'हे शेअर मार्केट आहे! यहॉं सबकी सिर्फ डिक्शनरीमें प्रॉफिट होता है, अकाउंटमें नही होता, कमाईसाठी टाळा या ३ चुका

शेअर बाजारातील गुंतवणुकीला त्यामुळे दिवसेंदिवस अधिकाधिक पसंती दिली जात आहे. संपत्ती निर्मिती, आर्थिक स्थैर्य यामध्ये गुंतवणुकीची मुख्य भूमिका आहे. मात्र योग्य पद्धतीने केलेली गुंतवणूकच तुम्हाला कमाई करून देते

Investment Tips
शेअर बाजारात गुंतवणूक करण्याची सूत्रे 

थोडं पण कामाचं

  • शेअर बाजारातील गुंतवणुकीकडे अनेकांचा ओढा
  • गुंतवणूक करताना सर्वसामान्य गुंतवणुकदार सर्रास काही चुका करतात
  • गुंतवणूक करताना नेमके काय करू नये हे महत्त्वाचे ठरते

मुंबई : कमी कालावधीत मोठी कमाई करण्याचे साधन म्हणून अनेकजण शेअर बाजाराकडे पाहतात. शेअर बाजारातील गुंतवणुकीला (share market investment) त्यामुळे दिवसेंदिवस अधिकाधिक पसंती दिली जात आहे. संपत्ती निर्मिती आणि आर्थिक स्थैर्य यामध्ये गुंतवणुकीची मुख्य भूमिका आहे. मात्र योग्य पद्धतीने केलेली शिस्तबद्ध गुंतवणूकच तुम्हाला आयुष्यभर आर्थिक स्वातंत्र्य देऊ शकते. दुर्दैवाने गुंतवणूक करताना बहुतांश लोक त्यांच्या भावनांना अधिक महत्त्व देतात. यामुळे अनेकवेळा त्यांचे निर्णय चुकतात. गुंतवणूक करताना घेतलेले चुकीचे निर्णय आर्थिक प्रगतीच्या वाटेतील अडथळे बनतात. आपण एखादी गुंतवणूक केली म्हणजे कमी काळात भरपूर नफा मिळाला पाहिजे आणि आपण झटपट श्रीमंत झाले पाहिजे असेच अनेकांना वाटत असते. सर्वसामान्य माणसे अनेकवेळा गुंतवणूक करताना ज्या चुका करतात , त्या सहजपणे टाळता येण्यासारख्या असतात. अनेकवेळा गुंतवणूक करताना काय करावे यावर भर दिला जात असतो, मात्र त्याचबरोबर गुंतवणूक करताना नेमके काय करू नये हेदेखील तितकेच महत्त्वाचे ठरते. सर्वसामान्यपणे बहुतांश लोक शेअर बाजारात गुंतवणूक करताना ज्या चुका करतात आणि त्यामुळे ते यातून चांगली कमाई करू शकत नाहीत. अशाच 3 चुका ज्या टाळून चांगली कमाई करता येऊ शकते त्या पाहूया. (Investment Tips : 3 mistakes that should be avoided in share market investment)

१.  आपली मित्रमंडळी, परिचित सांगतील तिथे गुंतवणूक करणे

गुंतवणूक करताना प्रत्येकाची जोखीम क्षमता, उत्पन्न, आर्थिक ताकद वेगवेगळी असते. त्यानुसार निर्णय घ्यायचा असतो. मात्र आपल्या मित्रांनी किंवा परिचितांनी अमुक एका शेअरमध्ये गुंतवणूक केली किंवा कुठेतरी आपण वाचून किंवा ऐकून आपण एखाद्या शेअरमध्ये गुंतवणूक करतो. ही एक सर्रास केली जाणारी चूक आहे. इतरांनी मग ते आपल्या कितीही जवळचे असोत ज्या पद्धतीने गुंतवणूक केली आहे, तशीच गुंतवणूक आपणही करण्यामुळे नुकसान होऊ शकते. त्यांना जरी त्यांच्या गुंतवणुकीने चांगला परतावा दिला असला तरी ती गुंतवणूक तुमच्यासाठी हितकारकच असेल असे अजिबात नाही. गुंतवणूक करताना तुम्ही आपले वय, आपली आर्थिक उद्दिष्टे, जोखीम क्षमता, उत्पन्न इत्यादी बाबी लक्षात घेणे आवश्यक आहे. शिवाय ज्यावेळेस आपल्या मित्रांनी किंवा परिचितांनी त्या शेअरमध्ये गुंतवणूक केली असेल ती वेळ योग्य असेल. कदाचित तुमच्यापर्यत ती वेळ निघून गेली असण्याचीही शक्यता असते.

२. एखाद्या ट्रेंडप्रमाणे गुंतवणूक करणे

काही वेळा शेअर बाजारात विशिष्ट क्षेत्रातील किंवा विशिष्ट प्रकारच्या कंपन्या जास्त तेजीत असतात. अशावेळी बहुतांश जण त्या क्षेत्रातील किंवा त्या प्रकारातील कंपन्यांच्या शेअरमध्ये विचार न करता धडाधड गुंतवणूक करतात. शेअर बाजारातील ट्रेंड सतत बदलत असतात. अशावेळी आपण ही बाब लक्षात घेऊन पैसा लावला पाहिजे. बऱ्याचवेळा ट्रेंड निघून गेल्यावर किंवा त्या कंपन्यांमधील खरी तेजी निघून गेल्यावर सर्वसामान्य गुंतवणुकदार त्यात पैसा लावत असतात. मात्र त्यांना त्याचा फायदा होत नाही. एखाद्या क्षेत्रातील कंपनीच्या शेअरने एकदा चांगली कमाई करून दिली किंवा नफा मिळवून दिला म्हणून नेहमीच त्या प्रकारची कंपनी नफा कमावून देईल असे नाही. त्यामुळे आपली गुंतवणूक एकाच ठिकाणी एकवटण्याऐवजी त्यात वैविध्य आणावे. जेणेकरून तुम्हाला सर्वच क्षेत्रातील तेजीचा लाभ मिळू शकेल.  एखाद्या गुंतवणूक प्रकारातून चांगला अनुभव किंवा परतावा मिळाल्यास त्याकडेच लक्ष देणे किंवा सर्व गुंतवणूक त्याच गुंतवणूक प्रकाराकडे वळवणे, ही अनेकवेळा केली जाणारी चूक आहे. यामुळे गुंतवणुकीचा पोर्टफोलिओ संतुलित न होता त्यातील जोखीम वाढत जाते. अनेकवेळा शेअर्समध्ये गुंतवणूक करताना ही चूक आढळून येते.

३. खूप जास्त नफ्याची किंवा परताव्याची अपेक्षा बाळगणे

शेअर बाजारात काही शेअर्स कमी कालावधीत दणदणीत कमाई करून देतातदेखील. मात्र याचा अर्थ सदासर्वदा कोणत्याही शेअरमध्ये केलेली गुंतवणूक तुम्हाला प्रचंड नफा कमावून देईल आणि तुम्ही लवकर श्रीमंत व्हाल अशी अपेक्षा बाळगणे चुकीचे आहे.  शेअर बाजारात गुंतवणूक करताना बहुतांश गुंतवणूकदार या मानसिकेतला बळी पडतात आणि मग त्यांच्या हाती निराशा येते. कोणताही गुंतवणूक प्रकार म्हणजे जादूची कांडी नव्हे. प्रत्येक गुंतवणूक प्रकाराचे काही फायदे असतात आणि काही मर्यादा. एका विशिष्ट पद्धतीने कोणत्याही गुंतवणूक प्रकारातून पैसा निर्माण होत असतो. ते लक्षात न घेता चटकन श्रीमंत होण्याचे स्वप्न पाहत गुंतवणूक केल्यास आणि अवाजवी अपेक्षा ठेवल्यास अपेक्षाभंग होत, गुंतवणुकीच्या मूळ उद्देशालाच धक्का पोचतो. यामुळे दीर्घ काळात संपत्ती निर्माण होत नाही. 

या सूत्रांचे भान ठेवून आणि संयमाने गुंतवणूक केल्यास तुम्ही शेअर बाजारातून चांगली कमाई करू शकाल. शिवाय शेअर बाजारातील चढउतारांना तुम्हाला अधिक सक्षमपणे तोंड देता येईल.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी