Intel planning semiconductor manufacturing unit in India : नवी दिल्ली : माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील बलाढ्य बहुराष्ट्रीय कंपनी अशी ख्याती असलेली इंटेल कंपनी चीन ऐवजी भारतात नवा सेमीकंडक्टर निर्मिती प्रकल्प सुरू करणार आहे. मोदी सरकारने भारताला जगाचे सेमीकंडक्टर हब म्हणून विकसित करण्यासाठी योजना आखली आहे. या योजनेला इंटेलच्या निर्णयामुळे मोठे यश मिळाले आहे.
माहिती तंत्रज्ञान आणि इलेक्ट्रॉनिक्स खात्याचे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ट्वीट करून इंटेलचे भारतात स्वागत आहे; असे सांगत इंटेलच्या आगमनाची माहिती दिली आहे. सेमीकंडक्टर आणि डिस्प्ले मॅन्युफॅक्चरिंगचे आंतरराष्ट्रीय हब विकसित करण्यासाठी केंद्र सरकारने ७६ हजार कोटी रुपयांच्या धोरणाला मान्यता दिली आहे. हे धोरण जाहीर झाल्यानंतर भारतात येत असलेली इंटेल ही पहिली मोठी बहुराष्ट्रीय कंपनी आहे.
इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनात सेमीकंडक्टर अतिशय महत्त्वाचे आहे. यामुळेच सेमीकंडक्टरच्या मागणीत सातत्याने वाढ होत आहे. नवनवे आधुनिक सेमी कंडक्टर विकसित करण्याचे काम पण वेगाने सुरू आहे. भारत सरकारने ही वेगाने विकसित होत असलेली जागतिक बाजारपेठ काबीज करण्यासाठी धोरणात्मक निर्णय घेतले आहेत. या प्रयत्नांना इंटेल कंपनीच्या आगमनामुळे पहिले मोठे यश मिळाले आहे.
सेमीकंडक्टर आणि डिस्प्ले फॅब्स निर्मिती प्रकल्पांना प्रकल्प खर्चाच्या ५० टक्क्यांपर्यंत आर्थिक सहाय्य देण्याची योजना सरकारने जाहीर केली आहे. सिलिकॉन सेमीकंडक्टर फॅब, डिस्प्ले फॅब, कंपाऊंड सेमीकंडक्टर, सिलिकॉन फोटोनिक्स, सेन्सर्स फॅब, सेमीकंडक्टर पॅकेजिंग आणि सेमीकंडक्टर डिझाइनमध्ये गुंतलेल्या जास्तीत जास्त कंपन्यांना भारतात आणण्यासाठी केंद्र सरकार विशेष प्रयत्न करत आहे.
सध्या चीन आणि तैवानमध्ये मोठ्या प्रमाणावर सेमीकंडक्टरचे उत्पादन होते. भारत चीनला टक्कर देणे आणि देशाच्या विकासाला चालना देणे तसेच रोजगार निर्मिती करणे या सर्व उद्देशांसाठी देशात जगाचे सेमीकंडक्टर हब विकसित करण्याचा प्रयत्न करत आहे. यासाठीचे धोरण जाहीर केल्यापासून भारत सरकार बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या अधिकाऱ्यांशी संवाद साधत आहे. पुढील काही वर्षांत जास्तीत जास्त कंपन्या भारतात सेमीकंडक्टरचे उत्पादन सुरू करतील; असा विश्वास केंद्र सरकारने व्यक्त केला आहे.