गायीच्या शेणापासून भिंती रंगवण्याच्या रंगांची निर्मिती 

गायीच्या शेणापासून भिंती रंगवण्याच्या रंगांची निर्मिती करण्यात आली आहे. भारताच्या खादी ग्रामोद्योग विभागाने व्यावसायिक स्वरुपात या रंगांची निर्मिती केली आहे.

khadi prakritik Paint: Nitin Gadkari launches paint made from cow dung
गायीच्या शेणापासून भिंती रंगवण्याच्या रंगांची निर्मिती  

थोडं पण कामाचं

  • गायीच्या शेणापासून भिंती रंगवण्याच्या रंगांची व्यावसायिक निर्मिती 
  • रंग इकोफ्रेंडली, नॉन टॉक्सिक, अँटी व्हायरल, अँटी बॅक्टेरिअल, अँटी फंगल आणि नैसर्गिक
  • भारतीय मानक ब्युरोच्या मानांकनांच्या चौकटीत बसणारे रंग

नवी दिल्ली: गायीच्या शेणापासून भिंती रंगवण्याच्या रंगांची निर्मिती करण्यात आली आहे. भारताच्या खादी ग्रामोद्योग विभागाने व्यावसायिक स्वरुपात या रंगांची निर्मिती केली आहे. केंद्रीय परिवहन, रस्ते विकास आणि सुक्ष्म, लघु, मध्यम उद्योगांचे मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते या रंगांचे लाँचिंग करण्यात आले. गडकरी यांनी या प्रसंगी खादी ग्रामोद्योग विभाग आणि गायीच्या शेणापासून रंगांच्या निर्मितीसाठी संशोधन करणाऱ्यांचे अभिनंदन केले. (khadi prakritik Paint: Nitin Gadkari launches paint made from cow dung)

हे रंग अँटी व्हायरल आणि नैसर्गिक आहेत. या रंगांची विक्री मोठ्या प्रमाणावर होणे आवश्यक आहे. यातून देशाच्या ग्रामीण भागासाठी रोजगाराच्या नव्या संधी मोठ्या प्रमाणावर निर्माण होतील, असे गडकरी म्हणाले. परवडणाऱ्या दरांमध्ये उपलब्ध असलेल्या या रंगांमुळे वासाचा त्रास होत नाही. हे गंध विरहीत रंग आहेत.  गायीच्या शेणापासून तयार केलेले हे रंग इकोफ्रेंडली (पर्यावरणासाठी अनुकूल), नॉन टॉक्सिक, अँटी व्हायरल, अँटी बॅक्टेरिअल, अँटी फंगल आहेत. भारतीय मानक ब्युरोच्या (Bureau of Indian Standards - BIS) मानांकनांच्या चौकटीत बसणारे असे हे रंग आहेत. 

गायींचे संगोपन करणारे शेतकरी रंगांच्या निर्मितीसाठी शेणाचा नियमित पुरवठा करुन वर्षाला ५५ हजार रुपयांपर्यंतची कमाई सहज करू शकतो. याच कारणामुळे हे रंग व्यावसायिकदृष्ट्या शेतकऱ्यांसाठी सोयीचे आहेत. डिस्‍टेंपर पेंट आणि प्लॅस्टिक इम्युलेशन पेंट अशा दोन स्वरुपात हे रंग उपलब्ध आहेत. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी सरकारी यंत्रणेने चौकटी बाहेरचे विचार करणे आवश्यक आहे, अशी सूचना केली. होती. या सूचनेची गंभीर दखल घेऊन खादी ग्रामोद्योग विभागाने 'खादी नैसर्गिक रंग' नावाचे हे रंग व्यावसायिक स्वरुपात तयार केले आहेत. या रंगांसाठी कच्चा माल म्हणून शेणाची आवश्यकता भासते. विशिष्ट दर्जाच्या गायीच्या शेणाचा वापर करुन रंगांची निर्मिती केली जाते. खादी ग्रामोद्योग विभाग कच्चा माल म्हणून विशिष्ट दर्जाचे शेण खरेदी करतो आणि शेणाचा पुरवठा करणाऱ्यांना शेतकऱ्यांना वर्षभर निश्चित उत्पन्न कमावता येते.

खादी ग्रामोद्योग विभागाने मार्च २०२० मध्ये शेणापासून रंगांच्या निर्मितीवर लक्ष केंद्रीत केले. या प्रकल्पात अनेक तज्ज्ञ जोडले गेले आणि मंगळवार १२ जानेवारी २०२१ रोजी खादी ग्रामोद्योग विभागाने गायीच्या शेणापासून विकसित केलेले रंग सर्वांसमोर सादर केले. या रंगांची व्यावसायिक स्वरुपातील निर्मिती जयपूरच्या कुमारप्‍पा नॅशनल हँडमेड पेपर इन्स्टिट्युटद्वारे सुरू आहे. या रंगात शिशे. पारा, लोखंड, क्रोमियम, आर्सेनिक, कॅडमियम तसेच अन्य कोणत्याही खनिजाचा समावेश नसल्याची माहिती रंग निर्मात्यांनी दिली. मुंबईच्या नॅशनल टेस्ट हाऊस, श्रीराम इन्स्टिट्युट फॉर इंडस्ट्रिअल रिसर्च, दिल्ली आणि नॅशनल टेस्ट हाऊस गाझियाबाद यांनी रंगांची मनाचे समाधान होईपर्यंत तपासणी केल्याचे सांगितले. रंग निर्माता खादी ग्रामोद्योग विभाग यांनी कोरोना संकटाचा विचार करुन विषाणू नष्ट करणारा रंग विकसित करण्यावर भर दिला. खादी ग्रामोद्योगच्या माध्यमातून छोटे कारागीर आणि शेतकरी यांना नव्या संधी मिळवून देण्यासाठी व्यावसायिक पद्धतीने गायीच्या शेणापासून भिंती रंगवण्याच्या रंगांची निर्मिती करण्यात आली आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी