Tata Group Greatness : टाटांना ‘भारताची शान’ म्हणतात, ते काय उगाच? या गोष्टी वाचून येईल ‘Proud Feel’

काम-धंदा
अमोल जोशी
Updated Jun 03, 2022 | 16:26 IST

टाटा कंपनीच्या स्थापनेपासून आजवरचा इतिहास पाहिला, तर अभिमान वाटावा अशी कामगिरी टाटांनी केली आहे. टाटांच्या आजवरच्या प्रवासातील काही ठळक टप्पे.

Tata Group Greatness
टाटांची थोरवी  |  फोटो सौजन्य: Times of India
थोडं पण कामाचं
  • टाटा हा देशातील सर्वात 'मौल्यवान' ब्रँड
  • 'भारतरत्न' मिळालेले जेआरडी हे एकमेव उद्योगपती
  • टाटांनीच सुरू केली 8 तास काम करण्याची पद्धत

Tata Group Greatness | टाटा ग्रुप (Tata Group) आणि भारत (India) यांचं एक घट्ट आणि अतूट नातं आहे. भारताची जगभरात ज्या ज्या श्रेष्ठ कारणांसाठी ओळख आहे, त्यापैकी टाटा हे एक मोठं कारण. त्यामुळेच ब्रँड फायनान्सेस (BF) या ब्रिटनच्या जगविख्यात व्हॅल्यूएशन कंपनीनं ‘टाटा सन्स’ला भारतातील सर्वात मौल्यवान (Valuable Company) कंपनीचा बहुमान दिला आहे. 

जगभरात कारभार

टाटा सन्स या कंपनीची स्थापना झाली 1868 साली. या कंपनीचा व्यापार आता भारतासह जगभरातील 175 देशांमध्ये विस्तारला आहे. टाटा सन्स कंपनीचे संस्थापक जमशेदजी टाटा यांना ‘फादर ऑफ इंडियन इंटस्ट्री’ म्हटलं जातं. 

पहिली स्वदेशी कार

भारतातील पहिली संपूर्ण स्वदेशी बनावटीची कार तयार करण्याचं श्रेयही टाटा ग्रुपलाच जातं. कंपनीनं 1998 साली टाटा इंडिका ही पहिली स्वदेशी हॅचबॅक कार तयार केली. 

Tata Indica

सैनिकी उपकरणांची निर्मिती

टाटा ग्रुपकडून गेल्या कित्येक दशकांपासून सैन्यदलासाठी आवश्यक सामुग्रीचं उत्पादन केलं जातं. शस्त्रधारी ट्रक, कॉम्बॅट रेडी व्हेईकल्स यासारख्या वाहनांची निर्मिती आणि पुरवठा टाटांकडूनच केला जातो. 

सर्वात स्वस्त कार

जगातील सर्वात स्वस्त कार तयार करण्याचा विक्रमही टाटांच्याच नावे नोंदवला गेला आहे. 2008 साली लॉन्च करण्यात आलेली ‘टाटा नॅनो’ ही कार केवळ 1 लाख रुपयांत सामान्यांना उपलब्ध करून देण्यात आली होती. 

Tata Nano

व्यसनांपासून दूर

टाटा ग्रुपने कधीही तंबाखूजन्य पदार्थांचा आणि दारुचा व्यापार केला नाही. टाटांनी आजवर एकाही बॉलीवूड चित्रपटासाठी पैसे गुंतवले नाहीत. भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या विनंतीवरून टाटांनी देशातील पहिला कॉस्मेटिक ब्रँड सुरू केला होता. 

पंडित नेहरू आणि जेआरडी टाटा

सर्वाधिक रोजगार देणारी कंपनी

टाटा ग्रुपच्या वेगवेगळ्या कंपनीत देशभरातील 8 लाख कर्मचारी काम करतात. केंद्र सरकारच्या रेल्वे आणि संरक्षण खात्याखालोखाल सर्वाधिक रोजगार निर्मिती करण्याचा विक्रम टाटांच्याच नावे नोंदवण्यात आला आहे. 

भारतरत्न जेआरडी

भारतात आजवर केवळ एकाच उद्योगपतीला भारतरत्न देऊन सन्मानित करण्यात आलं आहे. त्या उद्योगपतीचं नाव जेआरडी टाटा. कर्मचाऱ्यांसाठी 8 तासांची ड्युटी सुरू करणारी टाटा ही भारतातील पहिली कंपनी होती. कर्मचाऱ्यांना मोफत वैद्यकीय सुविधा आणि भविष्य निर्वाह निधी सर्वप्रथम टाटांनीच सुरू केला. एखाद्या कर्मचाऱ्याचा अपघात झाला, तर त्याला किंवा कुटुंबीयांना नुकसानभरपाई देण्याची पद्धतही टाटांनीच सुरू केली. 

अमेरिकेत 2008 साली आलेल्या मंदीनंतर जेव्हा अमेरिकेतील दिग्गज कंपनी असणाऱ्या फोर्डचे दिवाळे निघाले, तेव्हा टाटांनीच ‘जग्वार लँड रोव्हर’ कंपनी खरेदी केली होती. अशा एक ना अनेक कारणांमुळे टाटांची कारकीर्द ही अभिमानास्पद ठरते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी