IT क्षेत्रात नोकऱ्यांचा पाऊस, पुढील वर्षभरात १ लाख नोकऱ्या

चालू आर्थिक वर्षात म्हणजे २०२१-२२ या आर्थिक वर्षात TCS, Infosys, Wipro आणि HCL Technology या चार आघाडीच्या आयटी कंपन्या एक लाख फ्रेशर्सपेक्षा जास्तची भरती करणार आहेत.

Jobs in IT companies
आयटी क्षेत्रातील नोकरभरती 
थोडं पण कामाचं
  • आयटी क्षेत्रात मोठ्या प्रमाणात नोकरभरती
  • TCS, Infosys, Wipro आणि HCL Technology फ्रेशर्सची नोकरभरती
  • पुढील वर्षभरात अनेक कंपन्या करणार नोकरभरती

नवी दिल्ली: कोरोना महामारीच्या संकटात डिजिटल व्यवहार आणि कामकाजात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे डिजिटल कौशल्ये असणाऱ्यांना मोठी मागणी आहे. देशातील आयटी क्षेत्रात मोठी वाढ होते आहे. आयटी क्षेत्रात मोठ्या प्रमाणात नोकरभरती होते आहे. यामध्ये फ्रेशर्सची संख्या खूप जास्त आहे. चालू आर्थिक वर्षात म्हणजे २०२१-२२ या आर्थिक वर्षात TCS, Infosys, Wipro आणि  HCL Technology या चार आघाडीच्या आयटी कंपन्या एक लाख फ्रेशर्सपेक्षा जास्तची भरती करणार आहेत. चारही कंपन्यांनी आपल्या तिमाही निकालांची घोषणा करताना यासंदर्भातील माहिती दिली आहे. (Top IT companies to hire more than 1 lakh freshers next year)

टीसीएसमधील नोकरभरती

देशातील सर्वात मोठी आयटी कंपनी असलेली टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस म्हणजे टीसीएस (TCS)ने म्हटले आहे की चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत ३५,००० फ्रेशर्सची नोकरभरती केली जाणार आहे. या नोकरभरतीनंतर चालू आर्थिक वर्षात त्यांची एकूण नोकरभरती ७८,००० पदांवर पोचणार आहे. मागील सहा महिन्यात कंपनीने ४३,००० पदवीधरांची भरती केली आहे. सप्टेंबरअखेर सरलेल्या तिमाहीत टीसीएसचा अॅट्रिशन रेट वाढून ११.९ टक्के झाला होता तर जूनअखेर सरलेल्या तिमाहीत तो ८.६ टक्के होता. कंपनीकडून सांगण्यात आले होते वाढत्या अॅट्रिशन रेटसंदर्भात कंपनी चिंतेत आहे. पुढील दोन ते तीन तिमाहीत नोकरभरतीत तेजी राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात येते आहे.

इन्फोसिसमधील नोकरभरती

इन्फोसिसमधील नोकरभरतीबद्दल कंपनीने सांगितले आहे की चालू आर्थिक वर्षात ४५,००० फ्रेशर्सची नोकरभरती केली जाणार आहे. आधी कंपनीने ३५,००० फ्रेशर्सच्या नोकरभरतीचे नियोजन केले होते. कंपनीचे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर प्रवीण राव यांनी म्हटले की वाढत्या अॅट्रिशन रेटला लक्षात घेऊन कंपनीने फ्रेशर्सच्या नोकरभरतीत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.

विप्रोची नोकरभरती

विप्रो या देशातील आणखी एका आघाडीच्या आयटी कंपनीने सप्टेंबर अखेर सरलेल्या तिमाहीचे निकाल जाहीर करताना कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी थिएरी डेलापोर्ट यांनी म्हटले होते की सप्टेंबर अखेर सरलेल्या तिमाहीत कंपनीने ८,१०० पदवीधरांची नोकरभरती केली आहे. त्यांनी म्हटले की कंपनीने पुढील आर्थिक वर्षात २५,००० फ्रेशर्सच्या नोकरभरतीचा प्लॅन बनवला आहे.

एचसीएल टेकची नोकरभरती

एचसीएल टेक्नॉलॉजीसने म्हटले आहे की चालू आर्थिक वर्षात २० ते २२ हजार फ्रेशर्सची नोकरभरती करणार आहे. कंपनी पुढील आर्थिक वर्षांपर्यत ३०,००० फ्रेशर्सचा समावेश कंपनीत करण्याच्या तयारीत आहे.

टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस म्हणजे टीसीएस, विप्रो आणि मॅरिको सारख्या कंपन्यादेखील आता नाविन्यपूर्ण हायब्रीड मॉडेलचा विचार करत आहेत. टीसीएस ही देशातील सर्वात मोठी आयटी कंपनी आहे. टीसीएसने हे आधीच स्पष्ट केले आहे की कंपनी यावर्षाच्या अखेरपर्यत किंवा २०२२च्या सुरूवातीला ९० टक्के कर्मचाऱ्यांना कार्यालयात बोलण्याचे नियोजन करते आहे. याआधी कंपनीने २०२५ पर्यत २५ टक्के कर्मचारी वर्क फ्रॉम होम करतील असे जाहीर केले होते. ज्या कर्मचाऱ्यांना कंपनी कार्यालयात बोलावणार आहे त्यांच्या सुरक्षिततेची पूर्ण काळजी घेतली जाणार आहे. टीसीएसप्रमाणेच विप्रोदेखील वर्क फ्रॉम होम संपवून कर्मचाऱ्यांना कार्यालयात बोलावणार आहे. विप्रोदेखील हायब्रीड मॉडेल अंगीकारण्याचा विचार करते आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी