मुबई: एलआयसीने आपल्यासाठी एक नवी गुंतवणूक योजना आणली आहे. या योजने अंतर्गत विमा घेणाऱ्या ग्राहकांना आपल्या परताव्यात वार्षिक वृद्धी मिळण्याची हमी एलआयसीने दिली आहे. या योजनेमुळे ग्राहकांना फायदा मिळणार असून त्यांना त्यांच्या गुंतवणुकीवर ठराविक परताव्याची गॅरंटी कंपनी देणार आहे. एलआयसीच्या या नव्या पॉलिसीचे नाव विमा ज्योती योजना असे देण्यात आले आहे. ही एक नॉन-लिंक्ड, नॉन-पार्टिसिपेटिंग आणि वैयक्तिक बचतीची योजना आहे.
विमा ज्योती पॉलिसी एखाद्या विमा एजंटकडून खरेदी केली जाऊ शकते. याव्यतिरिक्त ही पॉलिसी ऑनलाईन विकत घेण्याचा पर्यायसुद्धा उपलब्ध आहे. एलआयसीच्या वेबसाइटच्या माध्यमातून ही पॉलिसी विकत घेता येऊ शकते.
विमा ज्योती योजनेची मूलभूत रक्कम ही एक लाख रुपये इतकी आहे. म्हणजेच तुम्ही कमीत कमी एक लाख रूपयांची पॉलिसी घेऊ शकता. या पॉलिसिची कमाल गुंतवणूक रक्कम अजून ठरवण्यात आलेली नाही. ही पॉलिसी १५ ते २० वर्षांसाठी खरेदी केली जाऊ शकते. तुमच्या सोयीनुसार तुम्ही त्याचा कालावधी ठरवू शकता.
पॉलिसी घेणाऱ्याचे किमान वय ९० दिवस आणि कमाल वय ९० वर्षे इतके आहे. या दरम्यानच्या वयोगटातील व्यक्तींसाठी ही पॉलिसी खरेदी केली जाऊ शकते.
विमा ज्योती पॉलिसीच्या कालावधिपेक्षा पाच वर्षे कमी कालावधीत प्रिमिअम भरणे आवश्यक आहे.
दर वर्षी १००० रूपयांवर ५० रूपयांच्या परताव्याची हमी कंपनीने दिली आहे. ही सर्व रक्कम पॉलिसी मॅच्युअर झाल्यास पॉलिसीच्या शेवटच्या वर्षात ग्राह्य धरली जाईल आणि एकूण रकमेत पकडली जाईल.
प्रिमिअम वार्षिक, सहा महिने, तिमाही किंवा मासिक अशा कोणत्याही प्रकारे भरले जाऊ शकते. यातील मासिक प्रिमिअम भरण्यासाठी NACH (नॅशनल ऑटोमेटेड क्लियरिंग हाउस)च्या माध्यमाचा वापर केला जाऊ शकतो. किंवा सॅलरी डिडक्शन म्हणजेच पगार कपातीच्या माध्यमातून केला जाऊ शकतो. या पॉलिसिवर कर्ज घेण्याची सवलतही मिळणार आहे.