Sensex Crash update : मुंबई : दलाल स्ट्रीटवर म्हणजे शेअर बाजारात (Share Market Fall) पाच दिवसांच्या घसरणीत गुंतवणूकदारांनी सुमारे 20 लाख कोटी रुपयांची संपत्ती गमावली. या पाच सत्रांमध्ये मुंबई शेअर बाजाराचा (BSE)निर्देशांक असलेला सेन्सेक्स (Sensex)सोमवारी 3,817 अंशांनी गडगडत 57,500 अंशांच्या पातळीवर पोहोचला. निर्देशांक 17 जानेवारीच्या 61,308.91 अंशांच्या पातळीवरून 24 जानेवारी रोजी 6.23 टक्क्यांनी घसरून 57,491.51 अंशावर आला. त्याचप्रमाणे, राष्ट्रीय शेअर बाजाराचा असलेला निफ्टीदेखील (Nifty)याच कालावधीत 6.33 टक्क्यांनी घसरून 17,149.10 अशांच्या पातळीवर आला. आज सेन्सेक्समध्ये 1,545.67 अंशांची घसरण होत तो 57,491.51 अंशांच्या पातळीवर आला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी आज 468.05 नी कोसळून 17,149.10 अंशांच्या पातळीवर आला. (Investors lost Rs 20 lakh crore in 5 trading session amid Share market crash)
मुंबई शेअर बाजारातील नोंदणीकृत कंपन्यांचे एकत्रित बाजार मूल्य 17 जानेवारी रोजी 280.02 लाख कोटी रुपयांवरून 19.52 लाख कोटी रुपयांनी घसरून 260.50 लाख कोटी रुपयांवर आले. बाजार निरीक्षकांचे असे मत आहे की नकारात्मक जागतिक घटक, परकी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी शेअर्सची केलेली प्रचंड विक्री ( FIIs) आणि यूएस फेडरल रिझर्व्हच्या कडक धोरणाच्या भीतीने जगभरातील जोखमीच्या गुंतवणूक पर्यायांवर मोठा परिणाम होत भारतातील शेअर बाजार गडगडला आणि कोसळला.
येस सिक्युरिटीजचे वरिष्ठ अध्यक्ष आणि संस्थात्मक इक्विटी प्रमुख, अमर अंबानी, यांना इक्विटी बाजारात आणखी घसरणीची शक्यता वाटते. “भारतीय शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात घसरण झाली. कच्च्या तेलाच्या किमतींचा घटक आणि अमेरिकन शेअर बाजारातील घडामोडी यांचा परिणाम होतो आहे. नजीकच्या काळात बाजाराला वरच्या दिशेने नेण्यासाठी कोणतेही सकारात्मक घटक दिसत नाहीत. निफ्टीत आणखी 500 अंकांची घसरण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कॉर्पोरेट कमाई आतापर्यंत सकारात्मक आहे आणि Omicron ने अर्थव्यवस्थेला भौतिकरित्या व्यत्यय आणलेला नाही. पायाभूत घटक स्थिर आहेत आणि मला खात्री आहे की निफ्टी 2022 मध्ये उच्चांक गाठेल, जसे आपण 2021 मध्ये पाहिले होते.
हिरो मोटोकॉर्प (0.39 टक्क्यांनी वाढ) आणि पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (3.46 टक्क्यांनी वर) वगळता, निफ्टी निर्देशांकातील इतर घटकांमुळे याच कालावधीत गुंतवणूकदारांच्या संपत्तीत घसरण झाली. 14.76 टक्क्यांच्या घसरणीसह, बजाज फिनसर्व्ह निर्देशांकात अव्वल ठरला. त्यापाठोपाठ टेक महिंद्रा (12.60 टक्क्यांनी घसरले), Divi's Laboratories (12.40 टक्क्यांनी घसरले), बजाज फायनान्स (12.07 टक्क्यांनी घसरले) आणि श्री सिमेंट (11.57 टक्क्यांनी घसरले). विप्रो, जेएसडब्ल्यू स्टील, एचसीएल टेक्नॉलॉजीज, इन्फोसिस, टाटा स्टील आणि अदानी पोर्ट्समध्येही १० टक्क्यांहून अधिक घसरण झाली.
मोहित निगम, हेम सिक्युरिटीजचे हेड-पीएमएस म्हणाले, “आम्हाला विश्वास आहे की ही यूएस फेडरल रिझर्व्हच्या कडक धोरणाच्या शक्यतेवर ही बाजाराची अतिरिक्त प्रतिक्रिया आहे आणि आम्ही FOMC बैठकीनंतर अल्पावधीत पुन्हा रॅली पाहू शकतो. भारतीय अर्थव्यवस्थेबाबत आमचा सकारात्मक दृष्टिकोन आहे आणि गुंतवणूकदारांनी दर्जेदार स्टॉक्स जमा करण्याची संधी म्हणून या पडझडीचा उपयोग करून घ्यावा, असे आम्हाला वाटते. तांत्रिक आघाडीवर, निफ्टी 50 ला अनुक्रमे 17,000 आणि 17,500 या पातळीवर आधार आहे. बँक निफ्टीसाठी 36,500 आणि 37,500 हे अनुक्रमे तात्काळ आधार आहे.”
परकीय संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (FII) गेल्या आठवड्यात मोठ्या प्रमाणात शेअर्सची विक्री केली. एकूण खरेदी 33,196.95 कोटी रुपये आणि एकूण विक्री 43,844.86 रुपये कोटी रुपयांची झाली. त्यामुळे शेअर बाजारातून 10,647.91 कोटी रुपये काढून घेण्यात आले. ट्रेडिंगोचे संस्थापक पार्थ न्याती म्हणाले, “गेल्या तीन वर्षांच्या ट्रेंडवर नजर टाकली तर जागतिक घटकांच्या नकारात्मकपणामुळे आपल्याला अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर बाजारात शेअर्सची विक्री दिसते आहे. तर आपल्याला अर्थसंकल्पानंतर तेजी दिसून येते. परंतु दीर्घकालीन कल पाहता कोणत्याही कॅलेंडर वर्षाची पहिली तिमाही म्हणजे जानेवारी ते मार्च या कालावधीत मंदी असते. अमेरिकन फेडरल रिझर्व्हच्या धोरणासंदर्भात शेअर बाजार जास्तीची प्रतिक्रिया देतो आहे. या बुधवारी अमेरिक फेडरल रिझर्व्हच्या बैठकीनंतर आपल्याला बाजारात तेजी दिसू शकते.