सॅमसंगला ग्लोबल ब्रँड करणाऱ्या व्यक्तीचे निधन

Lee Kun-Hee force behind Samsung's rise dies at 78 सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्स कंपनीचे चेअरमन हे पद ३० वर्ष प्रभावीरित्या हाताळणाऱ्या ली कुन-ही यांचे निधन झाले. ते ७८ वर्षांचे होते.

Lee Kun-Hee
ली कुन-ही 

थोडं पण कामाचं

  • सॅमसंगला ग्लोबल ब्रँड करणाऱ्या व्यक्तीचे निधन
  • ली कुन-ही ४५व्या वर्षी झाले चेअरमन, ३० वर्ष हाताळली जबाबदारी
  • ली कुन-ही यांचे आजारपणामुळे ७८व्या वर्षी निधन

नवी दिल्ली: सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्स (Samsung Electronics) कंपनीचे चेअरमन हे पद ३० वर्ष प्रभावीरित्या हाताळणाऱ्या ली कुन-ही (Lee Kun-Hee) यांचे निधन झाले. ते ७८ वर्षांचे होते. मागील अनेक दिवसांपासून ते आजारी होते. (Lee Kun-Hee force behind Samsung's rise dies at 78)

वडील ली ब्युंग-चुल (Lee Byung-chul) यांच्या निधनानंतर १९८७ मध्ये ४५ वर्षांचे असताना ली कुन-ही सॅमसंग कंपनीचे चेअरमन झाले. चेअरमन झाल्यानंतर सलग ३० वर्षे या पदावर कार्यरत राहून ली कुन-ही यांनी सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्स या कंपनीला आंतरराष्ट्रीय दर्जाचा ब्रँड म्हणून ख्याती मिळवून दिली. एका छोट्या टीव्ही निर्मात्या कंपनीपासून ग्राहकांच्या गरजा पूर्ण करणाऱ्या अनेक इलेक्ट्रॉनिक वस्तुंची निर्मिती आणि विक्री करणारी आंतरराष्ट्रीय ख्यातीची कंपनी हा 'सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्स'चा चकीत करणारा प्रवास ली कुन-ही यांच्या कार्यकाळात झाला. सॅमसंगने ली कुन-ही यांच्या कार्यकाळातच स्मार्टफोन, स्मार्ट टीव्ही आणि चिप यांची निर्मिती सुरू केली. व्यवसायाचा आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रचंड विस्तार केला.

ली कुन-ही यांना २०१४ मध्ये हृदयविकाराचा धक्का बसल्यामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. यानंतर त्यांच्या तब्येतीच्या तक्रारी सातत्याने सुरू राहिल्या. ली कुन-ही यांच्या अनुपस्थितीत त्यांचा मुलगा ली जे-योंग (Lee Jae-yong) यांनी सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्स या कंपनीचा कारभार हाताळायला सुरुवात केली. आता ली कुन-ही यांच्या निधनामुळे ली जे-योंग हेच कंपनीचा कारभार हाताळणार आहेत.

सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्स या कंपनीने एक प्रसिद्धीपत्रक काढून ली कुन-ही यांच्या निधनाची माहिती दिली. ली कुन-ही यांचे निधन झाले त्यावेळी त्यांच्याजवळ मुलगा ली जे-योंग, कुटुंबातील इतर सदस्य आणि जवळचे नातेवाईक उपस्थित होते. प्रदीर्घ आजारामुळे तब्येत खालावलेल्या ली कुन-ही यांचे रविवारी निधन झाले, अशी माहिती 'सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्स'ने दिली. 'ली कुन-ही यांनी कंपनीसाठी दिलेले योगदान कधीच विसरू शकत नाही. या योगदानासाठी कंपनी सदैव त्यांची ऋणी राहील', अशी प्रतिक्रिया 'सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्स'कडून देण्यात आली.

'फोर्ब्स'च्या आकडेवारीनुसार ली कुन-ही २१ अब्ज अमेरिकन डॉलर एवढी संपत्ती मागे सोडून निघून गेले. 'सॅमसंग'मुळे दक्षिण कोरिया आशियातील चौथ्या क्रमाकांची मोठी अर्थव्यवस्था झाली. सॅमसंग समुहाने जहाज निर्मिती, जीवन विमा, बांधकाम, हॉटेल, मनोरंजन उद्यान अशा वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली. सॅमसंग समुहाच्या या कामगिरीमुळे दक्षिण कोरिया आशिया पॅसिफिकमधील सातव्या क्रमांकाचा सामर्थ्यशाली देश झाला आहे. 

बलाढ्य सॅमसंगसमोर चिनी मोबाइल कंपन्यांचे मोठे आव्हान आहे. ली कुन-ही यांचे निधन झाले आहे. ली जे-योंग यांच्या हाती कारभार आहे. कोरोना संकटाचा कंपनीला फटका बसला आहे. या अडचणींमधून मार्ग काढत स्वस्तात स्मार्टफोन देणाऱ्या चिनी कंपन्यांना टक्कर देण्याचे आव्हान सॅमसंगसमोर आहे. चिनी आव्हानाला सामोरे जाण्यासाठी ली जे-योंग यांच्या नेतृत्वाखाली 'सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्स'ला भरपूर मेहनत करावी लागणार आहे.

ली जे-योंग यांच्याविरोधात न्यायालयात एक खटला चालवण्यात आला. लाच प्रकरण आणि त्या वेळच्या प्रेसिडेंट पार्क ज्युन हे (Park Geun-hye) यांच्याशी संबंधित एका गुन्ह्यात दोषी ठरवून ली जे-योंग यांना पाच वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा देण्यात आली. ही घटना २०१७ मध्ये घडली. पण वर्षभरातच ली जे-योंग तुरुंगातून बाहेर आले. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर ली जे-योंग यांनी नव्याने सॅमसंग कंपनीच्या करभारात लक्ष घालायला सुरुवात केली. ते कंपनीत स्थिरस्थावर होण्याच्या सुमारास ली कुन-ही यांचे निधन झाले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी