Investment Tips: यशस्वीरित्या गुंतवणुक करायची असेल तर वापरा 'ही' ५ सूत्रे, होईल जबरदस्त कमाई

Investment Tips: तुम्ही आपल्या विशीत असो, तिशीत किंवा चाळीशीत, जर तुम्ही अलीकडेच गुंतवणूक करण्यास सुरूवात केली आहे किंवा भविष्यात गुंतवणूक करू इच्छित असाल तर काही सूत्रे लक्षात घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

Investment Tips to create Wealth
श्रीमंत होण्यासाठी गुंतवणुकीची सूत्रे 

थोडं पण कामाचं

  • गुंतवणूक करताना लक्षात घ्यायची सूत्रे
  • गुंतवणूक करताना काय करावे आणि काय टाळावे
  • गुंतवणूक करण्यासाठीचा योग्य दृष्टीकोन काय हवा

मुंबई: तुम्ही आपल्या विशीत असो, तिशीत किंवा चाळीशीत, जर तुम्ही अलीकडेच गुंतवणूक (Investment) करण्यास सुरूवात केली आहे किंवा भविष्यात गुंतवणूक करू इच्छित असाल तर काही सूत्रे लक्षात घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. गुंतवणुकीतील जोखीम कमी करून दीर्घ कालावधीत मोठी रक्कम उभी करणे तुम्हाला भविष्यात (How to invest successfully)या सूत्रांमुळे शक्य होईल. श्रीमंत होण्यासाठी (How to create Wealth)फक्त बचत करून आणि गुंतवणूक करून हेतू साध्य होणार नाही. योग्य वेळी योग्य गुंतवणूक प्रकारात गुंतवणूक करणे आणि गुंतवणुकीसंदर्भातील काही महत्त्वाची सूत्रे (Investment Tips) समजून घेणे त्यासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरते. तुम्हाला श्रीमंत (How to become Rich) करणारी सूत्रे समजावून घेऊया. (Investment Tips : How to become successful investor, understand what to do and what not to, Investment basics for youngsters)

१. तुमची उद्दिष्टे निश्चित करा (Fix your Financial Goals)

फक्त गुंतवणूक करत राहाल तर नक्की काय करायचे आणि कधी कोणता निर्णय घ्यायचा याचे योग्य आकलन कधीच होणार नाही. त्यामुळे गुंतवणूक करत असताना आपली अल्पकालीन आणि दीर्घकालीन आर्थिक उद्दिष्टे निश्चित करा. विशेषत: ज्या गुंतवणूक प्रकारात जोखीम अधिक असते अशा गुंतवणूक प्रकारात गुंतवणूक करताना म्हणजेच शेअर्समध्ये किंवा इक्विटी म्युच्युअल फंडात गुंतवणूक करताना या गोष्टीचे महत्त्व प्रचंड असते. तुम्ही जी गुंतवणूक करत आहात ती तुमच्या मुलांच्या शिक्षणासाठी आहे की मुलांच्या लग्नासाठी आहे की तुमच्या रिटायरमेंट फंडासाठी आहे कि आणखी इतर कारणासाठी याची पुरेशा स्पष्टता तुमच्या मनात असली पाहिजे. एकदा का तुम्ही तुमची उद्दिष्टे निश्चित केलीत की ती पूर्ण करण्यासाठी तुम्हाला नेमक्या किती पैशांची आवश्यकता आहे हे स्पष्ट होईल आणि मग तुम्ही नेमकी किती बचत केली पाहिजे आणि ती कुठे गुंतवली पाहिजेत हे अगदी स्पष्ट होईल. यामुळे तुम्ही आज केलेल्या बचतीची आणि गुंतवणुकीची गोड फळे तुम्हाला भविष्यात चाखायला मिळतील. अर्थात तुम्ही जितक्या लवकर गुंतवणुकीस सुरूवात कराल तितका अधिक फायदा तुम्हाला होईल.

२. गुंतवणुकीतील जोखीम समजून घ्या (Understand the Risk)

तुम्ही ज्या गुंतवणूक प्रकारात गुंतवणूक करणार असाल त्यात गुंतवणूक करण्यापूर्वी त्यातील जोखीम काळजीपूर्वक समजून घ्या. गुंतवणुकीतील जोखीम समजून घेण्याचा सर्वात उत्तम मार्ग म्हणजे त्या प्रकारातील विविध योजनांची तुलना करणे. विविध योजनांमधील तुलना केल्याने तुम्हाला कोणत्या प्रकारात किती जोखीम आहे याते आकलन होईल आणि त्याप्रमाणे तुम्हाला तितक्याच प्रमाणात तुमचे पैसे गुंतवता येतील. गुंतवणुकीतील जोखीम समजून घेतल्याने तुम्ही ज्या प्रकारात तुमच्या पैशांना धोका उद्भवतो किंवा तुमचे भांडवल गमावण्याची शक्यता आहे, असे गुंतवणूक प्रकार टाळू शकता.

३. भावनांवर आधारित निर्णय तुम्हाला संकटात नेतात (Avoide Emotional Decisions)

गुंतवणुकीतील सर्वात प्राथमिक आवश्यकता म्हणजे भावनांवर आधारित निर्णय घेणे. विशेषत: इक्विटी प्रकारात किंवा शेअर बाजारात गुंतवणूक करताना भावनांच्या आधारे कधीही कोणताही निर्णय घेऊ नका. बाजारात चढ उतार होत असतात. शेअर बाजारात कोणत्याही शेअरच्या किंमतीत चढ उतार होण्यामागे अनेक कारणे असतात. विशेषत: अल्पकालावधीत होणारे चढ उतार हे गुंतागुंतीचे असू शकतात. अशा वेळी इतर लोक गुंतवणूक करत आहेत, किंवा बाजारात काही विशिष्ट प्रकारच्या बातम्या किंवा अफवा फिरत असतील तर त्यांचा विचार करून गुंतवणुकीचा निर्णय घेऊ नका. एखाद्या कंपनीच्या शेअरच्या किंमतीत वाढ होत असते त्याचा अर्थ भविष्यातदेखील त्यात वाढच होत जाईल असे गृहीत धरून त्या पैसे ओतणे संकटाला आमंत्रण देण्यासारख्या असते. बऱ्याचवेळा यात सर्वसामान्य गुंतवणुकादारांना भरीला घालून विशिष्ट प्रकारचे वातावरण तयार केले जाण्याचीही शक्यता आहे. त्यामुळे आपली जोखीम क्षमता आणि गुंतवणुकीचा कालावधी लक्षात घेऊन शांतपणे निर्णय घेणे योग्य ठरते.

४. गुंतवणुकीत वैविध्य ठेवा (Diverisfy your Investment Portfolio)

गुंतवणुकीचे विश्व गुंतागुंतीचे आणि वैविध्यपूर्ण आहे. गुंतवणूक प्रकारांमधील वैविध्य लक्षात घेणे आवश्यक आहे. एकाच प्रकारच्या गुंतवणूक प्रकारात गुंतवणूक करू नका. काही गुंतवणूक प्रकार हे कमी जोखमीचे आणि तुलनेने कमी परतावा देणारे असतात. तर काही गुंतवणूक प्रकार हे अधिक जोखमीचे आणि तुलनेने अधिक परतावा देणारे असतात. काही गुंतवणूक ही अल्पकालावधीची असते तर काही गुंतवणूक ही दीर्घकालीन असते. अशावेळी आपली अल्पकालीन आणि दीर्घकालीन आर्थिक उद्दिष्टे निश्चित करा. आपली गुंतवणूक विविध गुंतवणूक प्रकारात विभागून ठेवा. यामुळे तुमच्या गुंतवणुकीतील जोखीम फारच कमी होईल किंवा त्यावर तुम्हाला नियंत्रण ठेवता येईल. कारण एखाद्या गुंतवणूक प्रकारात घसरण होईल किंवा मंदी असेल तेव्हा तुम्हाला दुसऱ्या गुंतवणूक प्रकारातून चांगला परतावा मिळवता येईल.

५. चटकन श्रीमंत होण्याचे स्वप्न पाहू नका किंवा कर्ज घेऊन किंवा उसनवार पैसे घेऊन गुंतवणूक करू नका (Don't expect to become overnight Rich)

अलीकडच्या काळात चटकन श्रीमंत होण्यासाठी गुंतवणूक करण्याचे प्रमाण वाढीस लागले आहे. विशेषत: शेअर बाजारातील गुंतवणुकीकडे याच दृष्टीने पाहिले जाते. मात्र संपत्ती निर्मिती ही एक दीर्घकालीन प्रक्रिया आहे. जगातील सर्वाधिक यशस्वी गुंतवणुकदारांना देखील संपत्ती निर्माण करण्यास मोठा कालावधी लागला आहे. आज शेअर बाजारातील एखाद्या शेअरमध्ये पैसे गुंतवू आणि काही दिवसातच त्यात काही पटीने वाढ मिळवून पटकन खूप पैसे कमावू असा दृष्टीकोन ठेवणारे गुंतवणुकदार बहुतांशवेळा यात पैसे गमावताना दिसले आहेत. त्यातच कोणीतरी मित्राने किंवा परिचिताने सांगितले म्हणून किंवा कुठेतरी एखादी बातमी वाचली किंवा पाहिली म्हणून एखाद्या शेअरमध्ये काहीही विचार न करता, कोणताही अभ्यास न करता गुंतवणूक करण्याची मानसिकता अलीकडच्या काळात चांगलीच वाढली आहे. ही गुंतवणूक नव्हे हा तर सट्टा झाला. शिवाय अनेकजण अशा अपुऱ्या माहितीवर किंवा अज्ञानातून कुठूनतरी पैसे उसनवार घेऊन किंवा कर्ज काढून आपली जोखीम क्षमता लक्षात न घेता यातून फक्त फायदाच होईल असे दिवास्वप्न रंगवत एखाद्या शेअरमध्ये पैसे गुंतवतात आणि अपेक्षित फायदा न झाल्यास किंवा नुकसान झाल्यास आर्थिक संकटात सापडतात. अशा मानसिकतेपासून दूर राहणे सर्वसामान्य माणसाच्या हिताचे आहे. लक्षात ठेवा एका रात्रीत किंवा चटकन काही दिवसात किंवा महिन्यात श्रीमंत होण्याचे स्वप्न पाहू नका. ते तुम्हाला संकटातच घेऊन जाईल.
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी