Loan Guarantor : लोन ग्यारंटर होण्यापूर्वी शंभरवेळा विचार करा! वेळ आली तर व्याजासकट पडेल भुर्दंड

एखाद्या व्यक्तीच्या कर्जासाठी ग्यारंटर म्हणून राहण्यापूर्वी त्याबाबतचे नियम आणि अटी माहिती असणं आवश्यक आहे. अन्यथा, भलामोठा भुर्दंड बसू शकतो.

Loan Guarantor
लोन ग्यारंटर होण्यापूर्वी करा शंभरदा विचार  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • ग्यारंटर होणं ही औपचारिकता नव्हे जबाबदारी
  • कर्ज बुडालं तर ग्यारंटरवर होते कारवाई
  • ग्यारंटर हादेखील एक कर्जदारच असतो

Loan Guarantor : जेव्हा एखाद्या व्यक्तीला पैशांची गरज (Money requirement) असते, तेव्हा ती व्यक्ती बँकेकडून कर्ज (Bank Loan) घेण्याचा प्रयत्न करते. सर्व निकष पूर्ण केल्यानंतर कर्ज मिळण्यासाठी गँरंटरची (Guarantor) गरज असते. ग्यारंटर मिळाल्याशिवाय कुठलीही बँक कर्ज मंजूर करत नाही. अशा वेळी आपले जवळचे मित्र किंवा नातेवाईक यांच्याकडे धाव घेतली जाते आणि ग्यारंटर होण्याची औपचारिकता पूर्ण करण्याची विनंती करण्यात येते. मात्र प्रत्यक्षात ही केवळ औपचारिकता नसते, तर फार मोठी जबाबदारी असते. अनेकांना याची जाणीव नसल्यामुळे मोठमोठ्या कर्जांसाठी ते जामीनदार होतात आणि काही काळाने जर त्या व्यक्तीने कर्जाची परतफेड केली नाही, तर ग्यारंटरला त्याचा भुर्दंड सोसावा लागू शकतो. 

ग्यारंटर म्हणजे काय

ग्यारंटर हा बँकेच्या दृष्टीने एक कर्जदारच असतो. ग्यारंटर म्हणून तुम्ही हे मान्य करता की जर बँकेकडून घेतलेलं कर्ज ती व्यक्ती फेडू शकली नाही, तर ते कर्ज फेडण्याची जबाबदारी तुमची असेल. जेव्हा एकाऐवजी दोन किंवा तीन व्यक्तींकडून कर्ज फेडलं जाण्याची जबाबदारी घेतली जाते, तेव्हाच बँका कर्ज देऊ करतात. यातून बँक सुरक्षित होते, मात्र ग्यारंटरला कर्जाची परतफेड होईपर्यंत सतत चिंतीत राहण्याची वेळ येऊ शकते. कर्जदाराला कर्ज मंजूर करण्यापूर्वी त्यासंबंधित कागदपत्रांवर ग्यारंटरची सही घेतली जाते. या सहीचा अर्थ असा की तुम्हाला ग्यारंटर होण्याविषयीचे सर्व नियम आणि अटी माहित आहेत आणि त्या मान्य आहेत. 

अधिक वाचा - Optical Illusion IQ Test: टिकटॉक स्टारनं अनेकांना खाजवायला लावलं डोकं; फक्त 1% लोक 30 सेकंदात शोधू शकतात तिसरा प्राणी

कायदेशीर कारवाईची शक्यता

नियमांनुसार, कर्ज घेतलेल्या व्यक्तीइतकीच ग्यारंटर राहिलेली व्यक्तीदेखील कर्जासाठी जबाबदार असते. जर कर्जदाराने कर्ज फेडलं नाही, तर ग्यारंटरवरदेखील कारवाई होण्याची शक्यता असते. जर कर्जदाराकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नसेल, तर बँका ग्यारंटरशी संपर्क साधतात. 

ग्यारंटरची गरज का लागते?

काही कर्जांसाठी ग्यारंटरची आवश्यकता असते, तर काही कर्ज विना ग्यारंटरचीही मिळू शकतात. कर्जदार व्यक्ती कर्ज फेडू शकेल की नाही, अशी शंका जेव्हा बँकेला येते तेव्हा मोठ्या रकमेच्या कर्जासाठी ग्यारंटरची गरज निर्माण होते. 

अधिक वाचा - International Dog Day का साजरा केला जातोय? जाणून घ्या इतिहास आणि महत्त्व

इन्शुरन्स काढण्याचा सल्ला

एखाद्या व्यक्तीने तुम्हाला ग्यारंटर होण्याची विनंती केली, तर अगोदर त्या व्यक्तीला कर्जाचा विमा काढण्यास सांगितलं पाहिजे, असा सल्ला अर्थतज्जांकडून दिला जातो. जर त्या व्यक्तीचा मृत्यू झाला किंवा इतर काही कारणांमुळे व्यक्ती कर्ज फेडू शकली नाही, तर ते कर्ज फेडण्याची जबाबदारी संबंधित इन्शुरन्स कंपनीची असते. तुम्हाला त्यासाठी थेट जबाबदार धरलं जात नाही. मात्र ज्या कर्जदारासाठी तुम्ही ग्यारंटर आहात त्याने कर्जाचा इन्शुरन्स काढला नसेल, तर मात्र तुम्हाला त्याचा भुर्दंड भरावा लागू शकतो. 

डिस्क्लेमर - ग्यारंटर राहण्याबाबतच्या या सामान्य टिप्स आहेत. याबाबत तज्ज्ञांचा घेऊनच निर्णय घेणे आवश्यक आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी