ऑगस्टमध्ये महागाईचा दणका! घाऊक महागाई ११.३९ टक्क्यांवर

ऑगस्ट महिन्यात घाऊक किंमत निर्देशांक (Wholesale Price Index)वाढून ११.३९ टक्क्यांवर पोचला आहे. महागाई वाढण्यासाठी इंधन आणि वीजेच्या किंमती आणि उत्पादित वस्तूंच्या किंमतीत झालेली वाढदेखील कारणीभूत आहे.

Wholesale Price Index
घाऊक महागाई वाढली 

थोडं पण कामाचं

  • ऑगस्ट महिन्यात महागाईत वाढ
  • घाऊक किंमत निर्देशांक (Wholesale Price Index)वाढून ११.३९ टक्क्यांवर
  • इंधन आणि वीजेच्या किंमतीत झालेल्या वाढीमुळे घाऊक महागाई वाढली

नवी दिल्ली: महागाईमुळे सर्वसामान्य माणसाला मोठा दणका बसला आहे. ऑगस्ट महिन्यात घाऊक किंमत निर्देशांक (Wholesale Price Index)वाढून ११.३९ टक्क्यांवर पोचला आहे. सरकारने दिलेल्या आकडेवारीनुसार इंधन आणि वीजेच्या किंमतीत झालेल्या वाढीमुळे घाऊक महागाई वाढली आहे. याचबरोबर महागाई वाढण्यासाठी उत्पादित वस्तूंच्या किंमतीत झालेली वाढदेखील कारणीभूत आहे. (In August, Wholesale Price Index in India goes upto 11.39 %)

काय असतो घाऊक किंमत निर्देशांक (Wholesale Price Index)

घाऊक किंमत निर्देशांक म्हणजेच होलसेल प्राईस इंडेक्स हा घाऊक बाजारात खरेदी-विक्री केल्या जाणाऱ्या वस्तूंच्यासंदर्भात असतो. एक व्यावसायिक किंवा व्यापारी दुसऱ्या व्यापाऱ्याशी घाऊक बाजारात ज्या वस्तूंची खरेदी किंवा विक्री करतो त्या वस्तूंच्या किंमतीशी हा निर्देशांक अवलंबून असतो. थोडक्यात घाऊक बाजारातील व्यवहारांशी हा निर्देशांक निगडीत असतो. तर कन्झ्युमर प्राईस इंडेक्स (CPI) म्हणजे ग्राहक किंमत निर्देशांक हा बाजारात सर्वसामान्य ग्राहकांकडून विकत घेतल्या जाणाऱ्या वस्तूंशी निगडती असतो. सीपीआयवर आधारित महागाईला किरकोळ महागाईदरदेखील म्हणतात.

ऑगस्ट किती आणि का वाढली घाऊक महागाई

समोर आलेल्या आकडेवारीनुसार इंधनाच्या किंमतीमधील वाढीमुळे घाऊक महागाई वाढली आहे. त्याचबरोबर वीजेशी आणि इंधनाशी निगडीत महागाईदर २६.०२ टक्क्यांवरून वाढून २६.०९ टक्क्यांवर पोचला आहे. तर उत्पादित वस्तूंची महागाई ११.२० टक्क्यांवरून वाढून ११.३९ टक्के झाली आहे. अर्थात घाऊक बाजारात खाद्यपदार्थांशी निगडीत महागाी ४.४६ टक्क्यांवरून घटून ३.३४ टक्क्यांवर आली आहे.

सर्वसामान्यांवरील परिणाम

तज्ज्ञांनुसार घाऊक महागाई दर वाढल्यामुळे सर्वसामान्य ग्राहक आणि कंपन्या दोघांवरही याचा विपरित परिणाम होतो. अशा परिस्थितीत रिझर्व्ह बॅंक व्याजदरात वाढ करू शकते. त्यामुळे कंपन्यांच्या व्याजावरील खर्चात वाढ होईल. त्याचा परिणाम होत कंपन्यांचा नफा कमी होईल आणि परिणामी कंपन्यांच्या विस्ताराच्या योजना बारगळतील. रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाचा अंदाज आहे की महागाई दुसऱ्या तिमाहीपर्यत कमी होऊ शकते. कारण या काळात खरीप पीकांच्या कापणीचा मोसम येईल. महागाईचा फटका भारत आणि इतर विकसनशील देशांवरच नाही तर विकसित देशांमध्येदेखील बसला आहे. अमेरिकेतील महागाईदर १३ वर्षातील उच्चांकीवर आहे.

कोरोना महामारीचा अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला आहे. याचा परिणाम अर्थव्यवस्थेवर झाला आहे. मागील काही महिन्यांपासून अर्थव्यवस्थेने पुन्हा गती पकडण्यास सुरूवात केली आहे. मात्र या कालावधीत महागाईत मोठी वाढ झालेली दिसून येते आहे. कोरोनामुळे आयात आणि निर्यातीवर देखील विपरित परिणाम झाला होता. जागतिक अर्थव्यवस्थेला देखील या सर्व घटकांचा मोठा फटका बसला आहे. परिणामी उत्पादित वस्तूंच्या किंमतीत वाढ झालेली दिसून येते आहे. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीमध्ये मोठी वाढ झाली आहे. त्यामुळेदेखील इंधन आणि उत्पादित वस्तूंच्या किंमतीत वाढ झालेली दिसून येते आहे. त्यामुळे घाऊक बाजारातील व्यवहारांदेखील या सर्व घटकांचा परिणाम होतो आहे.


ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी