आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक ३१ ऑगस्टपर्यंत बंद

Intnl commercial passenger flights suspended till 31st Aug कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय व्यावसायिक प्रवासी विमान वाहतूक ३१ ऑगस्टपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय डीजीसीएने जाहीर केला

Intnl commercial passenger flights suspended till 31st Aug
आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक ३१ ऑगस्टपर्यंत बंद 

थोडं पण कामाचं

  • आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक ३१ ऑगस्टपर्यंत बंद
  • देशांतर्गत विमान वाहतुकीवर बंधनं
  • विमान उद्योग संकटात

नवी दिल्ली: कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय व्यावसायिक प्रवासी विमान वाहतूक ३१ ऑगस्टपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय (Intnl commercial passenger flights suspended till 31st Aug) डीजीसीएने जाहीर केला आहे. देशांतर्गत विमान वाहतूक आणि वंदे भारत मोहीम सुरू राहणार आहे. भारताच्या (India) नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (Director General of Civil Aviation - DGCA) ही माहिती दिली. जाहीर केलेली मुदत संपण्याच्या सुमारास परिस्थितीचा आढावा घेऊन पुढील निर्णय घेतला जाईल. तसेच देशांतर्गत वाहतूक करणाऱ्या विमानांच्या तिकिटांच्या दरांवर २४ नोव्हेंबरपर्यंत कडक बंधने घालण्यात आली आहेत.

आंतरराष्ट्रीय व्यावसायिक प्रवासी विमान वाहतुकीला बंदी

विशिष्ट अटी घालून देशांतर्गत पातळीवर मर्यादीत प्रमाणात विमान वाहतूक सुरू करण्यात आली आहे. या व्यतिरिक्त ज्यांची मायदेशी परतण्याची इच्छा आहे अशा नागरिकांसाठी विशेष आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक सुरू आहे. मात्र व्यावसायिक आंतरराष्ट्रीय प्रवासी विमान वाहतुकीला ३१ ऑगस्टपर्यंत बंदी आहे. या निर्णयामुळे वंदे भारत मोहिमेंतर्गत विशेष विमानांनी मायदेशी येणारे भारतीय नागरिक परतू शकतील. पण पर्यटन किंवा व्यावसायिक हेतूने परदेशात जाऊ इच्छिणारे तसेच परदेशातून येऊ इच्छिणारे यांना विमान वाहतुकीचा पर्याय ३१ ऑगस्टपर्यंत  उपलब्ध नसेल.

देशांतर्गत विमान वाहतुकीवर बंधनं

भारतात एकूण देशांतर्गत वाहतूक करणाऱ्या विमानांपैकी ४५ टक्के विमानांना परवानगी देणार असल्याचे डीजीसीएने जाहीर केले आहे. मात्र विमान कंपन्यांना तसेच प्रवाशांना त्यांच्यासाठी निश्चित केलेल्या मार्गदर्शक तत्वांचे पालन करण्याचे बंधन राहणार आहे. विमानांतून प्रवास करण्यासाठी प्रवाशांना वैद्यकीय तपासणी करुन घेण्याचे बंधन आहे. तब्येत बरी असलेल्यांनाच मास्क घालून आणि आरोग्याबाबतच्या डीजीसीएच्या मार्गदर्शक तत्वांचे तसेच इतर नियमांचे पालन करुन विमान प्रवास करण्याची परवानगी आहे. 

देशांतर्गत व्यावसायिक प्रवासी विमानांसाठी तिकीट दरांचे नियम

  1. जास्तीत जास्त ४० मिनिटांच्या विमान प्रवासासाठी किमान २ हजार आणि कमाल ६ हजार रुपये भाडे
  2. ४० ते ६० मिनिटांच्या प्रवासासाठी किमान २५०० रुपये ते कमाल ७५०० रुपये भाडे
  3. ६० ते ९० मिनिटांच्या प्रवासासाठी किमान ३००० रुपये ते कमाल ९००० रुपये भाडे
  4. ९० ते १२० मिनिटांच्या प्रवासासाठी किमान ३५०० रुपये ते कमाल १०,००० रुपये भाडे
  5. १२० ते १५० मिनिटांच्या प्रवासासाठी किमान ४५०० रुपये ते कमाल १३,००० रुपये भाडे
  6. १५० ते १८० मिनिटांच्या प्रवासासाठी किमान ५५०० रुपये ते कमाल १५,७०० रुपये भाडे

जगात १ कोटी ७५ लाखांपेक्षा जास्त कोरोनाबाधीत

जगात आतापर्यंत १ कोटी ७५ लाख १२ हजार ८३० कोरोनाबाधीत आढळले आहेत. यापैकी १६ लाख ४९ हजार ३२३ कोरोनाबाधीत भारतात आहेत. भारतात आढळलेल्या कोरोनाबाधितांपैकी ३५ हजार ८८७ जणांचा मृत्यू झाला आहे. देशातील १० लाख ६३ हजार २९६ कोरोनाबाधीत बरे झाले आहेत. अद्याप भारतात ५ लाख ५० हजार १४० कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. कोरोना संकट अद्याप कायम असल्यामुळे डीजीसीएने आंतरराष्ट्रीय व्यावसायिक प्रवासी विमान वाहतूक ३१ ऑगस्टपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. याआधी आंतरराष्ट्रीय व्यावसायिक प्रवासी विमान वाहतुकीवर ३१ जुलैपर्यंत बंदी होती.

कोरोना संकटाची तीव्रता वाढली

दैनंदिन व्यवहार सुरू करण्याच्या नादात मास्क वापरणे, सोशल डिस्टंस याकडे कळत नकळतपणे दुर्लक्ष झाले. या चुकांचा देशाला गंभीर परिणाम सहन करावा लागत आहे. कोरोना संकट अधिकाधिक तीव्र होत असताना आणखी समस्या वाढू नये यासाठी आंतरराष्ट्रीय विमान वाहतुकीवरील बंदी ३१ ऑगस्टपर्यंत कायम ठेवण्याचा निर्णय झाला आहे. पावसाळा सुरू झाल्यापासून कोरोना रुग्णांच्या संख्येत वेगाने वाढ होत आहे. या संदर्भात आयसीएमआर आणि अनेक अनुभवी डॉक्टरांनी धोक्याचा इशारा दिला होता. कोरोनावर प्रयोग सुरू असले तरी अद्याप प्रमाणीत असे औषध उपलब्ध नाही. त्यामुळे या संकटाचा सामना करण्यासाठी पावसाळ्याच्या आधीच केंद्र सरकारने राज्यांना खबरदारीचे उपाय करण्यास सांगितले होते. सरकारी हालचालींवर लक्ष ठेवून असलेल्या डीजीसीएने कोरोना संकटाची तीव्रता लक्षात घेऊन व्यावसायिक आंतरराष्ट्रीय प्रवासी विमान वाहतुकीवरील बंदी कायम ठेवली आहे. 

विमान उद्योग संकटात

कोरोना महामारीमुळे विमान उद्योग पुरता कोलमडला आहे. देशातील विमान कंपन्यांनी कर्मचारी कपात आणि पगार कपात सुरू केली आहे.

रेल्वेची सामान्य वाहतूक १२ ऑगस्टपर्यंत बंद

रेल्वे मंत्रालयानेही कोरोना संकटाची तीव्रता ओळखून १२ ऑगस्टपर्यंत सामान्य रेल्वे वाहतूक सुरू होणार नसल्याचे जाहीर केले आहे. मात्र कोरोना संकटामुळे ठिकठिकाणी अडकलेल्या नागरिकांसाठी विशेष गाड्या सुरू आहेत. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी