुकचे संस्थापक मार्क झुकरबर्ग आणि इंडो-अमेरिकन कॉमेडियन हसन मिनहाज यांच्या नावांचाही समावेश आहे.
अंबानींच्या प्रभावशाली व्यक्तिमत्वांच्या यादीतील स्थानाविषयी महिंद्र उद्योग समुहाचे अध्यक्ष आनंद महिंद्र यांनी म्हटले आहे की, मुकेश अंबानींची महत्त्वाकांक्षा त्यांचे वडील धीरूभाई अंबानींपेक्षाही मोठी आहे. मुकेश अंबानी त्यांचा प्रत्येक प्रोजेक्ट सुरू करण्यापूर्वी वडिलांचा आशीर्वाद घेतात. मुकेश अंबानी यांनी ज्या पातळीवर रिलायन्स जिओ मोबाईल डेटा नेटवर्क लाँच केले आहे, ते खूपच यशस्वी झाले आहे. आतापर्यंत त्या नेटवर्कच्या माध्यमातून २८ कोटी लोकांना परवडणाऱ्या दराने ४-जी नेटवर्कशी जोडले आहे. हे निश्चितच प्रभावशाली आहे.
मुकेश अंबानी फोर्ब्सच्या श्रीमतांच्या यादीत १३ व्या स्थानावर होते. गेल्या महिन्यात त्यांनी सहाव्या स्थानावर झेप घेतली आहे. फोर्ब्सच्या २०१९च्या आकडेवारीनुसार सध्या मुकेश अंबानी यांची संपत्ती पाच हजार कोटी डॉलर आहे. गेल्या वर्षी २०१८मध्ये त्यांची संपत्ती ४ हजार कोटी डॉलर होती.
एका बाजुला मुकेश अंबानी प्रभावशाली व्यक्तींच्या तसेच श्रीमंत व्यक्तींच्या यादीत आघाडीवर जात आहे. तर, दुसरीकडे त्यांचे धाकटे बंधू अनिल अंबानी कर्जबाजारी आहेत. दोन्ही भावांमध्ये वाद झाल्यानंतर २००५च्या सुमारास रिलायन्स उद्योग दोन भावांमध्ये वेगवेगळा झाला. मुकेश अंबानींकडे पेट्रोलियम आणि इतर उर्जेशी संबंधित कंपन्या राहिल्या तर, अनिल अंबानींकडे टेलिकॉम, फायनान्स आणि पॉवर या कंपन्या आल्या. मुकेश अंबानी गेल्या जवळपास १५ वर्षांत त्यांच्याकडील उद्योगांना एका उंचीवर नेऊन ठेवले. तर दुसरीकडे अनिल अंबानी यांची अवस्था बुडत्याचा पाय खोलात अशी झाली आहे. त्यांच्यावर राफेल डिल प्रकरणात मोदी सरकारने झुकते माप दिल्याचा आरोपही आहे. त्यांचा कधी असा गौरव होणार अशी, चर्चा होत आहे.