नवी दिल्ली : प्राप्तिकर विभागाने (Income Tax Department)आर्थिक वर्ष २०२०-२१ साठी करदात्यांना प्राप्तिकर विवरण पत्र फॉर्म-१ आणि ४ (आयटीआर फॉर्म-१ आणि ४) भरण्यासाठी ऑफलाईन सुविधा (Offline Filing Facility)उपलब्ध करून दिली आहे. ऑफलाईन सुविधा ई-फायलिंग पोर्टलवर उपलब्ध आहे. ही नवीन सुविधा जावा स्क्रिप्ट ऑब्जेक्ट नोटेशन (JSON)वर आधारित आहे. आकडे स्वरुपात माहिती भरण्यासाठी ही एक सोपी प्रणाली आहे. ऑफलाईन सुविधा विंडोज-७ किंवा त्यानंतरच्या आवृत्त्यांनिशी संगणकावर डाउनलोड केली जाऊ शकते.
फॉर्म-१, ४ द्वारे प्राप्तिकर विवरणपत्र भरणाऱ्यांना दिलासा
प्राप्तिकर विभागाने विवरण पत्र (आयटीआर फायलिंग) भरण्यासंदर्भातील पूर्ण माहिती देताना सांगितले आहे की ऑफलाईन सुविधेचा लाभ फक्त आयटीआर-१ आणि आयटीआर-४ या दोन फॉर्मसाठीच आहे. याव्यतिरिक्त इतर सर्व आयटीआरला नोंद जोडण्यात येईल किंवा भरण्यात येईल. आयटीआर फॉर्म-१ (सहज) आणि आयटीआर फॉर्म-४ (सुगम) हे अतिशय सोपे सुटसुटीत स्वरुपात आहेत. कमी उत्पन्न गटातील नागरिक हे फॉर्म मोठ्या प्रमाणात भरतात. ज्या नागरिकांचे वार्षिक उत्पन्न ५० लाख रुपयांपर्यत आहे असे नागरिक आयटीआर फॉर्म-१ (सहज) भरू शकतात. अशा नागरिकांचे हे वार्षिक उत्पन्न त्यांचा पगार किंवा एक घर अशा स्त्रोतांपासून मिळालेले असते.
रिटर्न फायलिंगमध्ये होऊ शकते वाढ
आयटीआर-४ असे नागरिक भरू शकतात जे हिंदू अविभावजित कुटुंबातील आहे किंवा अशा कंपन्या भरू शकतात ज्यांचे एकूण उत्पन्न ५० लाख रुपये आहे. ज्यांच्या उत्पन्नाचा स्त्रोत त्यांचा व्यवसाय किंवा नोकरी आहेत, असे नागरिक यात येतात. नांगिया एंडरसन इंडियाच्या संचालक नेहा मल्होत्रा यांनी नव्या सुविधेवर मत व्यक्त करताना म्हटले आहे की प्राप्तिकर विवरण पत्र दाखल करण्याची ही नवी सुविधा सोपी आहे. यामुळे करदात्यांना बराच दिलासा मिळणार आहे. या सुविधेत वारंवार विचारल्या जाणाऱ्या (FAQ)प्रश्नांच्या माध्यमातून मदत करण्यात आली आहे. शिवाय मार्गदर्शन नोट, परिपत्रक आणि कायद्यांतील विविध तरतूदी यांचादेखील उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे करदाते कोणत्याही अडचणीशिवाय प्राप्तिकर विवरणपत्र भरू शकणार आहेत. प्राप्तिकर विवरणपत्र दाखल करणे सोपे आणि सुलभ झाल्यामुळे रिटर्न फायलिंगचे प्रमाण वाढेल असेही पुढे नेहा मल्होत्रा यांनी सांगितले.
प्राप्तिकर विवरणासाठी आताच व्हा सज्ज
प्राप्तिकर विवरणपत्र दाखल करताना कोणताही अडचण येणार येऊ नये यासाठी तुमचं आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक करणं आवश्यक आहे. त्यामुळे तात्काळ आधार आणि पॅन लिंक करा.
शिवाय आयटीआर भरण्यासाठीची कागदपत्रे आर्थिक वर्षाच्या सुरूवातीपासून गोळा करून ठेवा. त्यामुळे शेवटच्या क्षणी कागदपत्रांसाठी धावपळ करण्याची वेळ तुमच्यावर येणार नाही. या कागदपत्रांमध्ये बँक आणि पोस्ट ऑफिसमधून मिळणाऱ्या व्याजाचं सर्टिफिकेट, टॅक्स सेव्हिंग डॉक्यूमेंट्स, होम लोन स्टेटमेंट, कॅपिटल गेन डॉक्युमेंट, बँक अकाऊंटचं वर्षभराचं स्टेटमेंट इत्यादी कागदपत्रांचा समावेश असतो. अर्थात प्रत्येक व्यक्तीच्या उत्पन्न, गुंतवणूक यानुसार यात काही बदल होतात. याशिवाय तुमच्या इतर गुंतवणुकींची नोंद एकाच ठिकाणी योग्य पद्धतीने केल्यास त्याच्याशी निगडित माहितीसाठी तुमच्या ऐनवेळी होणाऱ्या धावपळपासून तुमची सुटका होईल.