भारताच्या ओएनजीसीने गॅस शोधला, मात्र इराणने कंत्राट दिले तिसऱ्यालाच...

इराणच्या (Iran) खाडीमध्ये असलेल्या फरजाद-बी गॅस क्षेत्रात हे उत्खनन भारतीय कंपन्यांकडून करण्यात आले होते. मात्र इराणने एका स्थानिक कंपनीला या उत्खनन क्षेत्राचे अधिकार दिले आहेत.

India-Iran relations
भारत-इराण संबंध 
थोडं पण कामाचं
  • ओएनजीसी विदेश लि. (OVL)च्या नेतृत्त्वाखालील गटाने इराणमध्ये नैसर्गिक वायू (Natural Gas)शोधला
  • मे महिन्यात इराणने पेट्रोपार्स समूहाला १.७८ अब्ज डॉलरचे कंत्राट दिले
  • भारतीय कंपन्यांकडे या क्षेत्राचा ३० टक्के भागीदाराचा अधिकार

नवी दिल्ली: भारताच्या ओएनजीसी विदेश लि. (OVL)च्या नेतृत्त्वाखालील गटाने इराणमध्ये नैसर्गिक वायू (Natural Gas)शोधला आहे. इराणच्या (Iran) खाडीमध्ये असलेल्या फरजाद-बी गॅस क्षेत्रात हे उत्खनन संशोधन करण्यात आले होते. मात्र इराणने एका स्थानिक कंपनीला या उत्खनन क्षेत्राचे अधिकार दिले आहेत. अर्थात असे असतानाही ओएनजीसी विदेश लि.च्या नेतृत्वाखालील गटाकडे या क्षेत्राचा विकास आणि उत्खनन करण्यासंदर्भातील ३० टक्के भागीदारी आहे. (ONGC discovered the natural gas but IRAN gave the contract to third party)

इराणमधील फरजाद-बी क्षेत्र

फेब्रुवारी २०२० मध्ये नॅशनल इरानियन ऑइल कंपनी (NIOC)ने भारताला सांगितले होते की ते फरजाद-बी क्षेत्रातील उत्खननासंदर्भात ते इराणच्या एका कंपनीशी कंत्राट करत आहेत. यावर्षी मे महिन्यात त्यांनी पेट्रोपार्स समूहाला १.७८ अब्ज डॉलरचे कंत्राट दिले. या प्रकरणात संदर्भात एका अधिकाऱ्याकडून समोर आलेल्या माहितीनुसार या क्षेत्रातील नैसर्गिक वायूचा शोध भारतीय कंपन्यांच्या गटाने लावला होता. भारत या उत्खनन क्षेत्रात काम सुरू करू इच्छित होता. त्यामुळे भारतीय कंपन्यांनी आपला प्लॅनदेखील सादर केला होता. मात्र इराण सरकारने परदेशी कंपन्यांसोबत या प्रकल्पात पुढील काम करण्याचा निर्णय घेतला आहे. 

शोध लावल्यामुळे भारताची ३० टक्के हिस्सेदारी

अनेकांना असे वाटते आहे की इराणचा हा निर्णय भारतासाठी मोठाच धक्का आहे. अर्थात एका अधिकाऱ्यानुसार अद्याप सर्वकाही संपलेले नाही. संशोधनाचे लायसन्स असल्यामुळे आणि या क्षेत्रात नैसर्गिक वायूचे साठे शोधल्यामुळे भारतीय कंपन्यांकडे या क्षेत्राचा ३० टक्के भागीदाराचा अधिकार आहे. या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात नैसर्गिक वायूचे साठे आहेत. ओएनजीसी विदेश लि. ने जुलै २०२१ मध्ये या प्रकल्पाशी संबंधित नियम आणि अटींसंदर्भात विचारणा केली होती मात्र इराणकडून यासंदर्भात कोणतेही उत्तर आलेले नाही. ओएनजीसी विदेश लि.ने इराणच्या कंपनीला यासंदर्भात एक पत्र पाठवले आहे. भारतीय कंपनीने म्हटले आहे की या प्रकल्पावर कोणीही काम करू शकते मात्र यातील ३० टक्के हिस्सा आमच्याकडे आहे.

इराणमधील नैसर्गिक वायूचा साठा

ओएनजीसीच्या ओएनजीसी विदेश लि. कडे इराणच्या खाडीतील ३,५०० किलोमीटरमधील ब्लॉकमध्ये ४० टक्के हिस्सेदारी आहे. या प्रकल्पात इंडियन ऑईल कॉर्पोरेशनकडे ४० टक्के तर ऑईल इंडियाकडे २० टक्के हिस्सेदारी आहे. ब्लॉकसाठीच्या करारावर २५ डिसेंबर २००२ मध्ये सह्या झाल्या होत्या. ओएनजीसी विदेश लि. ने २००८ मध्ये यासंदर्भात मोठा शोध लावला होता आणि त्यानंतर या ब्लॉकला फरजाद-बी असे नाव दिले होते.

दरम्यान पेट्रोलियम कंपन्यांनी रविवारी जाहीर केलेल्या दरांनुसार मुंबईत पेट्रोलचा प्रतिलीटर दर 111.77रुपये इतका आहे. तर एका लीटर डिझेलसाठी 102.52 रुपये मोजावे लागत आहेत. तर पॉवर पेट्रोलचा प्रतिलीटर दर 115.73 रुपये इतका आहे. तर दिल्लीत पेट्रोल आणि डिझेलचा दर अनुक्रमे 105.84आणि 94.57रुपये इतका आहे. हे दर आज दिवसभरासाठी लागू राहतील. इंधनाची दरवाढ अशीच सुरु राहिल्यास पेट्रोल लवकरच 120 रुपये प्रतिलीटरचा टप्पा गाठेल, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी