Repo Rate Hiked: वाढती महागाई (inflation) नियंत्रित करण्यासाठी रिझर्व्ह बँकेने (Reserve Bank) रेपो दरात (repo rates) वाढ केली आहे. रेपो दर वाढवल्यामुळे कर्जे महागणार आहेत. रिझर्व्ह बँकेच्या पॉलिसी मॉनिटरिंग समितीने रेपो दरात 40 बीपीएसने वाढ केली आहे. आज दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास रिझर्व्ह बँकेचे (Reserve Bank) गर्व्हनर (Governor) शक्तिकांत दास (Shaktikant Das) यांनी पत्रकार परिषद (Press conference) घेत ही रेपो दरवाढीची माहिती दिली.
देशातील महागाई दर सातत्याने वाढत आहे. या महागाईचा फटका आता देशातील कर्जदारांना देखील बसला आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने रेपो दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आता रेपो दर 4% वरुन वाढवून 4.40% करण्यात आला आहे. म्हणजेच तुमचा ईएमआय आणि कर्ज महागणार आहे.
मे 2 आणि 3 मे रोजी रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीची तातडीची बैठक झाली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. पतधोरण आढावा बैठक दर दोन महिन्यांनी घेतली जाते. या आर्थिक वर्षाची पहिली बैठक गेल्या महिन्यात 6-8 एप्रिल रोजी झाली होती. पुढील बैठक जूनमध्ये होणार होती. दरम्यान याआधी 22 मे 2020 रोजी रेपो दरात बदल करण्यात आला होता. तेव्हापासून रेपो दर 4% या ऐतिहासिक नीचांकी पातळीवर आहेत. मात्र, आता रेपो दरात वाढ करण्यात आली आहे.
दरम्यान रिझर्व्ह बँकेने रेपो दरात वाढ करताच त्याचा परिणाम शेअर बाजारावर दिसून आला. सेन्सेक्स 1000 अंकानी कोसळला. तर, निफ्टी 330 अंकानी कोसळला. आज सकाळपासून शेअर बाजार अस्थिर होता. रिझर्व्ह बँकेने रेपो दराची घोषणा करताच शेअर बाजार कोसळला.
ज्या दराने बँकांना आरबीआयच्या वतीने कर्ज दिले जाते, त्याला रेपो दर असे म्हटले जाते. तर बँकांनी त्यांच्याकडील पैसे आरबीआयकडे ठेवले तर त्या बँकांना रिझर्व्ह बँक जे व्याज देते त्याला रिव्हर्स रेपो दर असे म्हटले जाते.
रशिया-युक्रेन युद्धामुळे कच्च्या तेलापासून धातूच्या किमतीत मोठ्या प्रमाणात चढ-उतार होत असताना आरबीआयच्या पत धोरण समितीची (एमपीसी) तातडीची बैठक झाली. अशा स्थितीत जगभर महागाई ही मोठी समस्या बनली आहे. मागील बैठकीत, RBI ने पहिल्या तिमाहीत महागाई दर 6.3%, दुसऱ्या तिमाहीत 5%, तिसऱ्या तिमाहीत 5.4% आणि चौथ्या तिमाहीत 5.1% राहण्याचा अंदाज व्यक्त केला होता.