तुमची एलआयसी पॉलिसी, तुम्हाला कोविड-१९चे कव्हर देते काय? इथे पाहा

काम-धंदा
Updated Apr 19, 2021 | 16:36 IST | टाइम्स नाऊ मराठी

मृत्यूनंतर क्लेम हे पॉलिसीच्या नियम आणि अटीनुसार स्वीकारले जातात. त्यामुळे कोविड-१९मुळे होणाऱ्या मृत्यूंचे क्लेम हे त्या पॉलिसीच्या अटी आणि शर्तीनुसार लागू होतील, असे एलआयसीकडून सांगण्यात आले आहे.

LIC settles claims for death by covid-19, policy conditions applied
एलआयसी पॉलिसीची कोरोना क्लेमसाठीची सेटलमेंट 

थोडं पण कामाचं

  • एलआयसीचे ग्राहकांना आश्वासन
  • कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंचे क्लेम
  • मागील वर्षी केले मोठे क्लेम सेटल

नवी दिल्ली : भारतीय आयुर्विमा महामंडळ म्हणजे एलआयसी या सार्वजनिक क्षेत्रातील विमा कंपनीकडून पॉलिसी घेणाऱ्या ग्राहकांची संख्या मोठी आहे. कोरोना महामारीच्या संकटकाळात आपल्या ग्राहकांच्या हिताची काळजी घेण्यास आपण कटिबद्ध आहोत असे एलआयसीकडून स्पष्ट करण्यात आले आहे. ज्या ग्राहकांच्या पॉलिसी मॅच्युअर्ड झाल्या असतील त्यांनी त्या देशभरातील एलआयसी कार्यालयात क्लेम कागदपत्रांसहीत सादर कराव्यात. मात्र अनेक ग्राहकांना या बाबतीत गोंधळ आहे की त्यांची सध्याची एलआयसी पॉलिसी त्यांना कोविड-१९संदर्भातील क्लेमचे संरक्षण देते की नाही.

क्लेम होणार सेटल


याचे उत्तर होय असेच आहे. कोविड-१९मुळे होणाऱ्या मृत्यूंनादेखील इतर मृत्यूंप्रमाणेच समजले जाणार आहे. त्यामुळे कोविड-१९मुळे होणाऱ्या मृत्यूंच्या क्लेमना एलआयसी इतर क्लेमइतकेच प्राधान्याने दाखल करून घेते आहे. याचा अर्थ जर पॉलिसीधारकाचा मृत्यू कोविड-१९मुळे झाला तर त्याचा नॉमिनी पॉलिसीची सम अश्युअर्ड मिळण्यास पात्र ठरणार आहे.

पॉलिसीच्या अटींप्रमाणेच कारवाई


एलआयसीने अगदी स्पष्टपणे सांगितले आहे की ती त्यांच्या ग्राहकांच्या आणि कुटुंबियांच्या पाठीशी त्यांच्या संकटकाळात नेहमीच उभी राहणार आहे. एलआयसीने हे जाहीर केले आहे की कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंसंदर्भातील क्लेमना प्राधान्यक्रमाने पूर्ण करण्यात येणार आहे. एलआयसीच्या पॉलिसीधारकांनी हे लक्षात घ्यावे की मृत्यूनंतर पॉलिसीचा क्लेम हा त्या पॉलिसीतील अटी आणि शर्तीनुसारच स्वीकारला जाणार आहे. त्यामुळे कोविड-१९शी संबंधित क्लेमदेखील पॉलिसीप्रमाणमेच स्वीकारले जाणार आहेत.

मोठ्या प्रमाणात क्लेम केले सेटल


मागील वर्षीसुद्धा कोरोना महामारीचा फैलाव झाल्यानंतर अनेकांचे मृत्यू कोविड-१९मुळे झाले होते. त्यावेळेसदेखील एलआयसीने देशभरातून मोठ्या संख्येने क्लेम सेटल केले होते. जर एखाद्या पॉलिसीधारकाचा कोरोनामुळे मृत्यू झाल्यास पॉलिसीत उल्लेख केलेल्या त्याच्या नॉमिनीने मृत्यूचा दाखला, क्लेमचा अर्ज आणि पॉलिसीची कॉपी जवळच्या एलआयसी कार्यालयात सादर करावयाची आहे. अर्थात ती पॉलिसी सुरू असली पाहिजे.

जर काही कारणास्तव तुमच्या जवळचे एलआयसी कार्यालय सुरू नसल्यास किंवा कोविड-१९मुळे लागू असलेल्या निर्बंधामुळे कार्यालय बंद असल्यास नॉमिनीला मृत्यूचा दाखला, क्लेमचा अर्ज आणि पॉलिसीची कॉपी  एलआयसीच्या नोडल कर्मचाऱ्याला किंवा अधिकाऱ्याला ईमेल करता येणार आहे. 

एलआयसीची ऑनलाईन सेवा


एलआयसी पॉलिसीशी निगडीत महत्त्वाच्या सेवा सुरू ठेवल्या जातील अशी ग्वाही एलआयसीने आपल्या ग्राहकांना दिली आहे. अनेक ठिकाणी कोरोनामुळे सुरू असलेल्या निर्बंधांमुळे अनेक शाखा, प्रिमियम पॉईंट किंवा कॉल सेंटरदेखील सुरू ठेवण्यात अडचणी येत आहेत. यासाठी ग्राहकांची आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. मात्र आमच्या ऑनलाईन सेवा तुमच्यासाठी २४ तास सुरू आहेत. तुम्ही घरी रहा आणि सुरक्षित राहा. आमच्या ऑनलाईन सेवेचा लाभ तुम्ही घरबसल्याच घेऊ शकता, असे एलआयसीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

आयुर्विमा हा कुटुंबासाठी अत्यंत महत्त्वाचा असतो. आपल्या पश्चात कुटुंबाच्या आर्थिक गरजांसाठीच्या पैशाची तजवीज आयुर्विम्यातून केली जाते. विमा हा आर्थिक नियोजनातील अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. तुम्ही आयुर्विमा घेतला नसल्यास लवकरात लवकर विमा घ्यावा.
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी